असं म्हणतात की मराठी भाषा दर १० किलोमीटर वर बदलते आणि प्रत्येक लहेज्यात एक वेगळा गोडवा असतो. तर हाच गोडवा नाटकांपर्यंत का पोहोचू नये? या प्रमाण भाषेपासून लांब असलेल्या अनेक बोलीभाषा मुख्य प्रवाहापर्यंत पोहचाव्या व लोकांना त्यांचा आस्वाद घेता यावा, या उद्देशाने ‘सुप्रिया प्रॉडक्शन्स‘ पुन्हा एकदा घेऊन येत आहेत ‘बोलीभाषा एकांकिका स्पर्धा!’
Bolibhasha Ekankika Spardha 2022
प्रसिद्ध नाटककार व ९६ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष श्री. गंगाराम गवाणकर यांचे हे मत होते की अनेक मालिका व चित्रपट बोलीभाषेमुळे गाजले. त्यांचे स्वतःचे ‘वस्त्रहरण’ हे मालवणी भाषेतले नाटक लोकांनी डोक्यावर उचलून घेतले होते. तर बोलीभाषेतली नाटके किंवा एकांकिका रंगभूमीवर जास्तीत जास्त सादर व्हायला पाहिजेत. त्यांच्या ह्याच संकल्पनेला प्रसिद्ध नाट्यनिर्माते गोविंद चव्हाण ह्यांनी मूर्त स्वरूप देण्याचे नक्की केले.
२०१६ सालापासून बोलीभाषा एकांकिका स्पर्धेची सुरुवात झाली. आतापर्यंत एकूण १६५ संघ ह्या स्पर्धेचा भाग झाले आहेत. गेल्या वर्षी झालेल्या गोविंद चव्हाण ह्यांच्या आकस्मित निधनामुळे, त्यांच्या सुकन्या सुप्रिया चव्हाण ह्या वर्षी सुप्रिया प्रॉडक्शन्स आणि व्हिजन व्हॉईस अँड ॲक्ट ह्या संस्थेच्या सहकार्याने ही स्पर्धा पुन्हा आयोजित करतायेत.
Bolibhasha Ekankika Spardha Entry Forms and Rules
बोलीभाषा एकांकिका स्पर्धेचे हे ५ वे वर्ष आहे. ह्या स्पर्धेची प्राथमिक फेरी २९-३० जानेवारी, २०२२ रोजी कुर्ला, नेहरूनगर येथील प्रबोधन प्रयोगघरामध्ये पार पडेल. स्पर्धेची अंतिम फेरी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात संपन्न होईल. प्रवेश नोंदणीची अंतिम तारीख मंगळवार २५ जानेवारी, २०२२ आहे. बुधवार २६ जानेवारी, २०२२ रोजी संध्याकाळी ६.३० वाजता प्राथमिक फेरीचे लॉट्स काढण्यात येतील व सर्व संघांना फोनद्वारे कळविले जाईल.
प्रवेश अर्ज व स्पर्धेची नियमावली www.govindchavan.com ह्या वेबसाईट वर उपलब्ध असून अधिक माहितीसाठी ७०२१७१७२४७ ह्या क्रमांकावर आपण संपर्क करू शकता.
जास्तीत जास्त लोकांपर्यंत या स्पर्धेबद्दलची माहिती पोहोचवून या स्पर्धेचा उत्तमोत्तम लाभ घ्या.