मानवाचा मुख्य हेतू वर्षानुवर्षांपासून प्रगतीकडे वाटचाल करत राहणे हाच राहिला आहे. प्रगती म्हटली की थोडं मागे सोडणं आणि थोडं नवीन पत्करणं आलंच. पण परंपरागत रूढी, परंपरा, संस्कृती, जात, धर्म, अंधश्रद्धा या असल्या बूरसटलेल्या विचारांमध्ये माणूस अडकून पडतो. आणि बदलाव न स्वीकारता बदलावाकडे वाटचाल करणाऱ्यांची तोंड बंद करतो. हे २१ वे शतक जरी असले, तरीही या परिस्थितीत फार बदल पडला नाहीये. पण अजून किती वर्ष हेच चालू राहणार? हे कटू व थेट प्रश्न विचारणारं आणि विचार करायला लावणारं नाटक म्हणजे ‘निशिगंधा व कलासाधना’ प्रस्तुत ‘मोस्ट वेलकम’ हे नाटक!
सुनील हरिश्चंद्र लिखित व दिग्दर्शित ‘मोस्ट वेलकम’ हे नाटक माणसातल्या मानवतावादाला प्रश्न विचारतं. या नाटकाच्या प्रकाशयोजनेची धुरा श्याम चव्हाण यांनी सांभाळली आहे व या नाटकाच्या पार्श्वगायनाची कामगिरी सुमेध उन्हाळेकर यांनी पार पाडली आहे. सिमरन संगीता श्रीकांत, निहारिका स्मिताली राजदत्त, भक्ती भारती रमेश, ऋतिका माया संजय, ऋतिका माधुरी संतोष, संकेत सुवर्णा श्रीधर, विकास मंदा विठ्ठल, प्रणय मयुरी महेंद्र, भावेश वैशाली विलास, अमोल भारती अशोक व सुनील तारामती हरिश्चंद्र हे नाटकातल्या मुख्य भूमिका साकारतायत.
या नाटकाच्या पोस्टरवर कलाकारांची नावे थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडण्यात आली आहेत. त्यांच्या आडनावाचा उल्लेख न करता आई वडिलांची नावं देण्यात आली आहेत. असं करण्यामागचं कारणही या नाटकातच दडलेलं आहे.
सुनील हरिश्चंद्र यांना अस्तित्व आयोजित कल्पना एक अविष्कार अनेक २०२१ या स्पर्धेत त्यांच्या ‘मानलेली गर्लफ्रेंड’ या एकांकिकेसाठी प्रथम पारितोषिक मिळालं होतं. त्याबद्दलचा विस्तृत विडिओ तुम्ही पुढील लिंकवर क्लिक करून बघू शकता.
Kalpana Ek Avishkaar Anek 2021 • Astitva • Ekankika Competition Clips & Interviews • Awards Ceremony
आजकालच्या कलूषीत समाजकारणात व राजकारणात, प्रत्येकाच्या स्वार्थी हेतूसमोर कोणी आडवं आलं तर त्याला संपवलं जातं. पण माणसाला मारून त्याचा विचार मारता येतो का? त्याउलट त्यांची निर्भीडता मागे राहिलेल्यांच्या रक्ता-रक्तात संचारते. हाच विचार घेऊन हे नाटक उभारलं आहे. निर्भीडता हा या नाटकाचा पाया आहे आणि तरुण पिढीमध्ये संपत चाललेल्या या व्यक्तिस्वभावाला पुन्हा जागं करणारं हे एक आवाहन आहे.
येत्या २३ मार्च, २०२२ रोजी रात्री ८:०० वाजता, सावरकर नाट्यगृह, शिवाजी पार्क, दादर येथे, शहिद दिनाचे औचित्य साधून शाहिद झालेल्या हुतात्म्यांना आदरांजली व मानवंदना देत या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग पार पडणार आहे. तेव्हा प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसादात या नाटकाला भेट द्यावी.