वर्षभरात अनेक एकांकिका स्पर्धांमध्ये विविध संघ आणि कलाकार भाग घेत असतात. त्यातील काही विजयी संघ आणि कलाकार प्रेक्षकांची वाहवा मिळवतात. तर या स्पर्धांमध्ये विजयी न झालेल्या किंवा अंतिम फेरीत दाखल न झालेल्या एकांकिका स्पर्धकांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सम्यक कलांश प्रतिष्ठान घेऊन येत आहेत नाट्यगंध महोत्सव २०२२!
यंदाचे नाट्यगंध महोत्सवाचे हे ४थे वर्ष आहे. स्थानिक कलाकारांना, स्थानिक पातळीवर रंगमंच उपलब्ध करून देणे हा नाट्यगंध महोत्सवाचा मुख्य हेतू आहे. स्पर्धेत मागे राहिलेल्या कलाकारांचे, पडद्याआड राहिलेल्या संघांचे मनोबल वाढविण्याचे, तसेच त्यांना प्रेक्षक मिळवून देण्याचे कार्य सम्यक कलांश प्रतिष्ठान नाट्यगंध महोत्सवाच्या माध्यमातून गेली चार वर्षे करत आहे व या एकांकिकांना प्रेक्षक मिळवून देण्यात नाट्यगंध महोत्सवाचा मोलाचा वाटा आहे.
एकांकिका संघांना आणि कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासोबतच नजरेआड राहिलेल्या रंगकर्मींचा सत्कारही नाट्यगंध महोत्सवात करण्यात येतो. यंदाचा नाट्यगंध महोत्सव ठाणे शहरात पार पडणार आहे. त्यामुळे, ठाणे जिल्ह्यातील स्थानिक एकांकिका संघांना प्राधान्य देण्यात येणार आहे. महोत्सवात सहभागी होऊ इच्छित संघाची तालीम आयोजकांकडून पाहण्यात येईल. या महोत्सवात सहभागी होणाऱ्या संघांकडे एकांकिकेचे रंगभूमी परिनिरीक्षण प्रमाण पत्र व लेखकाचा संपर्क क्रमांक स्पष्टपणे नमूद असेल असे परवानगी पत्र असले पाहिजे.
जर महोत्सवात निवड झाली , तर त्या एकांकिका संघांना सहभागी शुल्क ५००/- रुपये व अनामत रक्कम १५००/- रुपये जमा करणे अनिवार्य असेल. महोत्सवात एकांकिका सादर झाल्यानंतर जमा केलेली अनामत रक्कम परत केली जाईल.
सम्यक कलांश प्रतिष्ठान यांचा नाट्यगंध महोत्सव गडकरी रंगायतन, ठाणे, येथे दिनांक २९ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत चालणार आहे. एकांकिकांचा हा भव्य महोत्सव असल्यामुळे प्रवेश मर्यादित आहेत. तेव्हा इच्छुकांनी लवकरात लवकर संपर्क साधावा व प्रेक्षकांनी उदंड प्रतिसादात महोत्सवाचा लाभ घ्यावा.
अधिक माहितीसाठी व नियम व अटी जाणून घेण्यासाठी संपर्क-
हर्ष – ८४४६३७३२४०
अनिकेत – ९८२१७११४६२
वैभव – ८४२५९०७२८९
नाट्यगंध महोत्सवाबद्दल अपडेट्स मिळवण्यासाठी सम्यक कलांश प्रतिष्ठानच्या Facebook आणि Instagram अकाउंटला नक्की भेट देत रहा.
1 Comment
Pingback: सम्यक कलांश प्रतिष्ठान आयोजित नाट्यगंध महोत्सव २०२२