रंगभूमी.com नाट्यक्षेत्रात गेली तीन वर्षे सातत्याने कार्यरत आहे. या प्रवासात बरीच नाटकं बघण्याचा योग आला. खरं तर नाटकांचे बरेच ‘प्रकार’ बघायला मिळाले. एकांकिका, दीर्घांक, दोन अंकी नाटक, तीन अंकी नाटक, लघुनाटिका आणि बरंच काही! बऱ्या-वाईट-चांगल्या अशा कित्येक नाट्यानुभवांचा ओघ आजही अव्याहत सुरू आहे. या ओघात वाहत आलेल्या नाट्यकृतींपैकी काही नाटकांनी मनात असं काही घर केलं की ती नाटकं जिवंतपणी विस्मृतीत जाणं निव्वळ अशक्यच! आपल्याला आवडलेली ही सुंदर नाटकं रंगभूमी.com च्या माध्यमातून जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याची कल्पना समोर आली. सहकाऱ्यांनी ही कल्पना उचलून धरली आणि बऱ्याच अथक प्रयत्नांनंतर आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत रंगभूमी.com आयोजित ‘नाट्यदरबार’ — निवडक आणि दर्जेदार नाट्यकलाकृती रसिकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न!
येत्या ७ मे रोजी, सायंकाळी ७ वाजता मालाड, मुंबई येथे पहिला ‘नाट्यदरबार’ भरणार आहे. पुणे आणि कोल्हापूर येथील दोन संस्थांचे दोन एकपात्री दीर्घांक या नाट्यदरबारात दाखविले जाणार आहेत. या पहिल्या नाट्यदरबारात प्रवेश विनामूल्य आहे. परंतु, आसने मर्यादित आहेत. त्यामुळे, पुढील फॉर्म भरून लवकरात लवकर तुमची जागा राखीव करा. (RSVP ASAP)
नाट्यदरबार ०१ — माहिती व प्रवेश अर्ज
पहिल्या नाट्यदरबारात दाखविल्या जाणाऱ्या एकांकिका
१. यात्रा
चक्री, पुणे संस्थेतर्फे मुक्ता बाम या युवा लेखिकेने लिहिलेल्या ‘यात्रा’ या दीर्घांकाला आजवर बरीच पारितोषिकं मिळाली आहेत. या दीर्घांकाबद्दल लिहावं तितकं कमीच आहे. अशा कलाकृती वारंवार जन्माला येत नाहीत. या दीर्घांकाच्या निमित्ताने मुक्ता बाम ही एक गुणी लेखिका आणि सुकन्या गुरव ही एक उत्तम अभिनेत्री रंगभूमीला मिळाली आहे. अधिक माहितीसाठी रंगभूमी.com तर्फे ‘यात्रा’साठी बनवण्यात आलेला पुढील व्हिडीओ नक्की बघा.
२. कडेकोट कडेलोट
टायनी टेल्स संस्थेतर्फे ‘कडकोट कडेलोट’ ही ५५ मिनिटांची लघुनाटिका म्हणजे एक उल्लेखनीय अनुभव! घरात कोंडून ठेवलेल्या स्त्रीची मानसिकता दाखवत असंख्य स्त्रियांच्या मनातील बंदिस्त विचारांना वाट मोकळी करून देणारा हा विषय अंतर्मुख करून सोडतो. बंदिस्त गृहिणीच्या मनाची होणारी घालमेल प्रतिक्षा खासनीस हिने समर्पकरीत्या मांडली आहे.
प्रेक्षकांचे प्रेम मिळत राहिले तर यापुढेही महिन्यातून एकदा ‘नाट्यदरबार’ भरविण्याचा आमचा मानस आहे. रसिक प्रेक्षकांचं सहकार्य आणि प्रेम मिळत राहिलं तर हा नाट्यादरबार पुन्हा पुन्हा भरत राहील. जर तुम्हाला आमची संकल्पना आवडली असेल आणि हा उपक्रम राबविण्यात आम्हाला मदत करायची असेल तर तुम्ही पुढील लिंकचा वापर करुन देणगीस्वरुपात तुमचे शुभाशिर्वाद आमच्यापर्यंत पोहोचवू शकता.
तसेच, स्पॉन्सरशिपसाठीही आमच्याशी ९९९ २५६ २५६ १ या क्रमांकावर अथवा [email protected] या ई-मेल आयडीवर संपर्क साधू शकता.