‘खरा इन्स्पेक्टर मागावर’ हे नाटकाचं नाव वाचून तुम्हाला यात चोर पोलिसाचा खेळ असेल किंवा ही एखादी मर्डर मिस्टरी असेल याचा अंदाज आलाच असेल. ‘आजकल’ची प्रस्तुती असलेल्या या नाटकात खून, पोलीस आणि खुनी अशी साखळी आहे. पण, संपूर्ण घटनेकडे बघण्याची किंवा संपूर्ण घटना प्रेक्षकांना दाखविण्याची पद्धत एकदम वेगळी आहे. समीक्षकाच्या चष्म्यातून या नाटकातील रहस्य प्रेक्षकांसमोर उलगडत जातं. म्हणजे नाटक सुरू आहे आणि समीक्षकही हजर आहेत… रंगमंचावरच!
Khara Inspector Magavar
‘खरा इन्स्पेक्टर मागावर’ हे नाटक टॉम स्टॉप्पार्ड नामक लेखकाच्या ‘रिअल इन्स्पेक्टर हाऊंड’ या इंग्रजी नाटकाचे भाषांतर आहे. हा इंग्रजी नाटककार त्याच्या बौधिक खोली, शब्दखेळ, विचारप्रधान पण भावनिक आणि तरीही हसवणाऱ्या अशा अनोख्या शैलीसाठी ओळखला जातो. या नाटकात, दोन समीक्षक हे नाटक पाहताना आणि त्यातील प्रत्येक क्षणाचे परीक्षण करताना दिसतात. एका हवेलीत खून होतो आणि हवेलीतील प्रत्येकजण संशयित ठरवला जातो. या ‘गूढ’ कथेत एका पोलिसांची एंट्री होते आणि कथानक अधिकच ‘गूढ’ वळणे घेऊ लागतं. तो खार इन्स्पेक्टर असतो का? आणि खुनी कोण असतं? हे सगळं जाणून घेण्यासाठी या नाटकाला अवश्य भेट द्या.
येत्या ५ मे रोजी सायंकाळी ७ वाजता श्रीराम लागू रंग-अवकाश, पुणे येथे या नाटकाचा पुढील प्रयोग सादर होणार आहे. तिकीट विक्री फोनवर आणि ऑनलाइन पद्धतीने सुरू आहे.
फोन बुकिंग : ८४२१००४४६४
ऑनलाईन बुकिंग: Ticket Khidakee
या नाटकाचे भाषांतरकार चिन्मय देव व अमेय यांना मूळ इंग्रजी नाटकातील पुढील तीन प्रमुख गोष्टींमुळे या नाटकाचं मराठीत भाषांतर करावंसं वाटलं. प्रेक्षक आणि नाटक ह्या दोन अवकाशांमध्ये होणारी सरमिसळ, इंग्रजी भाषेत त्याने केलेले शब्द खेळ आणि शैली ची केलेली खिल्ली. भाषांतर करताना त्यांनी काही पात्रांची नावं बदलली आहेत. काही संदर्भ बदलले आहेत. पण, कथेत आणि कथानकात अजिबात बदल केलेले नाहीत. कारण, ते त्यांना मूळ अवस्थेतच परिपूर्ण वाटलं.
दिग्दर्शक अमेय सांगतात की हे नाटक अतिशय गमतीशीर असल्यामुळे मला करावंसं वाटलं. वर वर अतिशय सोप्पं दिसत असलं तरी खूप गुंतागुंतीचं आहे. नाटकात काय नाटक आणि काय नाही हे धूसर होत जातं. हे नाटक प्रेक्षक-समिक्षक-नट ह्या नात्याची चिकित्सा करू पाहतं. मूळ नाटक एका विशिष्ट पद्धतीच्या नाटकाची आणि समिक्षेची तर उडवू पहातं. नाटकातील अभिनय शैलीच्या अभ्यासासाठी दिग्दर्शकाने १९५०-७० मधल्या फिल्म्सच्या मेलोड्रामा पद्धतीचा विचार केला आहे. नेपथ्य, प्रकाशयोजना आणि संगीत यांच्याद्वारे सुद्धा हाच हेतू साधण्याचा प्रयत्न नाटकाच्या टीमने केलेला आहे.
या नाटकात ऋषिकेश कळसकर, निखिल पाटील, समृद्धी दंडगे, ईशा सजंय, विशाल वांगेकर, संकेत जगदाळे, समीर मोहोळ, चिन्मय देव, संतोष नाईक हे कलाकार आहेत. नाटकाचेनेपथ्य आदित्य संतोष यांचे आहे. प्रकाशयोजना निरंजन गोखले यांनी केळी आहे. संगीत नुपूरा निफाडकर यांचं आहे. ध्वनी आरेखन शिवम देशमुख याने केले आहे. वेशभूषेची सूत्रे ईशा संजय सांभाळत आहे. निर्मिती व्यवस्थापक अभिनव जेऊरकर आहेत. रंगमंच व्यवस्था विशाल वांगेकर सांभाळत आहेत. प्रकाश संयोजन राजेश गाडगे, अजय इंगळे व मानस दाते यांचे आहे. संगीत संयोजन विनोद गरुड व सागर डहाळे यांचे आहे.
एक आगळंवेगळं रहस्यप्रधान नाटक बघायचं असेल तर ‘खरा इन्स्पेक्टर मागावर’ या नाटकाला अवश्य भेट द्या. तिकीट विक्री Ticket Khidakee वर सुरू आहे.