मराठी नाट्यसृष्टीतील प्रत्येक नाटकाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले, सामाजिक परिस्थितीची जाणीव करून दिली. असेच एक प्रसिद्ध नाटक ‘अधांतर‘ पुन्हा रंगभूमीवर दिसणार आहे. यंदाच्या वर्षी या नाटकाला २५ वर्ष पूर्ण होत आहेत म्हणून या निमित्ताने अधांतरचे २५ प्रयोग होणार आहेत. या रौप्य महोत्सवाची निर्मिती प्रयोगशाळा करत असून नाटकमंडळी याचे सादरीकरण करणार आहेत. जयंत पवार लिखित आणि मंगेश कदम यांनी दिग्दर्शन केलेल्या नाटकातील जुने कलाकार पुन्हा पात्र साकारताना दिसणार? की नवीन कलाकार सहभागी होणार? हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
जयंत पवार
जयंत पवार हे एक पत्रकार, मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक होते. २९ ऑगस्ट, २०२१ रोजी दीर्घकालीन आजारामुळे त्यांचे दु:खद निधन झाले. पण त्यांनी लिहिलेले साहित्य आजही प्रेक्षकांच्या मनावर गारुढ करून आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. जयंत पवार यांना २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या ’फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी मिळाला. जयंत पवार यांनी ‘वंश’, ‘अधांतर’, ‘माझं घर’, ‘काय डेंजर वारा सुटलाय’, ‘टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन’ अशी नाटके केली आहेत. तसेच १५ एकांकिका त्यांनी लिहिल्या आहेत. ‘अधांतर’, ‘काय डेंजर वारा सुटलाय’, ‘टेंगशेच्या स्वप्नात ट्रेन’ (दीर्घांक), ‘दरवेशी’ (एकांकिका), ‘पाऊलखुणा’ (वंश या नाटकाचे व्यावसायिक रूप), ‘फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ (कथासंग्रह), ‘बहुजन संस्कृतिवाद आणि लेखक’ (भाषाविषयक), ‘माझे घर’, ‘वरनभातलोन्चा नि कोन नाय कोन्चा’ (कथासंग्रह), ‘वंश’, ‘शेवटच्या बीभत्साचे गाणे’ (दीर्घांक), ‘होड्या’ (एकांकिका) याचे लेखन त्यांनी केले होते. या कलाकृती लक्षात राहण्या सारख्या आहेत.
अधांतरचा प्रवास
१९९५ साली हे नाटक अधांतर लिहले आणि ८ ऑगस्ट १९९७ रोजी अधांतरचा शुभारंभाचा प्रयोग झाला. प्रेक्षकांची पसंती मिळवत ४९ पुरस्कार मिळवले. जयंत पवार लिखित ‘अधांतर’ गिरणी कामगारांच्या संपावर भाष्य करणारे कौटुंबिक नाटक आहे. या नाटकात भरत जाधव, संजय नार्वेकर, राजन भिसे, ज्योती सुभाष, सविता मालपेकार, लीना भागवत, अनिल गवस यांनी भूमिका साकारल्या आहेत. २०१० साली महेश मांजरेकर दिग्दर्शित लालबाग परळ सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीस आला आणि २०१६ मध्ये अधांतर नाटकावरून वाळवी एकांकिका रंगभूमीवर सादर झाली. आता २०२२ मध्ये हे नाटक रंगभूमीवर सादर होणार आणि नवीन कलाकारांशी जोडले जाणार.
हेमंत भालेकर म्हणजेच अधांतरमधील सतीश यांनी पुढील शब्दांत सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
जयंत पवार यांच्या स्मृतीस अर्पण. रसिक हो. ८ ऑगस्ट १९९७ ला अधांतर चा शुभारंभ झाला होता. त्या नंतर तब्बल ४९ पुरस्कार या नाटकाला प्राप्त झाले. हा विक्रम अजुन आबाधीत आहे. आज अधांतर ला आज २५ वर्ष पूर्ण झाली. आज ही अधांतर म्हटलं की त्या बरोबर त्यात काम करणाऱ्या कलाकार, तंत्रज्ञांची सगळ्यांचीच नावं जोडली गेली आहेत. या रौप्य मोहोत्सवी वर्षा निमित्त “अधांतर” नाटक पाहिलेल्या प्रत्येक रसिकांनीही त्यांचे या नाटकाचे अनुभव सोशल मिडीयावर मांडले तर एका आगळ्या पध्दतीने “अधांतर” या नाटकाचं रौप्य महोत्सवी वर्ष साजरे होईलं. या वर्षभरात नव्या संचात अधांतरचं मंचन करायचा मानस आहे. त्यांच्या पाठिशी तुमच्या शुभेच्छा असुदेत. अधांतर या नाटकातीलं कलाकार ,तंत्रज्ञ, निर्माते, दिग्दर्शक, लेखक यांचा मी मनपूर्वक ऋणी आहे. या नाटकात मला सामावून घेतलं. आणि मला अभिमान आहे ,अशा एका विक्रमी नाटकाचा मी एक भाग आहे. “अधांतर” ने व्यक्तीगत मला खूप काही दिले व्यावसायिक रंगभूमी पासून दूर जावू पहाणाऱ्या मला पुन्हा तिथेच घट्ट रुजवले. सावरले, सांभाळले, फुलवले. आजही इतक्या वर्षा नंतर रस्त्यावरुन चालत असताना. किंवा ट्रेन मध्ये कुणीतरी “अधांतर” पाहिलेला एखादा नाटकवेडा भेटतो. आणि येवून थेट विचारतो. “अधांतर” नाटका मधले ‘सतिश’ ना तुम्ही!!! त्याक्षणी मी जगातला सर्वात श्रीमंत माणूस असतो. मला हेमंत भालेकर या नावाने न ओळखता, कुणी जेव्हा नाटकातल्या व्यक्तीरेखेच्या नावान ओळखतातं, तेव्हा मला त्या व्यक्तीरेखेला न्याय दिल्याच समाधान मिळतं. असचं सांगत राहीलो. तर आठवणी संपायच्या नाहीत. आज या आनंदाच्या क्षणी या विक्रमी नाटकाचे लेखक जयंत पवार यांच आज नसणं मन अस्वस्थ करुन जातं. पण या नाटकाच्या तसच त्यांच्या इतर नाटक,एकांकिका, कथा व साहित्या मधून जयंत पवार सदैवं आपल्या सोबतं राहणारच आहेत. आमचा मित्र प्रकाश जाधव तसेच या नाटकाचे दुसरे निर्माते देविदास मासावकर यांची उणीव सतत जाणवतं राहीलं. हेमंत भालेकर
प्रयोग कधी सुरु होणार हे जाणून घेण्यासाठी आमच्यासोबत जोडून रहा. प्रयोगशाळा आणि नाटकमंडळी यांना अजरामर सुवर्ण नाटकाच्या प्रयोगासाठी रंगभूमी.com कडून मनःपूर्वक शुभेच्छा.