मराठी सिने-नाट्यसृष्टी आणि हिंदी सिनेसृष्टीमध्ये स्वत:चे एक अढळ स्थान प्रस्थापित केलेले आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे! आज १६ डिसेंबर, २०२१ रोजी त्यांच्या १७ व्या स्मृतिदिनी त्यांच्या पत्नी व अभिनेत्री प्रिया बेर्डे यांच्या हस्ते ‘लक्ष्य कला मंच’ची स्थापना करण्यात आली आहे. बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहातील एका सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाला पुरुषोत्तम बेर्डे, रवींद्र बेर्डे तसेच, लक्ष्मीकांत बेर्डे यांची कन्या स्वानंदी बेर्डे व सुपुत्र अभिनय बेर्डेही उपस्थित होते. लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या दुःखद निधनानंतर, त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ ‘लक्ष्य कला मंच’ उभारण्याचे स्वप्न गेले कित्येक वर्षे आम्ही उराशी बाळगून होतो, असे मनोगत या सर्वच कुटुंबीयांनी व्यक्त केले.
लक्ष्य कला मंच कलेवरच्या प्रेमासाठी आणि कलाकारांच्या हक्कांसाठी उभा करण्यात आला आहे, असे प्रिया बेर्डे यांनी सांगितले. त्या असंही म्हणाल्या की, “लक्ष्य कला मंच ही संस्था, NGO आणि अकादमी अशा तीनही रूपांमध्ये कलाकारांच्या भल्यासाठी स्थापित करण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाडा, खानदेश अशा बऱ्याच ठिकाणच्या तरुणांना अभिनयासोबत तांत्रिक पद्धतीचं प्रशिक्षणही घ्यायची ईच्छा असते. पण, प्रशिक्षण शाळांसाठी आकारली जाणारी फी परवडत नसल्यामुळे त्यांना हे शिक्षण घेता येत नाही. त्यामुळे, हा मंच अशा नवोदित कलाकारांना शिक्षण देऊन चांगले व्यासपीठ मिळवून देईल. तसेच, काही कलाकारांसोबत फसवणूक होत असल्याचे किस्से घडताना दिसून येतात. महिला कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तणुक झाल्याचे आढळते. त्यांच्यासाठीही नाट्य कला मंचातर्फे आवाज उठवला जाईल.”
लक्ष्मीकांत बेर्डे यांच्याबद्दलही त्यांनी नाटक अथवा चित्रपटात काम करणाऱ्या कलाकारांसाठी व बॅकस्टेज कामगार, तांत्रिक टीमसाठी वेळोवेळी आवाज उठवण्याचे किस्से जनमानसात प्रसिद्ध आहेत. त्यांची आठवण काढत ‘नाट्य कला मंच’ हे लक्ष्मीकांत बेर्डे यांचे स्वप्न असल्याचे प्रिया बेर्डे यांनी सांगितले. ते स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच त्यांचे निधन झाले. त्यांचं ते स्वप्न आज १७ वर्षांनी मला पूर्ण करता आलं आहे याचा मला खूप आनंद आहे असेही त्या म्हणाल्या.
आम्ही आशा व्यक्त करतो की ‘लक्ष्य कला मंच’च्या माध्यमातून भरपूर नवोदित कलाकार सिने-नाट्य सृष्टीला मिळतील आणि त्या कलाकारांच्या अभिनयातून आपला लाडका लक्ष्या कायमस्वरूपी आपल्या स्मरणात राहील.