रंगभूमीची मध्यवर्ती संघटना, अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद (कोल्हापूर शाखा) आयोजित, सांस्कृतिक महोत्सव हा नुकताच कोल्हापुरात दिनांक ४,५ व ६ ऑक्टोबर २०२४ रोजी मोठ्या उत्साहाने पार पडला. या महोत्सवाची सुरुवात ही शुक्रवार ४ ऑक्टोबर पासून झाली. महोत्सवाचे प्रथम कार्यक्रम हे ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा’ आणि ‘संकर्षण व्हाया स्पृहा’ हा प्रयोग असे होते. पुढच्या दिवशी शनिवारी ५ ऑक्टोबर ला ‘नवस’ एकांकिका आणि ‘अमेरिकन अल्बम’ हे दोन अंकी मराठी नाटक सादर झाले. त्यानंतर महोत्सवाचा अंतिम दिवस ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ हे दोन अंकी मराठी संगीत नाटक सादर झाले. सर्व कार्यक्रम आणि नाट्य प्रयोगांना कोल्हापूरच्या प्रेक्षकांनी तुडुंब प्रतिसाद दिला. हा संपूर्ण महोत्सव गायन समाज देवल क्लब, गोविंदराव टेंबे रंगमंदिर येथे पार पडला. विशेष म्हणजे या सलग तीन दिवस सुरू असलेल्या सांस्कृतिक महोत्सवात ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी उपस्थित होते.
याच वर्षी सुरू झालेल्या संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्काराचे प्रथम मानकरी हे ज्येष्ठ अभिनेते डॉ. शरद भुताडिया ठरले. “या पुरस्कारासाठी प्रथम मानकरी हे अगदी योग्यच!” असा प्रेक्षकांचा व मान्यवरांचा प्रतिसाद दिसून आला. शुक्रवार ४ ऑक्टोबर ला आयोजित केलेला हा संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार प्रदान सोहळा दुपारी ३:३० वाजता सुरू होणार होता. मात्र तो सायंकाळी ५:३० च्या सुमारास सुरू झाला. दोन तास कोल्हापुरी प्रेक्षक खोळंबला होता. याचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्राचे उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते या सोहळ्याचे उद्घाटन होते. पण ते थेट मुंबई वरून आले असून त्यांना ट्रॅफिक मुळे उशीर झाल्याने हा सोहळा उशिरा सुरू झाला. त्यांच्या मनोगतात त्यांनी या घडलेल्या कृत्याची कोल्हापूरकरांकडे माफी देखील मागितली. उद्योग मंत्री उदय सामंत यांनी १०१ वे नाट्य संमेलन देखील कोल्हापुरातच होणार याची ग्वाही दिली. या पुरस्कार सोहळ्यानंतर संकर्षण व्हाया स्पृहा हा प्रयोग सुरू होणार होता. मात्र त्यालाही फार उशीर झाला असून, दोन तास खोळंबलेल्या कोल्हापूरकरांना खुश केले ते ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांनी. मोजो यांनी अगदी चार ते पाच वाक्यात आपले मनोगत संपवले, आणि संकर्षण व्हाया स्पृहा हा प्रयोग लवकर सुरू होण्यास मदत केली. संकर्षण व्हाया स्पृहा याचा हा १०० वा प्रयोग अगदी १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त जुळून आला होता. कोल्हापूरकरांना स्पृहा आणि संकर्षणच्या कवितांनी अगदी भुरळ घातली. ‘स्पृहाच्या चॉकलेटचा बंगला’ या गाण्याला नेहमी प्रमाणे वन्स मोअर मिळाला, आणि संकर्षणला ‘मत वाया गेलंय!’ ही त्याची कविता सादर करण्यासाठी प्रेक्षकांनी आग्रह केला. विशेष म्हणजे संकर्षण व्हाया स्पृहा या प्रयोगाला दोन तास उशीर झाला असून देखील कोल्हापूरकरांनी संपूर्ण प्रयोग संपेपर्यंत आपली जागा सोडली नाही!
शनिवार ५ ऑक्टोबर ला सकाळी, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा २०२४ च्या अंतिम फेरीत १०३ एकांकिकांमधून प्रथम क्रमांक पटकावणारी विजेती एकांकिका, ‘नवस’ सादर झाली. बीड जिल्ह्याच्या या एकांकिकेला कोल्हापूरकरांनी सुंदर प्रतिसाद दिला. सायंकाळी रसिकमोहिनी आणि अफ अफ टी जी निर्मित, दोन अंकी भावस्पर्शी मराठी नाटक, ‘अमेरिकन अल्बम’ सादर झाले. याही नाटकाला प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. विशेषतः कोल्हापूरच्या ज्येष्ठ नागरिकांना हे नाटक फार आवडले.
रविवार ६ ऑक्टोबर ला सायंकाळी नाट्यसंपदा कलामंच निर्मित, दोन अंकी संगीत नाटक, ‘गोष्ट संयुक्त मानापमानाची’ हे नाटक सादर झाले. या नाटकाचा हा तिसराच प्रयोग होता. ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि अभिनेते डॉ. शरद भुताडिया यांच्या हस्ते या नाटकाला तिसरी घंटा देण्यात आली. बालगंधर्व आणि संगीतसूर्य केशवराव भोसले यांचं नातं उलगडणारं हे संगीत नाटक कोल्हापूरकरांनी अक्षरशः डोक्यावर घेतले. दोन्ही अंकांना प्रेक्षकांचा तुडुंब प्रतिसाद होता. संगीतसूर्य केशवराव भोसले, लेखक अभिराम भडकमकर, दिग्दर्शक ऋषिकेश जोशी आणि इतर काही कलाकार मंडळी हे सर्वजण कोल्हापुरच्याच मातीतले असल्याने संपूर्ण प्रेक्षकगृहात अभिमानाचे वातावरण होते. “पुन्हा या नाटकाचा जेव्हा तिकीट लाऊन प्रयोग होईल तेव्हा देखील असाच प्रतिसाद द्या!” अशी मिश्किल विनंती दिग्दर्शक ऋषिकेश जोशी यांनी कोल्हापूरकरांना केली.
अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या १०० व्या नाट्य संमेलनानिमित्त हा सांस्कृतिक महोत्सव फार उत्साहाने पार पडला. पुढील वर्षाच्या १०१ व्या नाट्य संमेलनासाठी सर्वजण उत्सुक आहेत.