महाराष्ट्र राज्यात प्रत्येक कलेला महत्व दिले जाते आणि नाट्यसंस्कृती प्रामुख्याने जपली जाते. महाराष्ट्र राज्यात जवळपास प्रत्येक जिल्ह्यात नाट्यगृह उभारण्यात आली आहेत. त्यात मुंबई आणि पुणे शहरात सर्वात जास्त नाट्यगृहं आहेत. या प्रमुख शहरांसह अनेक नगरपालिका कार्यरत आहेत, आणि असेच एक महानगर ओळखले जाणारे शहर म्हणजे मिरा-भाईंदर. जेव्हा महाराष्ट्रात कला जपली गेली तेव्हा त्या सार्थ प्रयत्नांना योग्य व सर्वोत्कृष्ट नाव दिले गेले आणि असेच काहीसे मिरा भाईंदर शहरातही घडले आहे. येथील स्थायिक प्रेक्षकांसाठी एक अवाढव्य नाट्यगृह बांधण्यात आले. बांधकाम तयार असूनही बऱ्याच कालावधीसाठी काही सामाजिक व राजकीय कारणांमुळे या नाट्यगृहाचे उद्घाटन लांबणीवर गेले. पण आता ही प्रतीक्षा संपली आहे. आमदार निधीतून उभारलेल्या लोकार्पण सोहळ्यात या नाट्यगृहाचे उद्घाटन झाले आहे व त्याला भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह अशी ओळख देण्यात आली आहे.
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर नाट्यगृह लोकार्पण सोहळा
११ ऑक्टोबर सकाळी ११ वाजता सुरु झालेल्या या लोकार्पण सोहळ्यात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कलाकारांसाठी नाट्यगृह तर खेळाडू मुलांसाठी स्केटिंग रिंगचे लोकार्पण करण्यात आले, व माननीय चिमाजी अप्पा आणि महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले. तसेच, हॉस्पिटल आणि नवीन महानगरपालिका इमारतीचे भूमिपूजन करण्यात आले. माननीय श्री प्रताप सरनाईक, माननीय श्रीमती गीता जैन आणि आयुक्त तथा प्रशासक दिलीप ढोले यांचीही या सोहळ्यात प्रमुख उपस्थिती होती. यासह मिरा भाईंदर मधील पोलिस आयुक्त, विधनसभा व लोकसभा सदस्य आणि सर्व मनगरपालिका सदस्य व नगरसेवक यांनी या सोहळ्यात सहभागी होऊन सोहळ्याचे वातावरण हर्शमय व उत्साही केले.
Bharatratna Lata Mangeshkar Natyagruha, Mira Bhayander
मिरा रोड येथील महाजन वाडी परिसरात या नाट्यगृहाची उभारणी करून नाट्यप्रेमींची इच्छा पूर्ण करण्यात आली. मिठाई आणि फुलांनी प्रत्येकाचे स्वागत करण्यात आले. लता दीदींच्या गाण्यांच्या मैफिलिने कार्यक्रमाची मधुर सुरुवात झाली. नाट्यगृहात कार्यकर्ते आणि सदस्यांची जमलेली गर्दी लता दीदींच्या गाण्यात हरवून गेले होते. इतर ठिकाणी लोकार्पण आणि भुमिपूजन करून मा. श्री मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे तुतारी वाजवून आगमन करण्यात आले. दीप प्रज्वलन करुन आणि नाट्यगृहाचे फलक अनावरण करून उद्घाटन करण्यात आले. रंगमंचावर हार, पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले. मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या विकास कामांची चित्रफीत दाखवण्यात आले. प्रत्येक नाटकाची सुरुवात ही घंटा वाजवून होते तसेच उद्घाटन सोहळ्यात मा. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घंटा वाजवून शुभारंभ करण्यात आला.
नाट्यगृहाची एकूण आसनक्षमता १३०० आहे व त्यात आधुनिक सोयीसुविधांचा वापर कर्ण्यात आला आहे. उत्तम ध्वनीयंत्रणेसह नाट्यगृहात वायफाय सुविधा उपलब्ध आहे. तसेच, मिनी थिएटर सुद्धा बांधण्यात आले आहे (Lata Mangeshkar Mini Theatre, Mira Road).
माननीय प्रताप सरनाईक नाट्यगृह बांधनीपूर्वीची आठवण सांगताना म्हणाले:
“नाट्यगृह उभारण्याची कल्पना मी ठाण्यावरून घेऊन आलो. ठाण्याला मी २००९ साली आमदार झालो तेव्हा मा. एकनाथ शिंदे साहेब माझ्यासोबत आमदार म्हणून होते. त्यावेळी मा. शिंदे साहेबांच्या मागणीनुसार गडकरी रंगायतन नाट्यगृह असताना झपाट्याने वाढणाऱ्या ठाणे शहराचा विचार करता अजून एक नाट्यगृह बांधण्यात आले. मी त्यावेळेस विचार केले आपल्या ठाणे शहरात दोन नाट्यगृह असताना मिरा भाईंदर शहरात नाट्यगृह का नको? म्हणून शिंदे साहेबांची संकल्पना मी मिरा भाईंदर मध्ये आणली आणि पराग भाई शहा आणि विनोद भोइंका यांना विनंती केली आणि ही वास्तू उभारण्यात आली याचा मला आनंद आहे.”
उद्घाटन सोहळ्यात वाद
हा आनंदी सोहळा पार पडत असताना नाट्यगृहाबाहेर वादाचे वारे वाहू लागले. पूर्व विधायक नरेंद्र मेहता महापौर ज्योत्स्ना हसनाळे, उपमहापौर हसमुख गेहलोत आणि भारतीय जनता पार्टीच्या काही नगरसेवकांना नाट्यगृहात जागेअभावी आत जाण्यापासून रोखण्यात आले. रीतसर आमंत्रण देण्यात आलेले असूनही सोहळ्यात प्रवेश न मिळाल्यामुळे सर्व नगरसेवकांमध्ये संतापाची लाट उसळली. त्यामुळे या नगरसेवकांनी प्रवेशद्वाराबाहेर रस्त्यावर बसून घोषणाबाजी करत या सोहळ्याप्रती निषेध व्यक्त केला.
या कार्यक्रमास १००० हून अधिक लोकांची उपस्थिती होती. प्रत्येक नाटकाच्या प्रयोगाला अशाच प्रकारे हे नाट्यगृह प्रेक्षकांनी भरभराटीस येवो ही रंगभूमी.com कडून सदिच्छा आणि शुभेछा.
[Some photos via their respective owners on Google Maps]
2 Comments
I want to know the rent. Of Lata Mangeshkar Auditorium
मीरा भायांदर सारख्या ठिकाणी नाट्य गृह उभा राहू शकता आणि बदलापूर सारख्या ठिकाणी डोंबिवली पासून पुढे कर्जत पर्यंत एकही नाट्य गृह नाही. बदलापूर ला सर्वात जास्त लोकसंख्या मराठी माणसांची आहे. याचा विचार व्हावा