१०० वर्षांची सांस्कृतिक परंपरा लाभलेलं दामोदर नाट्यगृह नामशेष होईल की काय अशी भीती निर्माण झाली आहे. दामोदर नाट्यगृह आणि सहकारी मनोरंजन मंडळ नोव्हेंबर २०२३ पासून दामोदर नाट्यगृह वाचवण्यासाठी सोशल सर्विस लीगशी झगडा करत आहेत. परंतु, पुनर्बांधणीचे गाजर दाखवत हे नाट्यगृह जमीनदोस्त करण्याचा घाट आहे, असे लक्षात आल्याने रंगकर्मींमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे. सहकारी मनोरंजन मंडळाने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडे या प्रकरणाबद्दल दाद मागितली. नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी या प्रकरणासंबंधी पत्रकार परिषद बोलावली. त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांना २८ मे पर्यंतची मुदत देत, ‘दामोदर नाट्यगृहासंबंधी एकदाच चर्चा करुन विषय संपवावा. नाहीतर उपोषणाला बसू’, असा इशारा दिला आहे.
दामोदर नाट्यगृहाच्या अस्तित्वावर गदा आल्याने नाट्यप्रेमींमध्ये गेले कित्येक महिने असंतोषाचं वातावरण माजले आहे. दामोदर नाट्यगृह पाडून तेथे सभागृह बांधले जाईल अशी वार्ता पसरली होती. कालांतराने तेथे शाळा बांधण्यात येणार असल्याचे कानावर आले. नाट्यगृहाचे तोडकाम सुरू झाल्यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर आणि यांनी भेट दिल्यानंतर तोडकाम काही काळ स्थगित करण्यात आले होते. शाळा बांधून झाल्यानंतर नाट्यगृहाचे पुनर्वसन होईल, अशी खात्री तेव्हा सोशल सर्विस लीगकडून करण्यात आली होती.परंतु, पुनर्बांधणीचा कुठलाही नवा आराखडा न दाखवता स्थगित झालेले तोडकामाचे काम अचानक पुन्हा सुरू करण्यात आले. तेव्हा, सहकारी मनोरंजन मंडळाने अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेकडेया प्रकरणाबद्दल दाद मागितली. परिणामस्वरूपी, नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी पत्रकार परिषद घेत, काही रोखठोक मतं व निर्णय मांडले.
काय म्हणाले प्रशांत दामले?
“नोव्हेंबर महिन्यात दामोदर नाट्यगृह पाडण्यास सुरुवात झाली होती. पण अधिवेशनात प्रवीण दरेकरांनी प्रश्न उपस्थित केला होता की हे नाट्यगृह पाडू नये. त्यानंतर उदय सामंत आणि देवेंद्र फडणवीस यांनी शाश्वती दिली की हे नाट्यगृह पडणार नाही. त्यानंतर आचारसंहिता लागली, आचारसंहिता लागल्यानंतर आत्ता ते पाडकाम सुरु झालं. त्यामुळे ही पत्रकार परिषद आम्ही घेतली. दोन्ही संस्था मराठी नाटकांशी आणि माणसांशी संबंधित आहेत. दोन्ही संस्था मराठी लोकांच्या आहेत, त्यामुळे सामोपचाराने गोष्टी व्हाव्यात म्हणून प्रयत्न करत होतो. पण आता परिस्थिती बदलली आहे, त्यांनी बेशीस्तपणा सुरु केल्याने आम्हाला हा पवित्रा घ्यावा लागला आहे. तोडकामाला स्थगिती दिली तरीही तोडकाम करण्यात आलं याचा अर्थ काय होतो? आमच्या काही मागण्या आणि अटी आहेत. त्या सोशल सर्व्हिस लीगने पूर्ण कराव्यात. जर त्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही मराठी कलाकार आंदोलन करणार. सुरुवातीचे पाच ते सहा दिवस थांबणार आहोत. आम्हाला मुख्यमंत्र्यांनी भेट दिली तर ठीक नाहीतर उपोषण आंदोलनाला बसावं लागेल.”
काय आहेत मागण्या?
१. शाळेचे बांधकाम आणि नाट्यगृहाचे बांधकाम एकाचवेळी सुरू करून संपवणे.
२. आधी नाट्यगृह ७५० आसन क्षमतेचे होते. ते ९०० आसन क्षमतेचे करावे.
३. वाढीव एफएसआय नाटय़गृहासाठीच वापरला जावा. त्यामध्ये २०० आसनांचे मिनी नाट्यगृह बांधावे.
