‘आई कुठे काय करते?’ या गाजलेल्या मालिकेने नुकताच प्रेक्षकांचा निरोप घेतला. मात्र, माधुराणी गोखले प्रभुलकर पुन्हा एका वेगळ्या रूपात आपल्या भेटीला येत आहे. रूपक निर्मित ‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ या आगळ्या-वेगळ्या संगीत-चित्र-नाट्य अभिवाचनाच्या कार्यक्रमाद्वारे ती प्रेक्षकांना नव्या आध्यात्मिक प्रवासावर घेऊन जाणार आहे.
पुण्यातील दमदार शुभारंभानंतर, आता मुंबईत पहिला प्रयोग!
त्या नामातच माझे जीवन सामावले रे…
पुण्यात आपल्या पहिल्या प्रयोगाने रसिकांची मने जिंकून आता हा नाट्यप्रयोग २२ मार्च रोजी रात्री ९ वाजता माटुंग्यातील यशवंत नाट्यमंदिरात सादर होणार आहे.
मागे बसा किंवा पुढे… अनुभव अविस्मरणीय!
या नाट्यानुभवाचं हे प्रमुख वैशिष्ट्य आहे, असं म्हणता येईल. संपूर्ण कार्यक्रमात संगीत आणि अभिनयासोबत अनुरूप चित्रांचा वापर करण्यात आला आहे. ही चित्रे स्क्रीनवर दाखवून संपूर्ण प्रेक्षागृहात असा काही माहौल बनतो की, तुम्ही नाट्यगृहात कुठेही बसला असाल तरी ही कलाकृती तुम्हाला परिपूर्ण आनंद देऊन जाते. ही छायाचित्रे रेखाटली आहेत मिलिंद मुळीक यांनी
‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ – शब्द, संगीत आणि भक्ती यांचा अद्वितीय संगम
या नाट्यानुभवाबद्दल विचारले असता, दिग्दर्शक अमित वझे यांनी काही ओळी सादर केल्या. त्या अशा होत्या.
योग यावा लागतो… तो आला की ज्याचा त्याचा विठ्ठल ज्याला त्याला भेटतोच..!
विठोबाची प्राप्ती प्रत्येकाला त्याच्या भक्तीप्रमाणे होते. प्रत्येकाने विठोबाला वेगवेगळ्या रूपात अनुभवलं आहे.
संत तुकाराम, ज्ञानेश्वर, नामदेव, जनाबाई यांनी विठ्ठलाला आळवले तेव्हा त्यांनी कधी प्रेमाने, कधी रुसव्याने, तर कधी आर्ततेने त्याला साद घातली. प्रत्येक भक्तासाठी विठ्ठल वेगळा असतो. कोणासाठी तो सखा, कोणासाठी तो पालक, कोणासाठी अध्यात्माचा आधार, आणि कोणासाठी आत्मशोधाचा दीपस्तंभ.
माझा विठोबा खेळिया,
कधी नामाच्या तरंगात,
कधी भक्तीच्या ओढीत!”
‘ज्याचा त्याचा विठ्ठल’ हा केवळ एक नाट्यप्रयोग नाही, तर ते भक्तिरसाचे अमृतस्नान आहे.
विठोबाच्या पायी झुकावा…!
याच भक्तिरसात मधुराणी गोखले प्रभुलकर आपल्या प्रभावी अभिनयाने आणि अभिवाचनाने रसिकांना गुंतवून ठेवणार आहे.
‘प्रिय भाई… एक कविता हवी आहे’ आणि ‘कवी जातो तेव्हा’ नंतरचा नवा सोहळा!
या कलाकृतीचे मूळ लेखक डॉ. समीर कुलकर्णी असून, दिग्दर्शन अमित वझे यांनी केले आहे.
अमित वझे यांनी याआधीही ‘प्रिय भाई… एक कविता हवी आहे’ आणि ‘कवी जातो तेव्हा’ यांसारख्या अविस्मरणीय कलाकृती दिल्या आहेत.
मुंबईकरांनो, हा अनोखा अनुभव चुकवू नका!
“जेवढे रिकामे याल, तेवढे भरून जाल…”, असं नाटकाच्या संपूर्ण टीमचं समस्त प्रेक्षकवर्गाला आवाहन आहे.
हरि मुखे म्हणा, हरि मुखे म्हणा!