प्रग्यास क्रिएशन्स आणि व्ही. आर. प्रोडकशन्स या नाट्यसंस्थांची नवीन निर्मिती म्हणजेच ‘कुर्रर्रर्रर्र‘ हे नाटक ४ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या नाटकाचे लेखक-दिग्दर्शक प्रसाद खांडेकर आहेत. तर पूनम जाधव आणि विशाखा सुभेदार या नाटकाच्या निर्मात्या आहेत. या नाटकाच्या निमित्ताने विशाखा सुभेदार प्रथमच निर्मातीच्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. प्रसाद खांडेकर, नम्रता संभेराव, विशाखा सुभेदार आणि पंढरीनाथ (पॅडी) कांबळे हे अभिनेते या नाटकात आपल्याला दिसणार आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केलेले असून संगीत अमीर हडकर यांचं आहे. नाटकाचे सूत्रधार अनेक नाटकांचे व्यवस्थापक गोट्या सावंत हे आहेत.
रंगभूमी.com च्या संपूर्ण टीमने ‘कुर्रर्रर्रर्र’ च्या सर्व कलाकारांशी नाटकाची तालीम सुरु असताना भेट घेतली. नाटकाचे लेखक, दिग्दर्शक प्रसाद खांडेकर यांनी नाटकाबद्दल सांगितले की, “हे नाटक माय-लेक, सासरा-जावई, नवरा-बायको, सासू-जावई अशा नात्यांमधील गोडवा दाखवणारं एक प्रेमळ नाटक आहे. तसंच हे नाटक प्रत्येकाला स्वतःच्या आयुष्यातील चांगले क्षण आठवून देईल. माझ्या डोक्यात बरीच वर्षे एक कथा रेंगाळत होती आणि लॉकडाऊनमध्ये मी वेळ घेऊन त्या कथेवर काम केलं. कथा ऐकताच विशाखाने माझ्यावर विश्वास दाखवून या नाटकाची निर्मिती करण्याची तयारी दर्शवली हे मी माझं भाग्य समजतो.”
लग्नाला ५ वर्षे झालेल्या एका विवाहित जोडप्याची ही कथा आहे. प्रसाद खांडेकर आणि नम्रता संभेराव यांनी या जोडप्याची भूमिका साकारली आहे. लग्नाच्या पाच ५ वर्षांनंतरही त्यांना बाळ झालेलं नसतं आणि नायिकेची आई म्हणजेच विशाखा सुभेदार हिने मुलीच्या पाठी तगादा लावलेला असतो की तुम्ही प्रयत्न करा. पॅडी कांबळे नाटकात काय करतोय ही एक गंमत असणार आहे. ते बघायला तुम्हाला नाट्यगृहातच यावं लागेल असं नाटकाच्या निर्मात्या व अभिनेत्री विशाखा सुभेदार यांनी रंगभूमी.com च्या टीमशी बोलताना सांगितले.
प्रथमच निर्मातीच्या रुपात आपल्या भेटीस येणाऱ्या विशाखा सुभेदार यांनी प्रेक्षकांना आवाहन केले आहे की हे नाटक बघायला प्रेक्षकांनी आवर्जून यावे. या नाटकामध्ये नात्यांमधील गोडवा आहे, विनोद आहेत, कथेला पूरक अशी गाणी आहेत, नृत्य आहेत. त्यांच्या निर्मितीक्षेत्रातील पहिल्या वहिल्या अनुभवाबद्दल सांगताना त्या म्हणतात की, “ही आत्ताशी सुरुवात आहे. हे विश्व माझ्यासाठी खूपच नवीन आहे. मला सगळ्यांकडूनच खूप शिकायला मिळत आहे. २०२१-२२ हे माझ्यासाठी शिकण्याचं वर्ष असणार आहे. सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागत आहे. त्यांचे मूड सांभाळून घ्यावे लागत आहेत. मला अजून थोडं हुशार व्हावं लागेल कदाचित! गोट्या काकाही मला अधून मधून निर्मितीबद्दलचे डोस पाजत असतात.”
नाटकामध्ये सचिन पिळगांवकर यांनी स्वत:च्या आवाजात गायलेलं एक सुंदर गाणंही आहे.
एक निर्माती म्हणून त्यांनी सरकारला आवाहन केले आहे की, “लॉकडाऊनच्या काळात नाट्यसृष्टी आर्थिकदृष्ट्या डळमळीत झाली आहे. त्यामुळे लॉकडाऊननंतर नाटकाच्या निर्मिती प्रक्रियेमध्ये सरकारने आम्हा नाटकवाल्यांना काही सवलती दिलेल्या आहेत. नाट्यसृष्टी पुन्हा स्थिरस्थावर होण्यासाठी अजून २ वर्षे तरी लागतील. त्यामुळे मी विनंती करते की सरकारने या सवलती आम्हाला अजून १ ते २ वर्षे तरी द्याव्यात.”
पुढील लिंकवर नाटकाची तिकीट विक्री सुरू आहे.
https://in.bookmyshow.com/plays/kureee/ET00318509
‘कुर्रर्रर्रर्र’च्या संपूर्ण टीमने प्रेक्षकांना आवर्जून सांगितले आहे की, “आमच्या या नव्या बाळाची ४ डिसेंबर रोजी नाट्यगृहात डिलिव्हरी आहे. त्याचं कौतुक करायला तुम्ही नक्की या.”