४. दामोदर नाट्यगृहाच्या कर्मचाऱ्यांना आणि सहकारी मनोरंजन मंडळाच्या डोअर कीपर्सना पर्यायी रोजगार द्यावा.
५. नव्या वास्तूत सहकारी मनोरंजन मंडळाचे कार्यालय/तालमीची जागा असावी.
६. शाळा व नाट्यगृह यांचे एण्ट्री गेट वेगवेगळे असावे.
७. नाट्यगृह तळमजल्यावर असावे. नाट्यगृहाचे भाडे मर्यादित असावे.
काय म्हणाल्या निलम शिर्के?
बालरंगभूमीच्या अध्यक्षा निलम शिर्के-सामंत परिषदेला उपस्थित होत्या. प्रशांत दामले यांच्या वक्तव्याला दुजोरा देत त्या म्हणाल्या, “दामोदर नाट्यगृहासाठी जे आंदोलन सुरु आहे त्यात माझा सहभाग आहे. उपोषणाला बसायची वेळ आली तरीही मी बसेन. शाळा बांधून झाल्यास दामोदर हॉल पुन्हा उभं राहील याची खात्री वाटत नाही. नाट्यगृह वाचवणं अत्यंत गरजेचं आहेत. अशी नाट्यगृहं बंद झाली तर नाटकं करायची कुठे? दामोदरची परंपरा जपली गेली पाहिजे. त्यामुळे नाट्यप्रेमी, कलाकार म्हणून आम्ही आंदोलनात सहभागी होणार आहोत.”
अभिनेत्री-लावणी नृत्यांगना मेघा घाडगे याही पत्रकार परिषदेला उपस्थित होत्या. दामोदर हॉलच्या या लढ्यात लोककलावंतही सामील होतील, अशी ग्वाही मेघा घाडगे यांनी दिली.
बालरंगभूमीचे कार्याध्यक्ष राजू तुलालवर यांनीही त्यांचे मत फेसबुकवर मांडले आहे.
दामोदर नाट्यगृह इतिहास जमा होणार नाही ना?
शाळा विद्येचे मंदिर…
नाट्यगृह हे कलेचे मंदिर.
परळच्या सोशल सर्विस लिग च्या प्रांगणात ही दोन्ही मंदिरे एकत्र नांदत होती.
आज शाळेच्या नूतनीकरणासाठी नाट्यमंदिर जमीनदोस्त करण्याचा घाट सोशल सर्व्हिस लीग ने घातला आहे.त्या मुळे अनेक कलाकारांच्या जिव्हारी घाव बसला आहे.
पुरातन दामोदर हॉल नामशेष होऊ नये यासाठी
नाट्यपरिषदेचे अध्यक्ष,प्रशांत दामले यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेऊन आंदोलनाचा इशारा दिला.
त्यांच्या भूमिकेला बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्षा नीलम शिर्के सामंत यांनी पाठिंबा दिला.
या प्रसंगी निषेध नोंदवायला मी तिथे हजर होतो.
कोणत्याही शहराची शैक्षणिक ओळख ही त्या विभागातील शाळांच्या संख्येवरून होते.
तसेच शहराचे सांस्कृतिक आरोग्य नाट्यगृहाच्या संख्येवर अवलंबून असते.
दामोदर हॉल हे गिरणगावातील सांस्कृतिक चळवळीचे एकमेव प्रतीक..लोक कलाना हक्काचे व्यासपीठ.कामगार रंगभूमी याच नाट्यगृहात बहरली.साहित्य संघ,दामोदर,रवींद्र,शिवाजी मंदिर
ह्या वास्तूंचे महत्व मराठी रसिकांना आहे.
आज दामोदर हॉल पाडून तिथे शाळा उभारली जात आहे, त्याला कोणाची हरकत नाही.
पण पुन्हा तिथे दामोदर नाट्यगृह उभे राहील,याची खात्री कलाकारांना नाही.
एक नाट्यगृह….
अनेक कलाकारांना घडवत असते.
लाखो प्रेक्षकांचे मनोरंजन घडत असते.
पांच,सहा वर्ष नाट्यगृह नसणे,
त्या विभागातील कला सांस्कृतिक परवडणारे नाही.
दामोदर हॉल चे रक्षणासाठी
म्हणूनच उभे राहणे गरजेचे.
(लोकमत पेपर ने घेतलेली दखल खाली पोस्ट करत आहे.एकंदर प्रकरण लक्षात येईल.)
राजू तुलालवार
[with inputs from: Loksatta, Lokmat and Saamana]