एकाच तिकिटात दोन दीर्घांक — एकाच ठिकाणी दोन कलाकृती बघायला मिळण्याची सुवर्णसंधी
एकाच तिकिटात, एकाच दिवशी, एका पाठोपाठ एक, दोन वेगवेगळ्या धाटणीच्या कलाकृती पाहायला मिळाल्या तर काय बहार येईल नई? नाशिक येथील महाकवी कालिदास कलामंदिरमध्येही याच पद्धतीचा एक नाट्यप्रयोग प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.
रविवार दिनांक १९ डिसेंबर, २०२१ रोजी महाकवी कालिदास कलामंदिरामध्ये करनाटकू निर्मित ‘नवरा आला वेशीपाशी’ आणि चक्री संस्थेची निर्मिती असलेले ‘यात्रा’ असे दीड तासांचे दोन दीर्घांक सायंकाळी ५ वाजल्यापासून दाखवले जाणार आहेत. या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य असे की या दोन्ही दीर्घांकाचा विषय एकमेकांपेक्षा पूर्णपणे वेगळा आहे.
करनाटकू निर्मित ‘नवरा आला वेशीपाशी‘ या दीर्घांकाबद्दल आम्ही याआधीच समीक्षण लिहिले आहे. जर तुम्ही ते अद्याप वाचले नसेल तर नक्की वाचा.
नवरा आला वेशीपाशी [Review] — एका लग्नाची गोष्ट सुरु होण्यापूर्वीची गोष्ट
या दीर्घांकाबद्दल थोडक्यात सांगायचं तर एक तरुणी स्वत:च्या हळदीतून उठून एका हॉटेल रूमवर येते. ती होणाऱ्या नवऱ्यालाही तिथे बोलावून घेते. तिला त्याला काहीतरी महत्वाचं सांगायचं असतं. आता हे गुपित काय असतं? ते त्या रात्रीच सांगणं का गरजेचं असतं? ते सांगितल्यावर त्यांचं लग्न होतं का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला हा दीर्घांक बघिल्यावर मिळतील.
चक्री संस्थेची निर्मिती असलेल्या ‘यात्रा’ या एकपात्री दीर्घांकात एका मुलीच्या आयुष्याची यात्रा दाखवलेली आहे. यात्रा म्हणजे एक प्रवास. दरवर्षी अगणित वारकरी विठ्ठलाच्या भेटीसाठी यात्रेला निघतात. छोटी काशी, आपल्या आई-वडीलांसोबत आपल्या आयुष्यातील पहिल्या यात्रेसाठी निघते तेव्हा ती प्रचंड उत्साहात असते. पण विठ्ठलाने तिच्या प्रवासात योजलेल्या वळणांची तिला कल्पनाच नसते. तिला यात्रेतून पळवून एका कोठीवर विकलं जातं आणि सुरु होते काशीची धडपड – काहीही करुन यात्रा पूर्ण करण्याची. तिची ही धडपड सफल होते का, तिला पंढरपुराला जाता येतं का आणि आयुष्याची यात्रा म्हणजे नेमकं काय? ह्या प्रश्नांची उत्तरं मिळवण्यासाठी हा एकपात्री दीर्घांक बघायला हवा.
यात्राच्या लेखिका व दिग्दर्शिका मुक्ता बाम यांनी आमच्या टीमशी बोलताना सांगितले की हा दीर्घांक प्रायोगिक पद्धतीने मांडला गेला आहे. हा प्रयोग पुरुषत्ताक व्यवस्थेत बाईचं अडकत जाणं दाखवून देतो आणि समाजाच्या victim-blaming मानसिकतेला प्रश्न विचारतो.
अशा या दोन दर्जेदार कलाकृती तुम्हाला १५०/- व २००/- इतक्या माफक दरात पाहायला मिळणार आहेत.