नीरज शिरवईकर लिखित व विजय केंकरे दिग्दर्शित ‘अ परफेक्ट मर्डर’ हे नाटक बऱ्याच कारणांसाठी लोकप्रिय आहे. गूढ रहस्यप्रधान कथानक, कलाकारांचा उत्तम अभिनय, त्याला साजेसं दिग्दर्शन आणि उल्लेखनीय तांत्रिक कामगिरी या सगळ्याच्या जोरावर ३ फेब्रुवारी, २०२४ रोजी या नाटकाचा ३५० वा प्रयोग पार पडला. ५ ऑगस्ट रोजी, गिरगावमधील रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये सादर होणाऱ्या प्रयोगात प्रेक्षकांसाठी एक छान सरप्राईझ आहे. नाटकात पूर्वीच्या मुख्य नायिकेचं म्हणजेच लेखिका व अभिनेत्री डॉ. श्वेता पेंडसे हिचं पुन:पदार्पण होणार आहे. पण एका वेगळ्या भूमिकेत!
‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकाच्या पहिल्या ७० प्रयोगांमध्ये डॉ. श्वेता पेंडसे मुख्य नायिकेच्या भूमिकेत दिसल्या होत्या. त्यानंतर, आजवर प्रिया मराठे ही व्यक्तिरेखा साकारताना दिसत आहे. यापुढेही, प्रियाच मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मग डॉ. श्वेता पेंडसे कोणती भूमिका साकारणार आहेत? डॉ. श्वेता साकारणार असणारी भूमिका आहे पोलिस इन्स्पेक्टर घारगेची!
या नाटकातील मुख्य नायकाची म्हणजेच निरंजन मुजुमदारची भूमिका अनिकेत विश्वासराव व पुष्कर श्रोत्री हे दोन्ही कलाकार दर प्रयोगागणिक आलटून पालटून साकारतात. तसंच, पोलिसांची भूमिका सतीश राजवाडे आणि पुष्कर श्रोत्री हे दोन नट साकारत होते. परंतु, काही इतर कामांमध्ये गुंतल्यामुळे सतीश राजवाडे यांनी या नाटकातून एक्झिट घेतली. सतीश राजवाडे साकारत असलेल्या पोलिसाच्या भूमिकेत आता आपल्याला डॉ. श्वेता पेंडसे दिसणार आहेत. पुष्कर श्रोत्री आणि डॉ. श्वेता पेंडसे त्यांच्या इतर कामाच्या तारखा सांभाळत पोलिसाची भूमिका साकारणार आहेत.
पोलिसाची भूमिका साकारण्यासाठी पुरुष कलाकाराची निवड न करता स्त्री पत्राची निवड केल्याबद्दल दिग्दर्शकाचे करावे तितके कौतुक कमीच आहे. प्रेक्षकांच्या भुवयाही या निवडीमुळे नक्कीच उंचावल्या आहेत. हे वेगळेपण नाटकाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन पोहोचवेल याबाबत शंका नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या निमित्ताने, डॉ. श्वेता पेंडसे यांचं ‘अ परफेक्ट मर्डर’ नाटकात पुनरागमन होतंय! श्वेता पेंडसे याही भूमिकेत प्रेक्षकांचं मन जिंकतील हे निर्विवाद आहे. नाटकाच्या संपूर्ण टीमला खूप शुभेच्छा!