नव्या पिढीला जुनी अजरामर नाटकं ‘प्रत्यक्ष’ बघता यावीत या हेतूने प्रशांत दामले ‘गेला माधव कुणीकडे’ हे त्यांचे सुपरहीट नाटक पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस घेऊन येत आहेत. ‘अरे हाय काय अन् नाय काय’… असं म्हणत रंगभूमीवर धुमाकूळ घालणारा माधव धुमाकूळ घालायला पुन्हा सज्ज झालेला आहे.
गेले काही दिवस प्रशांत दामले आपल्या फेसबूक पेजवर ६३ चा आकडा आणि नवं नाटक येतंय, असे काही पोस्टर शेअर करुन प्रेक्षकांची उत्कंठा वाढवत होते. नवं नाटक कोणतं याचं उत्तर आज आपल्याला मिळालेलं आहे. ‘अरे हाय काय अन् नाय काय’ असे म्हणत रंगभूमीवर पुन्हा एकदा हास्याचे फवारे उडवायला प्रशांत दामले आणि विनय येडेकर ही जोडगोळी सज्ज झाली आहे. पण ६३ या आकड्याची नक्की काय गंमत आहे? असं विचारल्यावर प्रशांत दामले म्हणाले की, “६३ आकड्याची गंमत म्हणजे ‘माझे वय ६३ आहे, इतकंच!”. पुढे त्यांनी असेही सांगितले की, “नव्या पिढीला ही नाटकं बघता यावीत म्हणून ६३ तर ६३, कमी प्रयोग लावू. पण, प्रेक्षकांच्या आग्रहास्तव काही खास जुनी नाटकं पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीस आणण्याचा प्रयत्न राहील.”
जुन्या ‘गेला माधव कुणीकडे’ नाटकातील काही धमाल किस्से आणि आठवणी ऐकण्यासाठी पुढील व्हिडीओला नक्की भेट द्या.
Gela Madhav Kunikade Press Conference Clips
७ डिसेंबर १९९२ ला रंगभूमीवर दाखल झालेल्या ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचे आजवर १८०२ प्रयोग झाले. २००५ मध्ये या नाटकाचे प्रयोग थांबले. गौरी थिएटर्स निर्मित आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन प्रकाशित ‘गेला माधव कुणीकडे’ नाटकाचा शुभारंभ १५ जूनला वाशी येथील विष्णुदास भावे सभागृहात दुपारी ४ वा. होणार आहे. तिकीट विक्रीचा शुभारंभ १ जून रोजी फक्त ‘तिकीटलाय’अॅप वर सुरु होईल.
वसंत सबनीस लिखित आणि राजीव शिंदे दिग्दर्शित ‘गेला माधव कुणीकडे’ नाटकाची संहिताच धमाकेदार आहे. दोन कलावंत आपापल्या भूमिका घेऊन अभिनयाची जी जुगलबंदी पेश करत त्याला तोड नाही. दोन महिलांशी लग्न केल्यामुळे उभा राहिलेला पेच आणि त्यातून निर्माण होणारे अनेक विनोदी प्रसंग, ते लपवण्यासाठी परस्परांना फसविण्याचा खेळ कुठल्या टोकाला जातो याची धमाल रसिकांना हास्याची मेजवानी देणारी आहे. प्रशांत दामले आणि विनय येडेकर या जोडीसोबाबत नीता पेंडसे, तन्वी पालव, राजसिंह देशमुख, अक्षता नाईक आदि कलाकारांच्या भूमिका आहेत. प्रकाशयोजना किशोर इंगळे यांची आहे. ध्वनी संयोजन प्रकाश खोत तर नेपथ्य प्रमुख मधुकर बाड आहेत.
तीच धमाल, तीच ऊर्जा आणि तीच दर्जेदार नटमंडळी, आजच्या पिढीसाठी आजच्या पिढीला सोबत घेऊन तुमच्या भेटीसाठी सज्ज झालेली आहेत. तुम्ही तयार आहात ना? ही संधी चुकवू नका.