प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन व गौरी थिएटर्स निर्मित आणि सरगम प्रकाशित ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाच्या ५०० व्या प्रयोगानिमित्त सत्कार सोहळ्याचे आयोजन केल्याचे वृत्त आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविले होते. पुढील लिंकवर क्लिक करून तुम्ही हे वृत्त वाचू शकता.
‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ नाटकाचा ५०० वा प्रयोग! — मान्यवरांच्या उपस्थितीत विशेष कार्यक्रमाचे आयोजन
‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा ५०० वा प्रयोग रविवार दिनांक २९ मे रोजी विलेपार्ले येथील दीनानाथ नाट्यगृहात हाऊसफुल्ल गर्दीत पार पडला. नाटकाने ५०० चा यशस्वी टप्पा गाठल्याबद्दल नाटकातील कलाकारांचा सत्कार सोहळा आयोजिण्यात आला होता. प्रशांत दामले, कविता मेढेकर, अतुल तोडणकर, मृणाल चेंबूरकर, प्रतीक्षा शिवणकर, राजसिंह देशमुख व पराग डांगे यांनी नाटकात अप्रतिम भूमिका साकारल्या आहेत. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख, अभिनेते रितेश देशमुख त्यांच्या मातोश्रींसह या सोहळ्याला उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते सर्व कलाकारांचा सत्कार करण्यात आला. ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ, गौरी दामले, संजय मोने, आशिष शेलार आदी मान्यवर यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. याचबरोबर, अशोक सराफ यांच्या वयाची पंच्याहत्तरी आणि त्यांच्या कारकिर्दीला झालेल्या ५० वर्षांचे औचित्य साधून त्यांचाही विशेष सत्कार सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते यावेळी करण्यात आला.
रंगभूमीवरील सम्राट म्हणावे असे, आजवर नानाविध नाटकांच्या अगणिक प्रयोगांचे विक्रमी रेकॉर्ड कायम करत आलेले, आपल्या सर्वांचे लाडके अभिनेते, प्रशांत दामले यांनी रंगभूमीशी जोडलेल्या काही जुन्या आठवणींना याप्रसंगी उजाळा दिला.
प्रशांत दामले यांचे मनोगत
आमच्या या नाटकाचा ५०० वा प्रयोग वास्तविक २०२० मध्येच होणार होता; पण कोरोनामुळे मराठी नाट्यसृष्टी मागे ढकलली गेली. परंतु आता दोन वर्षांनी का होईना, पण आमच्या नाटकाचा ५०० वा प्रयोग होत आहे याचा आनंद वाटतो. या निमित्ताने अनेक वर्षांनी कुठल्यातरी मराठी नाटकाचा ५०० वा प्रयोग झाला आहे.
मराठी नाटकात काम करण्याचीच माझी पहिल्यापासून इच्छा होती. १९८३ मध्ये मी प्रथम ‘टूरटूर’ मध्ये गायलो; तेव्हा माझा आवाज बरा आहे हे कळले. त्यानंतर १९८५ मध्ये ‘मोरूची मावशी’ नाटकात गायलो. अशोक पत्की यांच्या संगीत दिग्दर्शनाखाली मी बऱ्याच नाटकांत गायलो. अभिनेता होण्याच्या आधी, गायक व्हायची माझी इच्छा होती. त्यामुळे माझा सगळा फोकस गाण्यांवर होता. कलाकार व तंत्रज्ञ जेव्हा एकमेकांच्या चुका झाकत काम करत असतात, तेव्हा ते नाटक चांगले होत असते, यशस्वी होत असते.
सुधीर भट यांनी अनेकवर्षे मला सांभाळले. त्यामुळे माझ्या कारकिर्दीत त्यांचा खूप मोठा वाटा आहे. व्यवसाय कसा करावा हे त्यांनी मला शिकवले. ‘गेला माधव कुणीकडे’ या नाटकाचे सात-आठशे प्रयोग झाल्यावर त्यांना ते नाटक चालवायचा कंटाळा आला. त्यामुळे ते नाटक मी चालवायला घेतले. तिथून माझा निर्मात्याचा प्रवास सुरु झाला. निर्माता म्हणून काम करताना मी त्यांच्या दृष्टिकोनातून विचार करतो. मोहन वाघ यांच्याकडून शिस्त कशी असावी आणि काय करायचे नाही, याचे धडे मला मिळाले.
‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा पुढील यशस्वी टप्पा गाठण्यामध्येही प्रेक्षक नाटकाच्या संपूर्ण टीमच्या पाठीशी उभे राहतील याबद्दल शंकाच नाही. तोपर्यंत नाटकाला व नाटकाच्या संपूर्ण टीमला भरघोस शुभेच्छा!