रंगभूमीवर प्रचंड गाजलेले ‘चारचौघी‘ हे नाटक ३१ वर्षांनी पुन्हा एकदा नव्या संचात रंगभूमीवर येत आहे. ‘जिगीषा’ या नाट्यसंस्थेतर्फे हे नाटक नव्याने सादर होत आहे. या नाटकाचा शुभारंभ शनिवार, १७ सप्टेंबर रोजी मुंबईच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात होणार आहे.
‘चारचौघी‘ या नाटकाच्या नव्या संचात रोहिणी हट्टंगडी, कादंबरी कदम, पर्ण पेठे, श्रेयस राजे, निनाद लिमये, पार्थ केतकर आणि मुक्ता बर्वे या कलाकारांच्या भूमिका आहेत. या नाटकाचे निर्माते श्रीपाद पद्माकर असून, सूत्रधार प्रणित बोडके आहेत. या नाटकाचे लेखन प्रशांत दळवी यांनी केले असून, दिग्दर्शन चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले आहे. अशोक पत्की यांचे संगीत, संदेश बेंद्रे यांचे नेपथ्य, रवी-रसिक यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभली आहे. या नाटकासाठी उलेश खंदारे यांनी रंगभूषा; तर प्रतिमा जोशी व भाग्यश्री जाधव यांनी वेशभूषा सांभाळली आहे.
या नाटकाच्या तालमी सध्या जोरात रंगल्या आहेत. सर्वच कलाकार नाटकासाठी उत्तम ते देण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे, बुधवारी दीनानाथ नाट्यगृहावर या नाटकाच्या शुभारंभाच्या प्रयोगासाठी प्रेक्षकांनी तिकिटे मिळवण्यासाठी मोठी रांग लावली होती. यावरून आजही या नाटकाविषयी उत्सुकता कायम असल्याचे दिसून येत आहे.
१५ ऑगस्ट १९९१ रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग पार पडून यावर्षी या नाटकाला ३१ वर्ष पूर्ण झाली आहेत. महाराष्ट्रातील अधिकाधिक प्रेक्षकांपर्यंत हे नाटक पोहोचवण्याचा मानस या निमित्ताने निर्माते श्रीपाद पद्माकर व्यक्त करतात. “या नवीन संचात मला ताकदीच्या अभिनेत्री मिळाल्या आहेत. ज्या जुन्या पिढीने हे नाटक आधी बघितले होते, त्यांनाही हे नाटक नवीन संचात बघण्याची उत्सुकता आहे. या नवीन प्रयोगालाही उत्तम प्रतिसाद मिळेल याची आम्हाला खात्री आहे,” अशा भावना श्रीपाद पद्माकर मांडतात.
हे नाटक पुन्हा रंगभूमीवर येत असल्याचे औचित्य साधून दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी म्हणतात, “१९९१ मध्ये आम्ही आणलेल्या या नाटकाला एका सामाजिक चळवळीची पार्श्वभूमी होती. आम्ही ‘स्त्री’ नावाची एक एकांकिका केली होती. पण प्रशांतच्या डोक्यात एक चांगला आशय आणि विषय होता व तो मुख्य धारेत आणायचा होता. यातून ‘चारचौघी’ घडत गेले. हे नाटक आता ३१ वर्षानंतरच्या काळातही सार्वकालिक वाटते. त्याकाळी या नाटकाचे मोजकेच प्रयोग होतील असे सगळ्यांना वाटले होते; पण त्यावेळी या नाटकाचे हजारो प्रयोग झाले.”
‘चारचौघी’च्या संपूर्ण टीमला रंगभूमी.com कडून शभेच्छा!