कोरोनाच्या अचानक उद्भवलेल्या जागतिक संकटामुळे, तब्बल दीड वर्षे, रंगभूमी आणि पर्यायाने रंगकर्मींचे कामकाज स्थगित झाले होते. मात्र आज हळूहळू का होईना पण रंगभूमी पुन्हा मोकळा श्वास घेऊ लागली आहे. व्यावसायिक व प्रायोगिक अशा दोन्ही स्तरांवर रंगकर्मी पुन्हा नव्या जोमाने कामावर रुजू होऊ लागले आहेत. ‘दादा, एक गुड न्यूज आहे‘, ‘व्हॅक्युम क्लीनर‘, ‘तू म्हणशील तसं‘ अशी काही व्यावसायिक नाटकं सुरू झाली आहेत. तर ‘बार्दो‘ सारखी झी नाट्य गौरव पुरस्कृत प्रायोगिक नाटकंही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अशातच, कित्येक वर्षे तमाम रंगकर्मींच्या मनात अग्रस्थानी असलेली राज्य नाट्य स्पर्धाही डिसेंबरपासून सुरू होईल, अशी घोषणा सांस्कृतिक कार्य मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी केली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी रद्द करण्यात आलेल्या या स्पर्धेचे हे हीरक महोत्सवी वर्ष असणार आहे. म्हणूनच सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या या स्पर्धेत महाराष्ट्रातील १९ केंद्रासह राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धकांसाठीही खुली करण्यात आली आहे. या निर्णयामुळे स्पर्धेचा आवाका नक्कीच वाढणार असून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील हौशी कलाकारही स्पर्धेत भाग घेऊ शकणार आहेत. सर्व संघांसाठी नियम सारखेच असतील. मात्र, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय संघांच्या स्पर्धा ऑनलाईन माध्यमातून घेतल्या जातील असा खुलासाही अमित देशमुख यांनी केला.
या सर्व संघांच्या माध्यमातून जवळपास २०,००० कलाकार २० लाख प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असल्याने या स्पर्धेला विशेष महत्त्व आहे. अनेक रंगकर्मी, संस्था, संघटना यांनी या स्पर्धा लवकरात लवकर घ्याव्यात अशी मागणी केली होती. त्या मागणीस अनुसरून, कोरोना परिस्थितीचा आढावा घेऊन येत्या डिसेंबर पासून संपूर्ण राज्यात नेमून दिलेल्या केंद्रांवर ही स्पर्धा घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. मराठी हौशी नाट्य स्पर्धा, बालनाट्य स्पर्धा, संगीत नाट्य स्पर्धा, संस्कृत नाट्य स्पर्धा, हिंदी नाट्य स्पर्धा, दिव्यांग नाट्य स्पर्धा अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्यातील रंगकर्मींनी या स्पर्धेत जास्तीत जास्त सहभाग घेऊन कोरोना विषयक सर्व नियमांचे पालन करून, प्रयोग सादर करावेत असेही सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आवाहन केले आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या स्पर्धांच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रमही लवकरच घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.
हौशी रंगकर्मींना लॉकडाऊननंतर मिळालेली ही सुखद भेट नक्कीच त्यांचा उत्साह द्विगुणित करेल यात शंकाच नाही.