राज्यस्तरीय प्रायोगिक रंगभूमी सातत्याने नवी उमेद घेऊन प्रेक्षकांसाठी मेजवानी घेऊन येते. अनेक प्रयत्नातून नवीन विषय रंगमंचावर आणले जातात आणि प्रेक्षक मायबापकडून भरभरून प्रतिसाद मिळतो. असेच एक अनोखे नाटक शिव रणभूमी प्रशांत प्रतिष्ठान निर्मित माळरानावर फुललेलं नाटक ‘आय. एम. पुंगळ्या शारुक्या आगीमहुळ‘ हे प्रेक्षकपसंती मिळवत आहे. फासे पारधी समाजावर आधारित या नाटकाचे कथानक एका जोडप्याच्या आयुष्यावर लिहिले आहे. प्रेक्षक मागणीनुसार या नाटकाचे पुन्हा प्रयोग होणार आहेत.
- मंगळवार २ ऑगस्ट सायं. ४.३० वाजता गडकरी रंगायतन, ठाणे
- मंगळवार १६ ऑगस्ट सायं. ४.०० वाजता विष्णुदास भावे, वाशी
आय. एम. पुंगळ्या शारूक्या आगीमहुळ
हे नाटक म्हणजे मोकळ्या माळरानावर संसार थाटलेल्या जोडप्याची कथा आहे. फासेपारधी समाजातील ‘पुंगळ्या’ आणि त्याची बायको ‘मतलबी’ यांच्यातील अतूट प्रेम, त्यांनी केलेला संघर्ष, बंड आणि माणुसकीचे दर्शन या नाटकातून होते. अस्तित्वाची लढाई म्हणजे हे नाटक. फासे पारधी समाजाला इंग्रजांनी चोर, दरोडेखोर हा दिलेला शिक्का अजून त्यांच्या माथी कायम आहे. या वस्तीत ‘माणूस’ राहतो हे अजून ही इतर समाज स्वीकारायला तयार नाही. लेखकाच्या लेखणीतून उमटलेल्या एका प्रश्नातून अख्या नाटकाचा सार कळतो, “या देशात गरीब कोण? जो कागदपत्रे दाखवून गरीब असल्याचे मांडत राहतो तो, की ज्याची नोंदच नाही तो गरीब?”
कथेतील नायकाच्या अस्तित्वाचा एक ही लेखी पुरावा नाही. त्यामुळे त्याच्या हाताला काम नाही. स्वतःची ओळख दर्शविणारे एक ही कागदपत्र न बनवू शकलेल्या पुंगळ्याच्या फास्यात एक पक्षी अडकतो. हा पक्षी यापूर्वी कधीही कोणाच्या पाहण्यात आलेला नाही. त्या पक्षाची नोंद करण्यासाठी आलेल्या पक्षी निरीक्षक लक्ष्मीला पाहून आपण किती कमनशिबी आणि निरुपयोगी आहोत हे नायकाच्या लक्षात येते. या नाटकातून पारधी समाजावर, त्यांच्या जीवनावर, परंपरांवर, रूढींवर प्रकाश टाकण्यात आलेला आहे. पारधी समाजातील महिलांवर नकळत होणाऱ्या अन्यायाबद्दल देखील भाष्य केले आहे. हे नाटक विनोदी अंगाने आणि अद्भुतेने वेग घेते. शोकांतिकेतून दिलेला अस्तित्वाचा लढा हीच या नाटकाची ओळख आहे.
नाटकाची संपूर्ण टीम
लेखन आणि दिग्दर्शन — प्रशांत निगडे
प्रकाशयोजना — सुनील मेस्त्री
संगीत — कृष्णा- देवा
नेपथ्य — संतोष कदम
रंगभूषा — निलम चव्हाण
व्यवस्थापक — सुजित भोये आणि मनीष सावंत
इतर कलावंत — ऋत्विक मनचेकर, अजय बोराटे, षण्मुखानंद सुरेखा, प्रेम कन्होजिया, प्रज्योत देवळे, निखिल धोमकर, निखिल चौगुले, आदित्य ओव्हाळ, सौरभ कामथे, प्रतिक साठे, पायल जगताप, स्नेहल गंगणे, ओमकार तेली, प्रसाद भुसाणे, निधी जाधव, राहूल कोंडे, आनंद सलवदे.
पात्र परिचय
पुंगळ्या आणि नानादादो — प्रशांत निगडे
मतलबी — विरिशा नाईक
फिरंगी आणि लक्ष्मी — श्रद्धा शितोळे
रंगमंचावर कधी ही न दिसणारी पात्र खुपश्या, पिस्तुल्या, भगुली, इंगळी, लाडू, टोळ्या, रायफल्या.
विजेते पारितोषिक
महाराष्ट्र शासन पुरस्कृत ‘६०वी राज्यनाट्य स्पर्धा‘
सर्वोत्कृष्ट नाटक , उत्कृष्ट दिग्दर्शन , उत्कृष्ट अभिनेता , उत्कृष्ट अभिनेत्री, उत्कृष्ट नेपथ्य, उत्कृष्ट प्रकाशयोजना, उत्कृष्ट संगीत असे १० पारितोषिक विजेते नाटक.
फासे पारधी समाज
फासेपारधी हे एका भटक्या जमातीचे नाव असून या जमातीचे लोक वन्यप्राण्यांची व पक्षांची शिकार करून त्यांचा खाद्य आणि विक्रीसाठी उपयोग करून जगत. आजही भारताच्या काही राज्यात फासेपारधी शिकार करण्याचे आपले परंपरागत काम करतांना दिसतात. इंग्रजांच्या राज्यात विविध भटक्या जमातींना गुन्हेगार जमाती कायदा १८७१ नुसार गुन्हेगार ठरविण्यात आले होते. तेव्हापासुन आजतागायत या जमातींवरचा हा अन्यायकारक ठपका पुसला गेला नाही. २०११ च्या जनगणनेनुसार, महाराष्ट्रात पारधी लोकसंख्या २,१५,९५० इतकी आहे. वाशिम जिल्हत लोकसंख्या ३५०० आहे व स्थले मलेगाव रिसोड कनेरगव शिरपुर जैन करंजा शेलू बाजार लोनि येथे आहे. या समाजावर अनेक साहित्य उपलब्ध आहेत. २०२१ साली फारसी समजाला नागरिकत्व मिळाले.