मराठी रंगभूमीचा खूप मोठा इतिहास आहे. मराठी नाट्यसृष्टीला फुलवण्यात अनेक नावांचा हातभार आहे. खूप सारी दिग्गज मंडळी आहेत ज्यांनी स्वत:चे एक अढळ स्थान नाट्यसृष्टीत अजरामर केले आहे. त्यापैकी एक महत्वाचे नाव महणजे श्रीराम लागू!
श्रीराम लागू ह्यांचे १७ डिसेंबर २०१९ रोजी पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले. ९२ वर्षाचे श्रीराम लागू मराठी नाट्यसृष्टीमधले अतिशय मोठे नाव होते. त्यांच्या कालखंडात त्यांच्या कलेने त्यांनी रंगमंच्या वरील अनेक पात्रांना रंगभूमीवर जिवंत केलं होतं. २० पेक्षा अधिक नाटके श्रीराम लागूंनी स्वतः दिग्दर्शित केली असून अनेक मराठी नाटकांचा ते भाग होते.
श्रीराम लागू ह्यांचा जन्म १६ नोव्हेंबर १९२७ ला सातारा जिल्ह्यात झाला. बाळकृष्ण चिंतामण लागू आणि सत्यभामा लागू ह्यांचे ते मोठे सुपुत्र. श्रीराम लागू हे आधी बरेच वर्ष वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत होते. 1969 साली वसंत कानेटकर लिखित ‘इथे ओशाळला मृत्यू’ ह्या नाटकात पदार्पण करून ते पूर्णपणे कलाक्षेत्रात सामावले.
त्यांची सर्वात गाजलेली भूमिका म्हणजे कुसुमाग्रज लिखित ‘नटसम्राट‘ नाटकातले गणपतराव बेलवलकर हे पात्र. त्या भूमिकेला अतिशय कलाकृत पद्धतीने न्याय देऊन ती भूमिका प्रेक्षकांच्या मनामध्ये त्यांनी अजरामर केली आहे.
मराठी नाट्यसृष्टी मधले हे प्रसिद्ध नाव हिंदी व गुजराती रंगमंचावर देखील अतिशय प्रसिद्ध होते. श्रीराम लागूंनी मराठी व हिंदी सिनेमा मध्ये देखील आपली छाप उमटवली आहे.
लागू ह्यांच्या नाटकांची यादी बरीच लांब असली तरी महत्त्वाची काही नावे म्हणजे ‘वेड्याचे घर उन्हात’, ‘ॼगन्नाथाचा रथ’, ‘काचेचा चंद्र’, ‘हिमालयाची सावली’, ‘नटसम्राट’, ‘सूर्य पाहिलेला माणूस’, ‘आधे अधुरे’, ‘कन्यादान’, ‘खून पहावा करून’, ‘दुभंग’, ‘इथे ओशाळला मृत्यू’ आणि ‘सुंदर मी होणार’.
श्रीराम लागूंच्या निधनानंतर बऱ्याच दिग्गज कलाकारांनी हळहळ व्यक्त केली होती. श्रीराम लागूंचे निधन हे मराठी नाट्यसृष्टी साठी एक मोठी ठेच आहे. रंगभूमी प्रती त्यांचे योगदान हे शब्दात मांडणे अशक्य आणि अंकांमध्ये मोजणे शुल्लक ठरेल. त्यांचे योगदान कायमच अजरामर व अद्वितीय राहील.
अश्या ह्या थोर नाटककार व अभिनेत्याचा आज दुसरा स्मृतिदिन आहे. खरोखर, असा नट होणे नाही!
[Featured Image: President's Secretariat (GODL-India), GODL-India, via Wikimedia Commons]