तुम्हाला कोणी विचारलं की ‘प्रेम म्हणजे काय?’ तर तुमचं उत्तर काय असेल? बरं! हाच प्रश्न तुम्हाला वयाच्या १० व्या किंवा १५ व्या वर्षी विचारला असता तर? किंवा अजून १०-१५ वर्षानंतर विचारला असता तर? तुमचं उत्तर नक्कीच बदललं असतं ना? माणसाच्या आयुष्यात वेळोवेळी घडणाऱ्या घटनांचा, आजूबाजूच्या परिस्थितीचा आणि सभोवतालच्या माणसांचा त्याच्या विचारांवर परिणाम होत असतो.
जर्मन लेखक क्रिस्टो शागोर लिखित, मृण्मयी शिवापूरकर अनुवादित आणि सपन सरन दिग्दर्शित ‘तमाशा थिएटर’च्या ‘लव्ह यू‘ या नाटकातील ज्युलियनच्या बाबतीतही असंच होतं. त्याच्या पालकांचा घटस्फोट होतो. त्यामुळे त्याचा प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. प्रौढावस्थेत एका व्यक्तीचं प्रेम समोरच्या व्यक्तीसाठी असं क्षणार्धात आटून जाऊ शकतं? असा प्रश्न त्याला पडतो. लिया नावाच्या मुलीवर त्याचं प्रेम असतं आणि त्याला त्याच्या प्रेमाबद्दल पूर्ण खात्री असते. पण लिया Love You!… Love You Not! असं त्याला म्हणते. अशावेळी, आपण एखाद्यावर प्रेम करतो म्हणजे नक्की काय? सध्याच्या काळातील प्रेमाची व्याख्या काय? ‘Love You!’ आणि ‘I Love You!’ या दोन वाक्यांमधला नेमका फरक काय? प्रेमाच्या विरुद्धार्थी भावना कोणती?, असे बरेच प्रश्न त्याला पडतात, ज्याबद्दल तो लियाशी चर्चा करतो.
७० मिनिटांच्या ‘लव्ह यू’ दीर्घांकात अवघे १२ वर्षीय ज्युलियन आणि लिया खूपच पुसट फरक असलेल्या परंतु अतिशय महत्वाच्या अशा या विषयांकडे वेगवेगळ्या वयोगटातील लोकांच्या अंगाने विचार करताना दिसतात. जुलियनचे पात्र साकारणाऱ्या शिवराज वायचळ आणि लियाचे पात्र साकारणाऱ्या पर्ण पेठे यांनी या दीर्घांकात तब्बल १४ वेगवेगळ्या व्यक्तिरेखा साकारल्याचे दिग्दर्शिका सपन सरन यांच्याकडून कळले.
१४ मे आणि १५ मे रोजी स्टुडिओ तमाशा, अंधेरी येथे सायंकाळी ७ वाजता हा दीर्घांक सादर होणार आहे व तिकीट विक्री BookMyShow वर सुरू आहे. तुमची प्रेमाची व्याख्या ज्युलियन आणि लियाच्या व्याख्येशी मिळती जुळती आहे का? की त्यांना उकललेली व्याख्या तुमच्या आजवरच्या प्रेमाच्या व्याख्येला हादरवून सोडणार आहे? तुम्हाला एक नवी विचारधारणा शिकवणारी आहे? याचा शोध घ्यायचा असेल तर या दीर्घांकाला नक्की भेट द्या.
‘तमाशा थिएटर’बद्दल थोडंसं…
तमाशा थिएटर आपल्या सभोवतालच्या जगाशी समतोल साधत, रंगभूमीच्या सीमा ओलांडण्यासाठी ओळखले जाते. स्टुडिओ तमाशा हे क्युरेटेड परफॉर्मिंग आर्ट स्पेस म्हणून मुंबईत सुप्रसिद्ध आहे, जिथे समकालीन कलाकृती एका अंतरंग वातावरणात सादर केल्या जातात. तमाशा थिएटरची सह-स्थापना २०१४ मध्ये दिग्दर्शक सुनील शानबाग आणि लेखक, दिग्दर्शक सपन सरन यांनी केली होती.