संसार जसा जुना होत जातो तसा निरस होत जातो. आयुष्यात काही नाविन्य राहात नाही आणि संसाराच्या पलीकडे जाऊन एका तिसऱ्या व्यक्ती बरोबर नवोदित आनंद शोधण्याचा प्रयत्न बरेच जण करतात. पण हे करत असताना आपल्या जोडीदाराला हे कळणार तर नाही ना? ह्याची टांगती तलवार सतत त्यांच्या डोक्यावर लटकत असते. जर त्यांच्या जोडीदारांना या विवाहबाह्य संबंधांबद्दल कळलं तर? काय गोंधळ उडेल? त्यांची प्रतिक्रिया काय असेल? या सगळ्या प्रश्नांनी जर तुमची उत्कंठा वाढली असेल, तर बदाम राजा प्रोडकशन्स निर्मित ‘खरं खरं सांग..!‘ हे नवोदित नाटक तुम्हाला नक्कीच बघायला आवडेल.
माधुरी गवांदे आणि निनाद कर्पे निर्मित व विजय केंकरे दिग्दर्शित ‘खरं खरं सांग..!‘ हे नाटक विवाहबाह्य संबंधांवर भाष्य करतं. या नाटकाचे लेखन नीरज शिरवईकर यांचे आहे.
नीरज शिरवईकर लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकाचेसुद्धा प्रयोग सध्या जोरात सुरू आहेत. ‘अ परफेक्ट मर्डर’ या नाटकाबद्दल तुम्ही येथे वाचू शकता.
अ परफेक्ट मर्डर [Review] — अ परफेक्ट ‘थ्रीलर’
‘खरं खरं सांग..!’ या नाटकाच्या मुख्य भूमिकांमध्ये आपल्याला आढळतात ते आपले लाडके आणि सुप्रसिद्ध कलाकार, आनंद इंगळे, ऋजुता देशमुख, राहुल मेहेंदळे आणि सुलेखा तळवलकर. या नाटकाच्या नेपथ्याची धुरा प्रदीप मुळ्ये यांनी सांभाळली आहे. त्याचबरोबर या नाटकाचं संगीत अजित परब यांचं आहे आणि दीपक जोशी व नितीन नाईक या नाटकाचे सूत्रधार आहेत. नाटकातल्या कलाकारांची वेशभूषेची बाजू मंगल केंकरे यांनी सांभाळली आहे.
हे नाटक आहे अंकुर आणि इरा या दोन व्यक्तींचं ज्यांचा परस्पर विवाहबाह्य संबंध असतो. आपल्या प्रेमातला कमी होत जाणारा रोमांच वाढवण्यासाठी ते दोघं एक शनिवार रविवार बाहेर जायचा बेत आखतात. ते आप-आपल्या जोडीदारांना खोटं कारण देतात आणि त्यांना गंडवलं या खुशीत असतात. पण खरंतर, ते त्यांच्या जोडीदारांनी त्यांना पकडण्यासाठी रचलेल्या जाळ्यात खोलवर गुंतत जातात. जेवढा सोडवण्याचा प्रयत्न करत, तेवढेच ते आत गुरफटत जात. या गोंधळाचे स्वरूप प्रेक्षकांसाठी हास्यात बदलते जेव्हा अंकुर आणि इरा पकडले जाऊ नये म्हणून लपवाछपवीच्या नविन थरांवर पोहोचतात.
‘खरं खरं सांग..!‘ हे नाटक विवाहबाह्य संबंधांवरचा एक मनोरंजक दृष्टिकोन आहे. येत्या शुक्रवारी, ११ मार्च २०२२, रोजी, ‘खरं खरं सांग..!‘ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग आहे. गडकरी रंगायतन, ठाणे, येथे दुपारी ४.३० वाजता या नाटकाचा पहिला प्रयोग पार पडेल. दुसऱ्या दिवशी, शनिवारी, १२ मार्च २०२२, रोजी दीनानाथ नाट्यगृह, पार्ले, येथे नाटकाचा दुसरा प्रयोग दुपारी ४ वाजता पार पडेल.
तेव्हा प्रेक्षकांनी या नाटकाचा मनापासून आस्वाद घ्यावा आणि आपल्या जवळच्या नाट्यगृहात जाऊन ‘खरं खरं सांग..!‘ हे नाटक नक्की पहा!
संपर्क – ९५९४४६७३५४
तुम्ही www.bookmyshow.com या वेबसाईटवरून तिकिटं बुक करू शकता.