तमाम नाट्यकर्मींसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे! आपल्या सगळ्यांच्याच लाडक्या गिरणगावात, रंगकर्मींसाठी हक्काचं असं एक नवं कोरं व्यासपीठ लवकरच उदयास येणार आहे.
गिरगाव येथील बिर्ला क्रीडा केंद्राच्या सुमारे ३ लाख ५० हजार चौरस फूट क्षेत्रावर, मराठी रंगमंच कला दालनासाठी भव्य स्वरूपात पुनर्विकास करून तिथे ‘मराठी नाट्य विश्व‘ या नावाने नाट्यगृह व मराठी रंगभूमी संग्रहालयाची इमारत दोन टप्प्यांमध्ये साकारली जाणार आहे. या इमारतीची झलक दाखवणारा हा व्हिडीओ नक्की बघा.
Marathi Natya Vishwa, Mumbai — Info & Building Preview • मराठी नाट्य विश्व (Sangrahalay + Theatre)
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते वर्षा येथे आज २७ मे रोजी, मुंबईत उभ्या राहणाऱ्या ‘मराठी नाट्य विश्व‘ या नाट्य संग्रहालयाच्या बोधचिन्हाचे अनावरण झाले.
यावेळी आदेश बांदेकर, ऋषिकेश जोशी, राजन भिसे, सखी गोखले आदी कलाकार उपस्थित होते. तसेच, प्रख्यात अभिनेता दिलीप प्रभावळकर, सुबोध भावे, दीपक राजाध्यक्ष, प्रमोद पवार, अभय जबडे, मंगेश कदम आणि राज्य शासनाच्या पुरातत्व व वस्तुसंग्रहालयाचे संचालक तेजस गर्गे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रमुख अभियंता हांडे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे कार्यक्रमात सहभागी झाले. मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, महानगरपालिका आयुक्त इकबाल सिंग, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अश्विनी भिडे हेदेखील समारंभास उपस्थित होते. महानगरपालिकेच्या उपायुक्त (परिमंडळ १) चंदा जाधव, उपायुक्त (उद्याने) किशोर गांधी, प्रमुख अभियंता (विकास नियोजन) महेश कुंटा, नगर अभियंता अतुल पाटील, प्रकल्प सल्लागार शशांक मेहेंदळे, वस्तुसंग्रहालय तज्ञ सखी गोखले हे मान्यवर देखील याप्रसंगी प्रत्यक्ष उपस्थित होते.
“अनेक कल्पना सुचतात पण त्या प्रत्यक्ष अंमलात येतात तो खरा आनंदाचा क्षण असतो. तसा माझा नाटकांशी काही संबंध नाही, पण माझ्या आजोबांनी सामाजिक समस्यांवर नाटके लिहिली होती. आणि त्याकाळी ठाकरेंना थिएटर मिळू नये म्हणून देखिल प्रयत्न व्हायचे आणि मिळालेच थिएटर तर, ते अतिशय अस्वच्छ, आतमध्ये कचऱ्याचे ढिगारे, उंदीर आणि घुशी यांचे साम्राज्य असायचे”, असे यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात म्हटले. पुढे ते असेही म्हणाले की, “नाटक हे केवळ मनोरंजन नाही तर सामाजिक व्यंग आणि समस्यांवर बोट ठेवणारे असते. प्रत्येक राज्यांचे एक वैशिष्ट्य असते. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालला नाटकांची मोठी आणि अभिमानास्पद परंपरा आहे आणि त्यामुळे माझ्या मनात काही काळापासून नाट्य संग्रहालयाची कल्पना होती. काळाच्या या महत्वाच्या पाऊलखुणा जपणे महत्वाचे आहे आणि त्यामुळेच कागदावरून आता प्रत्यक्ष जमिनीवर नाट्य संग्रहालयाचा हा प्रकल्प साकारणार आहे हे अतिशय समाधान देणारे आहे. नव्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून जुनी नाटके रेकॉर्ड व्हावीत.”
नाटकांबद्दलची आस्था व्यक्त करत उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंचा एक किस्साही सांगितला. ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर यांच्या गाजलेल्या हसवाफसवीच्या प्रयोगाची आठवण यावेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितली. हा प्रयोग खास बाळासाहेबांसाठी दिलीपजींनी मातोश्रीवर आयोजित केला होता. बाळासाहेबांना प्रकृतीच्या कारणामुळे नाट्यगृहात जाऊन नाटक बघणे शक्य नव्हते त्यामुळे प्रभावळकर यांनी स्वतः हा प्रयोग घरी येऊन सादर करतो म्हणून सांगितले आणि हा दीड तासांचा प्रयोग दिलीपजी यांनी इतका रंगवला की, बाळासाहेब उत्स्फूर्तपणे म्हणाले, “अरे माणूस आहेस का भूत आहेस तू?”
अशी ही भव्यदिव्य वास्तू खास नाटकांसाठी उभारली जाणार आहे ही बातमी रंगकर्मी व प्रेक्षकांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारी आहे, याबद्दल शंकाच नाही. त्यामुळे, ही वास्तू कधी बांधली जाईल याबद्दल जनतेमध्ये उत्सुकता निर्माण होणं हेही स्वाभाविकच आहे. परंतु, ही वास्तू बांधून कधी पूर्ण होईल याबद्दल अद्याप काहीच कळलेले नाही. आम्हाला याबद्दल बातमी मिळताच आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचवू. त्यासाठी आमच्या वेबसाईटला व इतर सोशल प्लॅटफॉर्मना नक्की सबस्क्राईब आणि फॉलो करा.