नवीन मराठी नाटकाची घोषणा म्हणजे नाट्यरसिकांमध्ये नवचैतन्याची लाट! त्यातही विनोदी नाटक म्हणजे रसिक प्रेक्षकांसाठी हास्यरसपूर्ण मेजवानीच! हसवत हसवत राजकीय घडामोडींवर सडेतोड भाष्य करणारे सुप्रसिद्ध दिग्दर्शक संतोष पवार नाट्यरसिकांसाठी ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे’ हे एक नवीन नाटक घेऊन येत आहेत.
वेद प्रॉडक्शन हाऊस प्रस्तुत ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे‘ या नव्या कोऱ्या नाटकाच्या निमित्ताने शलाका पवार, सागर कारंडे यांच्यासोबत सायली देशमुख, सिद्धीरूपा करमरकर, अजिंक्य दाते, अमोघ चंदन, रमेश वाणी हे गुणी कलाकारही आपल्या भेटीस येणार आहेत. समोरासमोर राहणाऱ्या दोन कुटुंबामधील प्रत्येक सदस्यामध्ये काही ना काही शारिरीक व्यंग (defect) असतात. अशातच, त्या कुटुंबांमध्ये कशाप्रकारे सोयरिक जुळून येते आणि ती जुळून येताना काय धमाल उडते हे बघण्यासाठी तुम्हाला या नाटकाला भेट द्यावी लागणार आहे.
गोपाळ अलगेरी व सुनीता अहिरे यांची निर्मिती असलेल्या या नाटकाला अशोक पत्की यांचे संगीत लाभलेले असून गीतकार मिलिंद जोशी आहेत. नाटकाचे सूत्रधार गोट्या सावंत आहेत. नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे आहे. तर वेशभूषा मंगल केंकरे यांनी केली आहे. एकंदरीतच काय? तर, अभिनय, लेखन, दिग्दर्शन आणि तांत्रिक अशा सर्वच बाजू सशक्त असलेलं हे विनोदी नाटक आपलं पोटभर मनोरंजन करणार आहे यात तिळमात्र शंका नाही.
१९ फेब्रुवारी रोजी आचार्य अत्रे, कल्याण येथे दुपारी ४:३० वाजता या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग सादर होणार आहे. त्यामुळे, नाटकाच्या संपूर्ण टीमने प्रेक्षकांना नाटक बघायला येण्याचे अगत्याचे निमंत्रण दिले आहे. पहिल्या प्रयोगाची तिकिटे तिकीट खिडकीवर १५ फेब्रुवारीपासून उपलब्ध होतील. तसेच, २० फेब्रुवारी रोजी डॉ. काशिनाथ घाणेकर, ठाणे नाट्यगृहात दुपारी ४:३० वाजता सादर होणाऱ्या प्रयोगाची तिकिटे १६ तारखेपासून उपलब्ध होतील. तिकीट बुकिंग करण्यासाठी ९९८७८२०८०५ या संपर्क क्रमांकाचाही वापर करता येईल.
रसिकहो! निखळ मनोरंजनाने परिपूर्ण अशा या ताज्यातवान्या नाटकासाठी सज्ज व्हा आणि सहकुटुंब सहपरिवार प्रयोगाला हजेरी लावून नाटकाच्या संपूर्ण टीमला भरभरून प्रेम द्या.