रत्नाकर मतकरी लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित ‘काळी राणी’ या नाटकाला पहिल्यांदा भेट देणार होते तेव्हा सहज कानावर आलं होतं की, ‘या नाटकाच्या विषयाला मरण नाही’. उत्कंठा वाढली. नाटक बघितलं आणि त्या सहज कानावर पडलेल्या शब्दांची प्रचिती आली. खरंच या नाटकाला अजिबात मरण नाही. कारण, नाटकाचा विषय आहे बॉलिवूड! चित्रनगरी! मायानगरी… स्वप्ननगरी. या नाटकातून ८० च्या दशकातील बॉलिवूडचं दर्शन घडतं. स्वप्ननगरीत कित्येक जण रोज स्वतःचं नाशिब आजमावताना दिसतात. चालतात. धडपडतात. पडतात. पुन्हा नव्या जोमाने उभे राहतात. अशी कोणती भुरळ घालते ही चित्रनगरी की भले भले आपलं कुटुंब, घर, आपली जवळची माणसं सोडून चित्रनगरीकडे धाव घेतात? अगदी एका मिनिटासाठीही पडद्यावर झळकता यावं याकरिता नटनट्या ‘काय वाट्टेल ते’ करण्यासाठी तयार होतात. पण तसं करुनही, पैसा, मान, प्रतिष्ठा आणि एक शानदार आयुष्य!, ही सगळी स्वप्नं इथे पूर्ण होतात? मायानगरीचं हेच बीभत्स रुप ‘काळी राणी’ या नाटकातून रत्नाकर मतकरी यांनी दाखवून दिलं आहे. या नाटकाचे प्रयोग काही कारणास्तव काही काळासाठी स्थगित झाले होते. परंतु, आज हे नाटक नव्याने रंगभूमीवर तुमच्या भेटीसाठी सज्ज झाले आहे! या नाटकाला २० जुलै रोजी काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे ८:३० वाजता अवश्य भेट द्या.
Kaali Rani Marathi Natak Video
साम दाम दंड भेद अशा सर्व शक्तींचा वापर करुन बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या दोन नवोदित कलाकार, आणि एक यशस्वी चित्रपट निर्माता यांची गोष्ट म्हणजे मल्हार आणि दिशा निर्मित, रत्नाकर मतकरी लिखित आणि विजय केंकरे दिग्दर्शित नाटक काळी राणी! नाटकात नक्की कोण कोणाचा फायदा उठवतं? आणि कुठे पोहोचतं? त्यासाठी त्यांना काय किंमत मोजावी लागते? असा सगळा रंजक सापशिडीचा खेळ या नाटकात बघायला मिळतो.
गिरीश ओक, मनवा नाईक, हरीश दुधाडे यांच्या प्रमुख व्यक्तिरेखा असलेलं हे नाटक आपल्याला थेट ८० च्या दशकात घेऊन जातं. या तीन प्रमुख व्यक्तिरेखांसोबतच चंद्रलेखा जोशी, प्रदीप कदम आणि आनंद पाटिल या सपोर्टिव कलाकारांची कामेही चोख आहेत. बॉलीवूड अर्थात झगमगत्या मायानगरीचं काळंबेर वास्तव या नाटकातून बघायला मिळतंय. थरार, रोमांच, गूढ अशी खेळी खेळत तुम्हाला गुंतवून ठेवणारी काळी राणी एक ग्लॅमरस अनुभव देउन जाते. लेखन, अभिनय, दिग्दर्शन, नेपथ्य, नृत्य, गाणी, रंगभूषा, वेशभूषा आणि निर्मिती अशा सर्व स्तरांवर प्रेक्षकांना खूश करुन टाकणाऱ्या या नाटकाला २० जुलै रोजी काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, ठाणे येथे ८:३० वाजता अवश्य भेट द्या.