|| जीवेची जीवलगे माझे कृष्णाई कान्हाई
सांवळे डोळसे करुणा येऊ दे कांही ||
अशा अनेक अभंगातून जीवनाचे सार मांडणाऱ्या वारकरी संप्रदायातील महत्वाच्या संत कान्होपात्रा. कान्होपात्रेप्रमाणे वारीतील प्रत्येक वारकऱ्यांचा प्रवास एखाद्या जीवन प्रवासाप्रमाणे असतो. जीवनात समाधान प्राप्तीच्या ओढीने ही वारी सुरू होते. या वारीत कोणाची साथ महत्वाची याचे भान हवे तसेच समाधान आणि कर्माचे समतोल राखणे गरजेचे आहे. असाच मानवाच्या जीवनशैलीवर आधारित स्वेवन स्टुडिओज निर्मित जन्मवारी या दोन अंकी नाटकाने जय जय राम कृष्ण हरी म्हणत रंगभूमीवर पदार्पण केले आहे.
जन्माच्या प्रवासात स्वतःचे समाधानी अस्तित्व शोधण्याची वारी दर्शविणाऱ्या ‘जन्मवारी’ या नाटकात दोन काळ दर्शवले आहे. नाटक १५ वे शतक आणि वर्ष २०२२ अशा दोन काळात घडत असून संपदा जोगळेकर कुळकर्णी आणि शर्वरी कुळकर्णी बोरकर या प्रमुख आणि परस्परविरोधी व्यक्तिरेखा साकारणार आहेत. त्यांच्यासह शुभांगी भुजबळ, कविता जोशी आणि अमृता मोडक याही ताकदीच्या मुख्य भूमिका बजावणार आहेत. या नाटकाचे लेखन-दिग्दर्शन हर्षदा संजय बोरकर यांनी केले आहे. या नाटकाचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे या नाटकात सर्वच पात्र स्त्रिया साकारत आहेत. तरीही लेखन-दिग्दर्शिका हर्षदा संजय बोरकर, “हे स्त्री समस्यांवरील नाटक नाही तर मानवाच्या प्रवासावर आधारित जन्मानंतरची वारी आहे.”, असे सांगतात.
या नाटकाची संहिता जेवढी बळकट आहे तेवढेच सुमधुर सूर आणि संगीत या नाटकाशी जोडले गेले आहेत. या नाटकाचे संगीत मंदार देशपांडेने केले आहे. तर, प्रकाशयोजना अमोघ फडके आणि नेपथ्य सचिन गावकर यांनी केले आहे. दोन खांबाभोवती फिरणारे हे नाटक कमीत कमी नेपथ्यासह मर्यादित मुलांच्या संघाने उभारण्यात आले. जन्मानंतर जीवनात काहीतरी वेगळे करण्याची वारी किंवा जसे जीवन आहे तसेच समाधानी जगण्याची वारी — हा महत्वपूर्ण आशय नाटकाला इतर नाटकांपासून वेगळं ठरवतो.
सांगीतिक भूमिका महत्वाची
जन्मवारी हे सांगीतिक नाटक नसले तरी संगीत मुख्य भाग आहे. फार वाचनात नसलेला नामदेवांचा अभंग या नाटकातील विशेष आकर्षण आहे. या नाटकाचा संगीतकार मंदार देशपांडे सांगतो, “या नाटकातील संगीताबद्दल बोलताना भरून येतंय, कारण नाटकातील नको देवराया हे गानसम्राज्ञी लता मंगेशकरांचे हे गाणं आहे. प्रेक्षकांना अनेक मध्यामांमधून संगीताची सवय झाली असल्यामुळे हे नाटक संगीतबद्ध करताना अनेक गोष्टींचा विचार करण्यात आला. कान्होपात्राच्या काळातील अभंग संगीतबद्ध करणे आव्हानात्मक होते. दोन काळ दाखवताना गाणी आणि ध्वनीचा विविधअंगी वापर केला आहे.”
हर्षदा बोरकर
“माझ्या अनेक कथांना नाट्यमय स्वरूप आहे, अशा प्रतिक्रिया वाचकांकडून येत होत्या आणि माझा स्वभाव नाटकी आणि हास्यमय आहे. कदाचित हे त्यामागचं कारण असेल. नाटकाचे लेखन करण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला दीर्घांक लिहिला पण मोठ्या कलाकारांची साथ लाभली म्हणून दोन अंकी नाटक लिहण्यात आले. प्रेक्षक मी लिहिलेल्या वाक्यावर टाळ्यांची प्रतिक्रिया देतात तेव्हा लेखिका आणि दिग्दर्शिका म्हणून समाधानी वाटते.”
संपदा जोगळेकर कुळकर्णी
“चांगल्या नाटकाला प्रेक्षकांनी यावे अशी आशा आहे. मराठी नाट्यसृष्टीत अनेक कमी दर्जाची नाटके सुरू असताना सुंदर आशय जन्मवारीतून मांडणार आहोत. मध्यामांद्वारे दर्जेदार नाटकांचा प्रेक्षकांमध्ये वणवा पेटला पाहिजे असं मला वाटतं.”
लेखिका-दिग्दर्शिका: हर्षदा बोरकर
निर्माते: शांभवी बोरकर, सतीश आगाशे
कलाकार: शर्वरी कुळकर्णी बोरकर, संपदा जोगळेकर कुळकर्णी, शुभांगी भुजबळ, कविता जोशी, अमृता मोडक
संगीत: मंदार देशमुख
प्रकाशयोजना: अमोघ फडके
नेपथ्य: सचिन गावकर
वेशभूषा आणि सहदिग्दर्शन: शर्वरी बोरकर