‘मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं!’, असं म्हणत आपल्याला खऱ्या अर्थाने जगणं शिकवणारा सर्वांचा लाडका अभिनेता प्रशांत दामले आणि त्याचं प्रेक्षकांचं तितकंच लाडकं असलेलं नाटक ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’! आज या नाटकाचे ५०० प्रयोग पूर्ण होणार आहेत. तमाम रसिक प्रेक्षकांचे प्रेम संपादित करून रंगभूमीचा बादशाह ठरलेल्या प्रशांत दामले या चतुरस्त्र अभिनेत्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. अर्थात, या महत्वाच्या टप्प्याचं संपूर्ण श्रेय नाटकाच्या संपूर्ण टीमला जातं.
प्रशांत दामले, कविता मेढेकर, अतुल तोडणकर, मृणाल चेंबूरकर, प्रतीक्षा शिवणकर, राजसिंह देशमुख व पराग डांगे अभिनीत आणि प्रशांत दामले फॅन फाऊंडेशन व गौरी थिएटर्स निर्मित आणि सरगम प्रकाशित ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाचा ५०० वा प्रयोग रविवार, २९ मे २०२२ रोजी दुपारी ४ वाजता दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले येथे सादर होणार आहे.
आमच्या प्रतिनिधींना मिळालेल्या वृत्तानुसार याप्रसंगी, ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या वयाची पंच्याहत्तरी आणि त्यांच्या कारकिर्दीला झालेल्या ५० वर्षांचे औचित्य साधून त्यांचा विशेष सत्कार करण्यात येणार आहे. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख व अभिनेते रितेश देशमुख हेदेखील या कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या कौटुंबिक विनोदी नाटकाची मूळ कथा इम्तियाझ पटेल यांची असून, अद्वैत दादरकर या नाटकाचे लेखक व दिग्दर्शक आहेत. अशोक पत्की यांनी या नाटकाला संगीत दिले आहे. नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे असून किशोर इंगळे यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभली आहे.
या नाटकाला आजवर मिळत आलेली प्रेक्षक पसंती बघता या नाटकाची घोडदौड पुढेही अशीच कायम सुरू राहणार आहे याबद्दल काहीच शंका नाही. ‘एका लग्नाची पुढची गोष्ट’ या नाटकाच्या संपूर्ण टीमला पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा!
1 Comment
Pingback: ५०० व्या प्रयोगानिमित्त प्रशांत दामले यांचे मनोगत!