शंभर टक्के खरं कधीच कोणी बोलत नसतं. प्रत्येकजण काही ना काही लपवाछपवी करत असतो. ही लपवाछपवी जर नवरा बायको मधली असेल तर मग सगळा मामला कठीण होऊन बसतो. नवरा बायकोच्या नात्यातील लपवाछपवीचा हा खेळ आणि त्यातून उडणारी तारांबळ, तारेवरची कसरत, झालेली गोची याची सगळी धमाल म्हणजे ‘छुपे रुस्तम’ हे नाटक! ‘द लाय’ या फ्रेंच नाटकावर हे नाटक बेतलं आहे. ऋषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव हे दोन्ही हरहुन्नरी अभिनेते आगामी ‘छुपे रुस्तम’ या नाटकासाठी एकत्र आले आहेत. या दोघांसोबत मयुरा रानडे आणि कृष्णा राजशेखर या नाटकात काम करतायेत. विनोदाचा डोस देत नवरा बायकोच्या नात्यातील अंतरंग उलगडण्याचा प्रयत्न ‘छुपे रुस्तम’ हे नाटक करतं. फार्स, गंमत, गॅासिप लपवाछपवी अशा सगळ्या गोष्टींनी हे नाटक रंगत जात. खास विजय केंकरे टच असलेल्या या नाटकात काम करणे ही आमच्यासाठी पर्वणी असल्याचे हे दोघे सांगतात.
लेखन, दिग्दर्शन व अभिनेता ऋषिकेश जोशी आणि प्रियदर्शन जाधव या दोघांनी नेमकी कोणती भानगड केली आहे? त्यांना ‘छोटे रुस्तम’ का म्हटलं जातंय? या सगळ्याचा खुलासा येत्या १५ मे ला होणार आहे. प्रवेश व दिशा निर्मित आणि विजय केंकरे दिग्दर्शित या दोन अंकी नाटकाचे शुभारंभाचे प्रयोग रविवार १५ मे दुपारी ४.१५ वा. दीनानाथ नाट्यगृह, विलेपार्ले आणि सोमवार १६ मे ला दुपारी ३.३० वा. शिवाजी मंदिर, दादर येथे सादर होणार आहेत.
प्रिया पाटील आणि अनिता महाजन यांनी ‘छुपे रुस्तम’ नाटकाची निर्मीती केली आहे. या आधी या संस्थेच्या वतीने विविध व्यावसायिक नाट्यस्पर्धेमध्ये गाजलेलं ‘गलती से मिस्टेक’ या धम्माल विनोदी नाटकासोबत ज्वलंत, आशयघन व विनोदाची हळूवार फुंकर घालणारं ‘डोन्ट वरी हो जाएगा’ यासारख्या नाटकाची निर्मिती करण्यात आली आहे. लेखक तेजस रानडे यांनी या नाटकाचे लेखन केले आहे. नेपथ्य संदेश बेंद्रे यांचे तर संगीत अजित परब यांचे आहे. प्रकाश योजना शीतल तळपदे यांची आहे.
ही विनोदी आणि रहस्यमय नाट्यकृती पाहण्यासाठी आपल्याला १५ मेपर्यंत प्रतीक्षा पहावी लागणार आहे. तोवर त्यासंबधी तसेच इतर नाटकांसंबंधी सर्व अपडेट्स आम्ही तुम्हाला देतच राहू. त्यासाठी आमच्या वेबसाईटला Subscribe करा. तसेच, आमच्या सोशिअल प्लॅटफॉर्म्सना Like आणि Follow करायला विसरू नका.