घरच्यांसोबत ३ तास धमाल मनोरंजन अनुभवता यावं, असे कार्यक्रम दूरदर्शनवर आजकाल फार क्वचित पाहायला मिळतात. शिव्यागाळ, अश्लील दृश्य यांचा तर बरेच वेळा मारा केला जातोय प्रेक्षकांवर! अशातच, प्रेक्षकांना तुफान हसवणारं आणि एक छानसा संदेश देऊन जाणारं वेद प्रोडक्शन हाऊसचं संतोष पवार लिखित-दिग्दर्शित ‘हीच तर फॅमिलीची गंमत आहे‘ हे हलकं-फुलकं नाटक सध्या रंगभूमीवर खूप गाजतंय. आनंदाची बातमी अशी की, १६ जुलै रोजी हे नाटक सुवर्णमहोत्सवी प्रयोग सादर करणार आहे.
यशस्वी ५० प्रयोगांचा टप्पा गाठल्यामुळे नाटकातील कलाकार अतिशय खुश आहेत. तसेच ते मायबाप रसिक प्रेक्षकांचे आभार व्यक्त करण्यासाठी आतुरही आहेत. हा ५० वा प्रयोग १६ जुलै रोजी ४ वाजता बोरिवली येथील प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात सादर होणार आहे. या ५० व्या प्रयोगाच्या निमित्ताने बरेच सितारे नाटकाला हजेरी लावणार आहेत. त्यापैकी, सचिन पिळगांवकर, रोहिणी हट्टंगडी, मकरंद देशपांडे, अदिती सारंगधर, दीपाली सय्यद, पुष्कराज चिरपुटकर या अभिनेत्यांची नावे सध्या समोर आली आहेत.
कुटुंब म्हटलं की त्यातील सदस्य आले आणि सदस्य म्हटलं की त्यांच्यात काही ना काही त्रुटी असणारच. पण या त्रुटींना बाजूला ठेवून प्रत्येक सदस्याला सांभाळून घेणं हे इतर सदस्यांचं कर्तव्य आहे असा गोड संदेश देणारं हे नाटक! संपूर्ण फॅमिलीचं, सगळ्या वयोगटातील प्रेक्षक मंडळींचं मनोरंजन करण्याची ताकद या नाटकात आहे. त्यामुळे लवकरच हे नाटक प्रयोगांची शंभरीही गाठेल याबद्दल शंकाच नाही. नाटकात रमेश वाणी, सिद्दीरूपा करमरकर, सायली देशमुख, अमोघ चंदन, अजिंक्य दाते, शलाका पवार आणि सागर कारंडे या कलाकारांची सुंदर भट्टी जमून आली आहे. सगळ्यांची सकारात्मक ऊर्जा आणि विनोदाचं टाईमिंग नाटकाची उंची वाढवत जाते.
या नाटकाबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पुढील व्हिडिओला भेट द्या.
हीच तर फॅमिलीची गंमत आहे नाटकाच्या संपूर्ण टीमला ५० व्या प्रयोगाबद्दल रंगभूमी.com कडून खूप खूप शुभेच्छा!
Upcoming Shows