जत्रा भरणार म्हटलं की त्यामध्ये वैविध्यपूर्ण मनोरंजन तर आलंच पण याच जत्रेतून मनोरंजनासोबत गरजू कलाकारांसाठी मदत निधीसुद्धा उभारला जाणार असेल तर सद्य परिस्थितीमध्ये त्याहून चांगले काहीच नाही. अशीच एक जत्रा आजपासून पुढे ३ दिवस भरणार आहे. ‘एम्. डी. नाट्यांगण आणि थिएटर Hotspot’ च्या अंतर्गत तीन दिवसांचा “नाट्य जत्रा” हा कार्यक्रम YouTube च्या माध्यमातून पार पडणार आहे. या कार्यक्रमांतर्गत १० वेगवेगळ्या एकांकिका दाखविण्यात येणार आहेत.
२८, २९, ३० मे, २०२० अशा तीन दिवसांमध्ये दाखवल्या जाणाऱ्या या अव्वल दर्जाच्या एकांकिका म्हणजे तमाम रसिक प्रेक्षकांसाठी एक सोहळाच आहे असं म्हणावं लागेल. या सोहळ्यामध्ये तुम्हीदेखील सहभागी होऊ शकता. फक्त प्रेक्षक म्हणून नाही तर रंगभूमीवर आलेले कोरोनारूपी सावट आणि त्यामुळे हतबल झालेल्या कलाकार आणि गरजू रंगकर्मींसाठी मदत निधी उभा करण्यासाठीसुद्धा! प्रत्येक एकांकिकेनंतर स्क्रीनवर एक QR CODE येईल. तो SCAN करून तुम्ही किमान १०/- रुपयांपासून ते जास्तीत जास्त कितीही पैसे पाठवून हा मदत निधी उभा करण्यासाठी मदत करू शकता. तुम्ही उचललेला खारीचा वाटाही मोलाचा ठरणार आहे हे लक्षात ठेवा!
हा कार्यक्रम पाहण्यासाठी वेळापत्रकात दिलेल्या वेळेनुसार MD Natyangan या YouTube चॅनेलला भेट द्या. या कार्यक्रमाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे असेल.
नाटकवाल्यांनी नाटकवाल्यांसाठी उभारलेल्या या भव्यदिव्य जत्रेला तुम्ही मोठ्या संख्येने उपस्थित राहाल याबाबत शंकाच नाही. पण, एक गोष्ट विसरून चालणार नाही. ती म्हणजे अशी की तिन्ही दिवस एकांकिकांचे प्रक्षेपण हे Live होणार आहे. त्यामुळे, शांतपणे रात्री झोपताना एकांकिका बघू अशा विचाराने थांबू नका. वरील वेळापत्रकामध्ये दिलेल्या वेळेस एकांकिका एकदाच दाखवली जाईल आणि प्रक्षेपित झाल्यावर ती चॅनेलवरून Delete होईल.
चला तर मग या नाट्य जत्रेचा आनंद लुटायला तयार व्हा! आणि एकांकिका कशा वाटल्या हे नक्की लिहून कळवा!