रंगभूमी पुन्हा एकदा तिसरी घंटा, बटाटे वड्यांचा सुगंध, भव्य-दिव्य सेट आणि रंगीबेरंगी दिव्यांच्या रोषणाईत उजळून निघू लागली आहे. लॉकडाऊनमुळे लोकांमध्ये आलेली उदासीनता व नैराश्य दूर करण्यासाठी सर्वच नाट्यकर्मी नेटाने कामाला लागलेले दिसत आहेत. अशातच, संतोष पवारही प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी घेऊन येत आहेत एक बहारदार नाटक ‘हौस माझी पुरवा’! या नाटकाचा, म्हणजेच हौस माझी पुरवा [Review] तुम्ही येथे वाचू शकता.
हौस माझी पुरवा – शुभारंभाचा प्रयोग
संतोष पवार लिखित-दिग्दर्शित या नाटकात संतोष पवार, अंशुमन विचारे यांच्यासोबत प्राप्ती बने, अमोल सुर्यवंशी, हर्षदा बामणे या नवोदित कलाकारही आपल्या भेटीस येणार आहेत. नाटकाची कथा, संकल्पना व निर्मिती अजय राजाराम विचारे यांची आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग शुक्रवारी, दिनांक २६ रोजी, दुपारी ४ वाजता, दीनानाथ नाट्यगृह, विले-पार्ले येथे सादर होंणार आहे. तसेच, त्यापुढील प्रयोग प्रबोधनकार ठाकरे, बोरिवली येथे दिनांक २८ रोजी, दुपारी ४ वाजता सादर होणार आहे.
नाटकाच्या कथेबद्दल थोडंसं
संतोष पवार यांचे हे ५५ वे नाटक आहे. रंगभूमी.com च्या टीमसोबत बोलताना संतोष पवार यांनी सांगितले की, “काहीतरी वेगळं नाटक करण्याचा माझा मानस होता. त्यातच अजय राजाराम विचारे यांनी लिहिलेली ही कथा माझ्या वाचनात आली आणि मला अतिशय आवडली. याच कथेवर नाटक रचण्याचे मी ठरवले. आजच्या काळातील ज्वलंत विषयांवर, राजकीय घडामोडींवर भाष्य करणारे हे नाटक आहे. या नाटकाद्वारे काही गंभीर संदेश विनोदी अंगातून प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचा आमचा उद्देश आहे. नाटकात अंशुमन विचारे तर आहेच पण त्यासोबतच, माझ्या इतर काही नाटकात माझ्या सोबत असलेले प्राप्ती बने, अमोल सुर्यवंशी, हर्षदा बामणे हे गुणी कलाकारदेखील आहेत. त्यांची काम करण्याची ऊर्जा प्रेक्षकांना खिळवून ठेवेल याबद्दल मला शंका नाही. प्रेक्षकांना निराश न करता त्यांना एक सुंदर प्रयोग अनुभवता यावा हा माझा प्रामाणिक प्रयत्न राहील.” नाटकाच्या कथेबद्दल संतोष पवार यांनी सांगितले की, “मी आणि अंशुमन, आम्ही दोन समांतर व्यक्तिरेखा साकारताना दिसू. हि पात्रे बघताना रसिक प्रेक्षकांना काळू-बाळूची नक्कीच आठवण होईल. संत्या म्हणजे मी आणि अंशू अर्थात अंशुमन विचारे, अशा या जोडगोळीची हौस पहायला मिळेल. स्वत:ची हौस पुरवण्यासाठी ते कसं अख्ख्या राज्याला आणि सर्वांनाच वेठीस धरतात आणि मग पुढे काय गंमत घडते ते बघणं म्हणजेच आमचं हे नाटक ‘हौस माझी पुरवा’! उगीचच अनावश्यक गाण्यांचा फाफटपसारा नाही. पण प्रसंगानुरूप कथेला पूरक ठरणारी गाणी या नाटकात आहेत. डोकं बाजूला ठेवून बघावी अशी ही कॉमेडी नसून बाजूला ठेवलेलं डोकं ताळ्यावर आणणारी ही कॉमेडी आहे. ”
नाटकासाठी कल्पक नेपथ्याचा वापर
“माझ्या इतर नाटकांप्रमाणे हेदेखील पोटभर मनोरंजनासोबत डोळ्यात अंजन घालणारे नाटक असेल. लॉकडाऊन नंतरचे हे आमचे पहिलेच नाटक आहे. त्यामुळे आधी मुंबई, पुणे व नाशिक येथे प्रयोग सादर करून नंतर इतर गावांमध्ये आम्ही या नाटकाचे प्रयोग सादर करू. त्याचीच तयारी म्हणून नाटकाचा सेटही फ्लेक्सिबल बनवला आहे. एक थोडीशी हटके संकल्पना वापरून कुठल्याही रंगमंचावर साजेसा दिसेल असा सेट आम्ही उभा केला आहे. नाटकात दिसणाऱ्या सहा भिन्न जागांसाठीही थोडी वेगळी कल्पना अंमलात आणली आहे. प्रकाशयोजना शीतल तळपदे यांची असून वेशभूषा मंगल केंकरे यांनी केली आहे.”, असेही त्यांनी सांगितले.
संतोष पवार यांचे प्रेक्षकांना आवाहन
हे नवीन नाटक प्रेक्षकांना बघायला सांगण्याचे आवाहन करत संतोष पवार म्हणतात की, “माझ्या प्रत्येक नाटकाला तुम्ही भरभरून प्रेम दिले आहे. मला आशा आहे की याही नाटकाला तुम्ही असेच प्रेम द्याल. माझं हे ५५ वं नाटक आहे. मी तुम्हाला याआधी निराश केलेलं नाही आताही करणार नाही. एक चांगला प्रयोग बघितल्याचा आनंद उराशी घेऊनच तुम्ही नाट्यगृहातून बाहेर पडाल याची मी खात्री देतो. हे एक कौटुंबिक नाटक आहे. कुठेही उथळपणा अथवा थिल्लरपणा नाही. तुम्ही हे नाटक बघितल्यावर इतरांनाही हे नाटक बघायला सांगायचं तुमचं मन होईल असं हे नाटक आहे.”