‘38, कृष्ण व्हिला’ हे बहुचर्चित नाटक १९ मार्च पासून प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज होतंय हे तर आपण जाणून आहोतच! गिरीश ओक आणि श्वेता पेंडसे अभिनीत ‘38, कृष्ण व्हिला’ या नाटकात गिरीश ओक आणि श्वेता पेंडसे हे कलाकार असून नाटकाचे दिग्दर्शन विजय केंकरे यांनी केले आहे. तसेच, श्वेता पेंडसे या स्वतः या नाटकाच्या लेखिका आहेत.
व्यावसायिक रंगभूमीवरचं गिरीश ओक यांचं हे ३८ वं वर्ष आहे आणि नाटकाच्या नावातही ३८ हा आकडा आहे ही खरं म्हणजे एक गंमतच आहे. पण या नाटकाची अजून एक खासियत अशी की हे गिरीश ओक यांच्या आयुष्यातील ५० वे नाटक असणार आहे. एखाद्या नाटकाचे ५० प्रयोग होतात तेव्हा त्याचा आनंद संपूर्ण टीमला भारावून टाकतो. अशा वेळी एखाद्या कलाकारासाठी त्याचं ५० वं नाटक किती महत्वाचं असेल याबद्दल आपण विचारच करू शकतो. याच त्यांच्या लाडक्या नाटकाचा श्रीगणेशा होण्याआधी ते रसिक प्रेक्षकांशी गप्पा मारायला येत आहेत. होय! नाटक आपल्या भेटीस येण्याअगोदर नाटकातील कलाकार ऑनलाईन माध्यमातून आपल्या भेटीस येत आहेत. इंस्टाग्राम लाईव्ह मार्फत १६ मार्च रोजी ५:३० वाजता कलाकारांशी आपली भेट होणार आहे. या लाईव्ह भेटीत रसिक प्रेक्षक त्यांच्याशी गप्पा मारु शकणार आहेत. त्यांच्यासोबत नाटकातील नायिका म्हणजेच श्वेता पेंडसे ज्या या नाटकाच्या लेखिकाही आहेत, त्याही उपस्थित असणार आहेत. त्यामुळे, ही ऑनलाईन भेट अजिबात चुकवू नका. पुढील लिंकवर क्लिक करून तुम्हाला या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये सहभागी होता येईल.
https://www.instagram.com/royal.theatre/?utm_medium=copy_link
‘38, कृष्ण व्हिला’ या नाटकाचे नेपथ्य संदेश बेंद्रे यांनी केले आहे. ज्यांची ‘कुर्रर्रर्रर्र’ आणि ‘मी, स्वर आणि ते दोघं’ ही नाटकंही सध्या खूप चर्चेत आहेत. या नाटकांची माहिती देणारे विडिओ तुम्ही पाहू शकता.
‘कुर्रर्रर्रर्र’ नाटक । समीक्षण । प्रेक्षक प्रतिक्रिया
‘मी, स्वरा आणि ते दोघं’ नाटक । समीक्षण । प्रेक्षक प्रतिक्रिया
एकंदरीतच रहस्यमय अशा ‘38, कृष्ण व्हिला’ या नाटकामध्ये प्रेक्षकांसाठी बऱ्याच गमतीजमती असणार आहेत. त्यामुळे, १९ मार्च रोजी होणाऱ्या शुभारंभाचा प्रयोगाला आवर्जून हजेरी लावा!