बहीण भावाचे नाते हे अतिशय सुंदर व निखळ असते. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात. कधी वादविवाद होतात, शब्दाला शब्द भिडतो तरीदेखील कठीण प्रसंगी ते एकमेकांची ढाल बनून उभे राहतात. भावा-बहिणीची अशीच एक गोष्ट सांगते ‘दादा, एक गूड न्यूज आहे’ हे नाटक! कल्याणी पाठारे लिखित आणि अद्वैत दादरकर दिग्दर्शित हे नाटक भावा-बहिणीच्या नात्याचा एक वेगळा प्रवास आहे. डिसेंबर २०१८ मध्ये हे नाटक रंगभूमीवर अवतरले. आतापर्यंत झालेले सगळे प्रयोग प्रेक्षकांच्या प्रचंड प्रतिसादात पार पडले आहेत.
‘दादा, एक गूड न्यूज आहे’ या नाटकाच्या मुख्य भूमिकेत सुप्रसिद्ध मराठी नट उमेश कामत हा ३० वर्षाचा, करिअर फोकस्ड व आपल्या बहिणीवर प्रेम करणाऱ्या ‘विनीत’चे पात्र साकारतोय. तर तरुणांची लाडकी हृता दुर्गुळे मराठी नाट्यसृष्टीत पदार्पण करत, ‘नमिता’ म्हणजेच ‘मन्या’, या २० वर्षीय तरुणीची भूमिका निभावताना आपल्याला दिसते. त्याचबरोबर, अभिनेत्री आरती मोरे ही मिथिला या एका मितभाषी मुलीची भूमिका निभावतेय व आशुतोष गोखले ‘बॉबी’ची भूमिका साकारतोय. याआधी ऋषी मनोहर ही भूमिका साकारत असे. विनीत हा करिअरवर लक्ष देणारा मुलगा असून त्याच्या क्षेत्रात तो मोठी प्रगती करायच्या मार्गावर असतो. तेव्हाच, त्याची बहीण नमिता, जिला तो प्रेमाने मन्या म्हणत असतो, ती येऊन त्याला एक न्यूज देते. ही न्यूज त्या दोघांचे आयुष्य बदलून टाकते. ह्या अश्या परिस्थतीत तो आपल्या बहिणीच्या मागे उभा राहतो का? तिला सहकार्य करतो का? मन्या ची भूमिका काय असते? आणि ही एक बातमी सगळ्यांचे आयुष्य, विचार व दृष्टिकोन कसे बदलून टाकते, ह्याचाच प्रवास म्हणजे ‘दादा एक गूड न्यूज आहे’ हे नाटक.
लॉकडाऊन मध्ये बऱ्याच नाटकांचे प्रयोग खंडित पडले होते. तसेच ह्या नाटकाचे प्रयोग बंद होते. ५ नोव्हेंबर, २०२१ पासून नाटकाचे प्रयोग पुन्हा दणक्यात सुरू झाले. आणि बघता बघता येत्या ९ जानेवारी, २०२२ रोजी या नाटकाचा २०० वा प्रयोग पुण्यात सादर होणार आहे. ‘दादा, एक गूड न्यूज आहे’ ह्या नाटकाचा मुद्दा अगदी वेगळा व आजचा आहे. हे नाटक एका खऱ्या काहाणीचे अगदी खरे सादरीकरण आहे. नाटकातल्या प्रत्येक कलाकाराला आपले पात्र उमगले आहे व समजले आहे. आणि ह्या सगळ्या उत्कृष्ट सादरीकरणाची व या अनोख्या कथेची गुंफण अद्वैत दादारकर ह्यांनी सुंदर मांडली आहे. बहीण भावाच्या नात्याचा हा प्रवास कधी हसवतो तर कधी डोळ्यात अश्रु आणतो. संपूर्ण टीमचे कौतुक करावे तेवढे थोडे. लेखन, नेपथ्य, दिग्दर्शन आणि अभिनयाची ही एक चविष्ट भेळ आहे. अगदी आजपर्यंत प्रेक्षक हे नाटक पुन्हा पुन्हा जाऊन पाहतयायेत व अजून पर्यंत या नाटकाचे प्रयोग हाऊस फूल होतायेत! सोशल मीडिया वर प्रेक्षक नाटकाची स्तुती-सुमने गात आहेत. लोकांचा हा उदंड प्रतिसादच या नाटकाची व कलाकारांच्या कामाची खरी पोचपावती आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, पुणे, येथे सायंकाळी ५.३० वाजता ९ जानेवारी २०२२ रोजी ह्या नाटकाचा २०० वा प्रयोग पार पडेल. संपूर्ण टीम अतिशय उत्साहात आहे व अगदी आतुरतेने २०० व्या प्रयोगाची वाट बघत आहेत.
View this post on Instagram
Dada Ek Good News Aahe Marathi Natak Upcoming Shows
तुम्ही www.bookmyshow.com वर तिकिटं बुक करू शकता. तेव्हा ‘दादा, एक गूड न्यूज आहे’ हे नाटक नक्की जाऊन पहा.