गेला माधव कुणीकडे, प्रियतमा, भ्रमाचा भोपळा अशा गाजलेल्या मराठी नाटकांतील अभिनेत्री सौ. माधवी गोगटे यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी निधन झाले आहे. मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. कोरोनाच्या संसर्गामुळे त्यांचे निधन झाले असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. या बातमीमुळे संपूर्ण नाट्य, चित्रपट व मालिकांच्या विश्वात शोककळा पसरली आहे.
अभिनेते प्रशांत दामले यांच्यासह ‘गेला माधव कुणीकडे’ तसेच ‘अंदाज आपला आपला’, ‘भ्रमाचा भोपळा’ ही त्यांची काही गाजलेली नाटकं. प्रशांत दामले यांनी फेसबूकवर त्यांच्या या लाडक्या सह-अभिनेत्रीला श्रद्धांजली देत म्हटले आहे की, “सौ माधवी गोगटे… माझी आवडती सहकलाकार. गेला माधव कुणीकडे, प्रियतमा, बे दुणे पाच, लेकुरे उदंड जाली… जवळ जवळ २५०० प्रयोगात आम्ही एकत्र काम केलं. अतिशय मनमिळावू, उत्तम खणखणीत आवाज, विनोदाचे उत्तम टाईमिंग आणि उत्तम स्वभाव. नंतर ती हिंदी सीरिअल मधे खुप बिझी झाली पण मराठी नाटकाची नाळ तुटू दिली नाही. अश्या माझ्या अतिशय आवडत्या सहकलाकाराला परमेश्वराने बोलवून घेतल. अवेळी.. 😔😢😢 हे खुप दुखदायक आहे 😢😢. ॐ शांती 🙏🙏🙏🙏🙏”
माधवी गोगटे अनुपमा
तसेच सध्या त्यांच्या गाजत असलेल्या अनुपमा या मालिकेतील रुपाली गांगुली या अभिनेत्रीने इंस्टाग्रामवर त्यांचे छायाचित्र व एक संदेश देऊन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्या रुपाली गांगुली यांच्या आईच्या भूमिकेत या मालिकेत दिसत होत्या.
माधवी ताईंनी ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्यासोबतही ‘घनचक्कर’ चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे. ‘घनचक्कर’ चित्रपटातील त्यांची भूमिका विशेष गाजली होती. याच चित्रपटानं त्यांना वेगळी ओळख मिळवून दिली. त्यानंतर ‘सत्वपरीक्षा’ या चित्रपटातही त्यांनी काम केले. सूत्रधार चित्रपटाद्वारे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवले. त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. ‘मिसेस तेंडुलकर’, ‘कोई अपना सा’, ‘ऐसा कभी सोचा न था’, ‘एक सफर’, ‘बसेरा’, ‘बाबा ऐसो वर ढुंडो’, ‘ढुंड लेंगी मंजिल हमें’, ‘कहीं तो होगा’ या हिंदी मालिकांमध्येही त्यांनी भूमिका केल्या आहेत. ‘तुझं माझं जमतंय’ या मराठी मालिकेतही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका साकारली होती. नाटक, चित्रपट व मालिका जगताला नेहमीच त्यांची उणीव भासत राहील.
दरम्यान, माधवी यांच्या पश्चात त्यांचे पती आणि विवाहित मुलगी असल्याचं सांगण्यात येतं. देव माधवी गोगटे यांच्या आत्म्याला शांती मिळवून देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना सावरण्यासाठी मानसिक बळ देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!