‘यहाँ से बहुत दूर, गलत और सही के पार, एक मैदान है… मैं वहाँ मिलूंगा तुझे’ — रूमीच्या या प्रसिद्द काव्यपंक्तींमधून जन्माला आलेली एक संकल्पना घेऊन- प्रेम, लग्न आणि लिंगाच्या चार भिंतींच्या पलीकडे जाऊन, लैंगिकतेच्या कवाडांना मोडण्याचा प्रयत्न करणारं एक नवीन नाटक ३ मे रोजी, अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर रंगभूमीवर पदार्पण करतंय, ज्याचं नाव आहे दुष्यंतप्रिय!
‘दुष्यंतप्रिय’ हे कालीदासांच्या ‘अभिज्ञान शाकुन्तलम्’ या संगीतनाटकावरुन प्रेरित असून याचे लेखन सारंग भाकरे यांनी केले आहे. दिग्दर्शनही त्यांचेच आहे. या नाटकातल्या नाटकात, कर्जतमधला २०-वर्षीय रोहित, शाकुंतल या नाटकामध्ये हरणाचे पात्र साकारत असतो. नाटकाच्या शुभारंभाला फक्त दोन आठवडे असताना शकुंतला साकारणारी अभिनेत्री नाटक सोडून जाते. दिग्दर्शकाचा थरकाप उडालेला पाहून रोहित स्वतः शकुंतला साकारण्याची तयारी दर्शवतो. रोहित शाकुंतलेचे पात्र इतक्या सहजतेने साकारतो की सगळ्या मुलींची पात्र मुलंच साकारतील असे एक अकाली फर्मान दिग्दर्शक सोडतात. त्यामुळे नाटकात लैंगिकतेबद्दल खुंटीत व मर्यादित विचार असणाऱ्या चेतन आणि अभी या दोन चौकटीतल्या पुरुषांना काम जपण्यासाठी, प्रियंवदा आणि अनुसूया या शकुंतलेच्या मैत्रिणींची भूमिका नाईलाजास्तव पार पाडावीच लागते. स्त्री-पुरुषाच्या रुढीबध्द मर्यादांना ओलांडून मुख्यपात्र साकारणारे रोहित आणि सुशील, हे दोन पुरुष, नाटकाच्या मंचावर प्रियकरांच्या भूमिका निभावतात.
नाटकात भूमिका साकारताना कलाकारांच्या स्वतःच्या खऱ्या आयुष्यातल्या काही दाबून ठेवलेल्या भावना व्यक्त होतील का? बाईची भूमिका निभावताना रोहितला त्याच्या लैंगिकतेचा खरा शोध लागेल का? आयुष्याकडे बघण्याचा त्याचा दृष्टिकोन बदलेल का? स्त्रीचे पात्र साकारणाऱ्या एका पुरुषाबरोबर सुशील रंगमंचावर प्रेम मोकळेपणाने व्यक्त करू शकेल का? रोहितबरोबरच्या त्याच्या खऱ्या आयुष्यातल्या नात्यात काही फरक पडेल का? चेतन आणि अभी या दोन पात्रांना स्त्रीभूमिका साकारावी लागल्यावर लिंग आणि लैंगिकतेवरचे त्यांचे विचार बदलतील का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणारं नाटक म्हणजे ‘दुष्यंतप्रिय’.
अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर नाट्यसृष्टीत एक बदलाचा विचार घेऊन, व एक नवीन पायंडा पाडत, ‘दुष्यंतप्रिय’ हे नाटक म्हणजे अभिज्ञान शाकुंतलचं एक वेगळं व कधीही न पाहिलेलं रूप आहे.
निर्मिती : वेक्शन
निर्माता : सुशांत कोतवडेकर
लेखक/दिग्दर्शक : सारंग भाकरे
कलाकार : विशाल पवार, अभिषेक सावळकर, रितेश आफ्रे, गौरव गोवेकर, श्रीकांत वावदे, निमिष सूर्ते आणि राज हंचनाळे
प्रकाशयोजना : सुनील मिस्त्री
नेपथ्य : तन्मय बांदेकर
संगीत संयोजन : श्रीधर सावंत/रोहन हंचनाळे
वेशभूषा संकल्पना : निशांत रॉय बोंबार्डे
वेशभूषा: अमृता अरुण
रंगभूषा : शेखर केमनाईक
लोगो : दर्शन जळगावकर
प्रसिद्धी : सचिन कुंभार
छायाचित्रण : प्रशांत परब
छायाचित्रण रंगभूषा : सुरभी सर्वेश
निर्मिती व्यवस्था : नम्रता घाटगे
शुभारंभाचे प्रयोग
३ मे — रात्रौ ८ वा. प्रबोधनकार ठाकरे(मिनी थिएटर), बोरिवली
७ मे — रात्रौ ८ वा. पु. ल. देशपांडे(मिनी थिएटर), प्रभादेवी
१६ मे — रात्रौ ८ वा. काशिनाथ घाणेकर(मिनी थिएटर), ठाणे
तिकीट बुक करण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा.
https://insider.in/dushyantpriya-may3-2022/event