कोविड-१९ च्या निर्बंधांमुळे नाटक नाट्यगहात होणे शक्य नव्हते. तेव्हाच ‘घरो घरी नाटक’ या संकल्पनेचा जन्म झाला. कुठल्याही प्रकारचं मानधन न घेता प्रायोगिक तत्वांवर ‘गुंता’ हे नाटक प्रेक्षकांच्या घरी सादर केलं जात होतं. कोविड-१९ च्या अंतर्गत असलेल्या सगळ्या नियमांचे पालन ह्या प्रयोगात केले जात होते. आजही ह्या नाटकाचे प्रयोग घराच्या अंगणात, बाल्कनी, टेरेस, रंगमंच ह्या ठिकाणी सादर केले जातात.
‘गुंता’ नाटकाबद्दल थोडंसं…
माणसाला ‘माणूस’ ज्या बनवतात त्या म्हणजे भावना! आनंद, दुःख, राग, द्वेष, प्रेम, मत्सर, करुणा इत्यादी भावना मानवाला माणसाचा दर्जा देतात. पण या भावना समजून घेणं फार अवघड असतं. एका शब्दाखाली भावनेचे बरेच पैलू असतात. पण ज्या भावनेबद्दल माणूस वर्षानुवर्षं भाष्य करत आलाय आणि तरीही ज्या भावनेचं गुपित आजपर्यंत, तो उलगडू शकलेला नाही, ते म्हणजे ‘प्रेम’. प्रेम जितकं सुखावह असू शकतं तितकच त्रासदायक ही असू शकतं आणि जितकं हवेत उडवू शकतं तितकच जोरात जमिनीवर पाडू ही शकतं. प्रेमाच्या कधीही न कळणाऱ्या आणि न उलगडणाऱ्या या गुंत्याची एक वेगळी कथा सांगणारी एक नवीन एकांकिका आपल्या समोर येत आहे. ज्याचं नाव आहे अमूर्त प्रोडक्शन्स निर्मित ‘गुंता’!
गुंता या एकांकिकेचे लेखन व दिग्दर्शन अमित जाधव यांनी केले आहे. या दोनपात्री नाटकाच्या प्रमुख भूमिकेत मन्विता जोशी ही अभिनेत्री ‘राधा देसाई’ या मराठीच्या शिक्षिकेची भूमिका साकारतेय तर अमेय कुलकर्णी ‘विनायक देसाई’ या एका लेखकाचे पात्र साकारताना दिसणार आहे..
प्रेम फार क्षणिक आहे, इतर भावनांसारखंच. आज असतं तर उद्या नसतं. प्रेम संपल्यानंतरही टिकून राहतं ते नातं. त्याच नात्यामुळे, दुरावा असूनही आपण एकमेकांच्या मनात संचार करू शकतो… नात्यातून बाहेर पडले, म्हणजे प्रेम संपतं, असं होत नाही. त्या उर्वरित प्रेमाच्या भावना घेऊन जगत असताना जर ती व्यक्ती परत भेटली तर? संवाद होईल? आणि झाला तर काय संवाद होईल? ह्याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी गुंता हे नाटक जरूर पहा.
गुंता या ५० मिनिटांच्या नाट्यानुभवाचे सगळे प्रयोग आजवर ‘घरोघरी नाटक’ या संकल्पनेप्रमाणे प्रेक्षकांच्या घरीच होत आले आहेत. परंतु २ एप्रिल २०२२ रोजी, अमूर्त प्रोडकशन्स गुंता या एकांकिकेचा प्रयोग खास नाट्यगृहात घेऊन येत आहेत. २ एप्रिल, शनिवार, संध्याकाळी ५ वाजता आर्यसमाज मंदिर हॉल, मुलुंड (पश्चिम) येथे हा प्रयोग पार पडेल.
तेव्हा प्रेक्षकांनी आवर्जून ‘गुंता’ या नाटकाचा प्रयोग पाहावा. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या घराच्या परिसरात या नाटकाचा प्रयोग आयोजित करायचा असेल तर खाली दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा.
संपर्क:
अमित जाधव – 7507912710
चैतन्य देसाई – 8459226592