एखाद्या नव्या शहरात जायचं म्हटलं तरी आपण पूर्ण तयारी करून जातो. पण काळाच्या विचित्र खेळात आपण अचानक एके दिवशी एखाद्या नव्या जगातच जाऊन पोहोचलो तर? असं जग जे आपल्यासमोर एक अनाकलनीय चित्र उभं करेल. ही कल्पनाच किती भन्नाट आहे! याच कल्पनेवर आधारित असं ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ आयोजित ‘हत्तमालाच्या पल्याड’ हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज झालेलं आहे.
या नाटकाचे लेखक बादल सरकार असून दिग्दर्शक महेश खंदारे आहेत.
‘हत्तमालाच्या पल्याड‘ ह्या नाटकात दोन अट्टल चोर, चिक्कूराम आणि विक्कुराम, पकडले जाण्याच्या भीतीने एका नदीत उडी मारतात आणि ती नदी त्यांना एका अशा दुनियेत घेऊन जाते जी त्यांनी कधीही पाहिलेली नाही. ह्या अनोळखी दुनियेत खरेदी नाही, विक्री नाही, पैसा नाही की हिंसा नाही. एक असं आगळं-वेगळं जग जिथे सगळे लोक मिळून-मिसळून काम करतात आणि त्या कष्टाची फळे एकमेकांमध्ये समान वाटून खातात. जेवढं गरजेचं आहे तेवढच निर्माण करतात. त्यांचे नियम वेगळे, विचार वेगळे, पद्धती निराळ्या. चिक्कूराम आणि विक्कुरामसाठी ही एक परीक्षाच ठरते. नदी अल्याडच्या गोष्टी ते खरच मागे ठेऊन ह्या नव्या जगाला सामोरे जाऊ शकतील का? ह्या नव्या जगात, ह्या नव्या विचारांशी जुळवून घेऊ शकतील का? वेगळ्या जगातले वेगळे लोक, वेगळे विचार, वेगळे नियम, चिक्कूराम आणि विक्कुरामला गोंधळात टाकतात. आपल्या स्वतःच्या जगाचा आणि आपल्यावरील पूर्वापार संस्कारांचा फेरविचार करण्यास भाग पाडतात. चिक्कूराम आणि विक्कुरामचे हे अनोळखी जगातील, नवे अनुभव आपल्याला प्रेक्षक म्हणून आपल्या ओळखीच्या जगातील जुन्या अनुभवांबद्दल विचार करण्यास उद्युक्त करतील ह्यात शंका नाही.
हत्तमालाच्या पल्याड नाटकाचे पुढील प्रयोग
- ३ मार्च रोजी, सायंकाळी ७ वाजता
नामदेव सभागृह, ललित कला केंद्र, सावित्रीबाई फुले, पुणे विद्यापीठ, गणेशखिंड, पुणे
तिकीट शुल्क: १५०/- - ५ मार्च रोजी, सायंकाळी ७:३० वाजता
द बेस, एरवंडणे पुणे
तिकीट शुल्क: २००/-