मुंबईतील प्रसिद्ध एकांकिका स्पर्धांपैकी या ही स्पर्धेचे नाव आदराने घेतले जाते. पाण्याच्या समस्या दूर करून ‘पाणीवाली बाई‘ अशी ओळख निर्माण करणाऱ्या एक समाजसेविका आणि गोरेगावच्या माजी आमदार माननीय मृणालताई गोरे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गेली ४ वर्षे, मृणालताई नाट्यकरंडक ही खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाचे स्पर्धेचे ५ वे वर्ष असून या स्पर्धेचे आयोजन सोहम थिएटर्स अंतर्गत होणार आहे. सुदेश सावंत हे स्पर्धेचे आयोजन करत असून संतोष वाडेकर आणि गिरीश सावंत हे समन्वयक आहेत. प्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे हे या स्पर्धेचे मार्गदर्शन करणार असून प्रमोद शेलार आणि युवराज मोहिते हे सल्लागार आहेत.
अनेक वर्षांपासून या स्पर्धेला जोरदार प्रतिसाद मिळत आहे. जवळपास ४५ ते ६० संघ दरवर्षी सहभाग घेतात. परंतु, यावर्षी फक्त ३६ संघच सहभागी होऊ शकतील असे काही बदल आयोजकांतर्फे करण्यात आले आहेत. अंतिम फेरीनंतर विजेत्या संघाशी मार्गदर्शनपर चर्चासत्र केले जाते हे या स्पर्धेचे वैशिष्ट्य आहे. मागील वर्षी नागबादेवी कलामंचाची ‘मौनांतर’ अव्वल ठरली. तर, कलांश थिएटरची ‘बारस’ ही एकांकिका द्वितीय सर्वोत्कृष्ट ठरली. यावर्षी चुरशीच्या स्पर्धेत कोणती एकांकिका विजयी ठरेल हे पाहण्याजोगे असेल.
मृणालताई नाट्यकरंडक स्पर्धेचे स्वरूप आणि नियमावली
- प्राथमिक फेरी दिनांक १५, १६, १७ डिसेंबर २०२२ रोजी केशव गोरे सभागृह, गोरेगाव येथे होणार आहे. तर अंतिम फेरी दिनांक २७ डिसेंबर २०२२ रोजी प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृह, बोरीवली येथे होणार आहे.
- स्पर्धा प्रवेश नोंदणी १० डिसेंबर २०२२ पर्यंत असून, त्याच दिवशी सायंकाळी ५ वाजता प्राथमिक फेरीचे वेळापत्रक कळविण्यात येईल.
- प्राथमिक फेरी वेळी संपूर्ण श्रेयनामावली व संहिता यांच्या प्रत्येकी ३ प्रती व सोबत लेखकाचे परवानगी पत्र देणे आवश्यक आहे. तसेच प्रकाश योजनेचा तपशील व नेपथ्याचा आराखडा देणे बंधनकारक आहे. सादरीकरणाचा कालावधी कमीत कमी ३० ते जास्तीत जास्त ४५ मिनिट असेल अन्यथा त्या स्पर्धक संस्थेस स्पर्धेमधून बाद करण्यात येईल.
- प्राथमिक फेरी तालीम स्वरूपाची असून आयोजकांतर्फे स्पर्धकांना साधारण नेपथ्यासाठी सामग्री हवी असल्यास आयोजकांशी संपर्क साधावा.
- लेखक/तंत्रज्ञ एकापेक्षा अधिक एकांकिकांमध्ये सहभागी होऊ शकतात मात्र ही मुभा कलावंतांना नाही. प्राथमिक फेरीतील कलावंत अंतिम फेरीतही तेच असावेत.
- प्राथमिक आणि अंतिम फेरीमध्ये बॅक स्टेजला कलाकार, तंत्रज्ञ यांच्याशिवाय कोणालाही प्रवेश दिला जाणार नाही.
- सादर होणारी एकांकिका मराठी भाषेत असावी व संहिता परिनिरीक्षण मंडळातर्फे प्रमाणित केलेली असावी, स्पर्धा खुली असून या स्पर्धेत कोणतेही महाविद्यालय, हौशी, प्रायोगिक व व्यावसायिक नाट्यसंस्था सहभागी होऊ शकते.
- अंतिम फेरीकरीता सर्वसाधारण रंगभूषेची व्यवस्था आयोजकांकडून मोफत केली जाईल. विशेष रंगभूषा असल्यास त्याची जबाबदारी स्पर्धक संस्थांनी घ्यावी.
- स्पर्धा शुल्क ₹१०००/- असून एकदा भरलेले प्रवेश शुल्क कोणत्याही कारणास्तव परत दिले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करा → ९८२१३५५२६४
मृणालताई नाट्यकरंडक पारितोषिके
- सर्वोत्कृष्ट एकांकिका प्रथम : चषक व रोख रक्कम ₹३१,०००/-
- सर्वोत्कृष्ट एकांकिका द्वितीय : चषक व ₹२१,०००/-
- सर्वोत्कृष्ट एकांकिका तृतीय : चषक व ११,०००/-
मृणालताई नाट्यकरंडक २०२२ (५ वे वर्ष) — नियमावली व प्रवेश अर्ज येथे उपलब्ध आहे.
सहभागी संघ आणि आयोजकांना रंगभूमी.com कडून मनःपूर्वक शुभेच्छा.