प्रायोगिक नाटक या नाट्य प्रकारात नाटक या माध्यमाच्या सादरीकरणात प्रयोग अपेक्षित असतो. ज्यातून माध्यमाच्या नवीन शक्यता पडताळून बघितल्या जातात. एका वेगळ्या प्रकारची अनुभव निर्मिती त्यातून करण्याचा प्रयत्न वेगवेगळे प्रायोगिक नाटकाचे संच करून बघत असतात. महाराष्ट्राला प्रायोगिक नाटकाची मोठी परंपरा आहे. त्याच परंपरेला पुढे चालू ठेवत पुणे, मुंबई आणि महाराष्ट्राच्या इतर भागात सुद्धा वेगवेगळे नाटकाचे ग्रुप नवीन प्रकारचं, नव्या धाटणीचं, नवीन काहीतरी सांगू पाहणारं नाटक करू बघता आहेत. असाच प्रयत्न करू बघणारा पुण्यातील प्रायोगिक नाटक ग्रुप म्हणजे Incomplete Theatre!
सध्या या ग्रुपचं दोन भुते हे वि. स. खांडेकर यांच्या लघुकथेवर आधारित नाटक पुण्यात सुरू आहे. आजवर त्याचे १२ प्रयोग झाले असून, त्याचा पुढचा प्रयोग मुंबईत होत आहे. Crescent Theatre या संस्थेच्या मदतीने हा प्रयोग लावण्यात आलेला आहे.
या नाटकाचा विषय हा सध्या परिस्थितीत सुरू असलेल्या आपल्या जगण्यावर भाष्य करतो. अस्तिकता आणि नास्तिकता या दोन विचारांपेक्षा मानवतावाद महत्वाचा आहे ही गोष्ट नाटकाच्या शेवटी प्रेक्षकांच्या मनात घर करून जाते.
“आपल्या आयुष्यात जगताना एका व्यवस्थेच्या नियमाने जगत असतो. पण ती जगण्याची व्यवस्था आपल्याला योग्य दिशेला नेत आहे की नाही, यावर आपण कधीच कोणी प्रश्न विचारत नाही आणि कोणी प्रश्न विचारला तरी त्याकडे कोणीच लक्ष देत नाही. व्यवस्थेला प्रश्न विचारणाऱ्या लोकांचं काय होतं. तर त्यांचं भूत होतं. कारण त्यांची प्रश्न अनुत्तरित राहतात. त्याच भुतांचं, त्यांच्या प्रश्नांचं हे नाटक आहे.” अशी प्रतिक्रिया नाटकाच्या ग्रुपने त्यांच्याशी बोलताना आम्हाला दिली.
प्रयोगाचा तपशील
दोन भुते
प्रयोग क्रमांक १३
२८ जुलै २०२४ | संध्याकाळी ७ वाजता
स्वातंत्र्यवीर सावरकर सेवा केंद्र, महात्मा गांधी मार्ग,
सनसिटी सिनेमागृहाजवळ, विलेपार्ले पूर्व, मुंबई
कलाकार
ओम सोनवणे, ओंकार नवते, कौशिक कुलकर्णी, मृदुला सोन्ना, इंद्रनील हिरवे
संगीत: पार्थ घासकडबी
तांत्रिक संयोजन: शुभंकर भागवत
संगीत संयोजन: चैतन्य बीडकर
प्रकाश योजना: यश पोतनीस
संयोजन: यश पोतनीस, स्वछंद, योगेंद्र साने, मानस दाते
नाट्यरूपांतर आणि दिग्दर्शन: शिवम पंचभाई
निर्माते: INComplete थिएटर आणि PTSD productions