आज मराठी व्यावसायिक नाटक जगभरात मान वर करून चालू शकतं याचं मुख्य श्रेय जातं मराठी नाट्य निर्मात्याना! त्यांच्या योगदानामुळेच मराठी रंगभूमी एवढी बहरू शकली आणि त्यांच्याचमुळे नाटकाचा प्रपंच मोठा होत गेला. या मुख्य नाटक निर्मात्यांपैकी एक म्हणजे ‘भद्रकाली प्रॉडक्शन्स’!
मच्छिंद्र कांबळी यांच्या पुढाकाराने २७ जुलै १९८२ साली भद्रकालीची सुरुवात सुंदर तळाशिलकर लिखित आणि रमेश रणदिवे दिग्दर्शित ‘चाकरमानी’ या भद्रकालीची निर्मिती असलेल्या पहिल्या नाटकाने रवींद्र नाट्य मंदिरला झाली होती. मच्छिंद्र कांबळी स्वतः एक उत्तम कलाकार होतेच, त्याचबरोबर प्रेक्षकांना कोणती गोष्ट कशी सांगितली गेली पाहिजे याचं अचूक गणित त्यांना गवसलं होतं. यंदा भद्रकाली ४२ वा वर्धापन दिन साजरा करत आहे. या ४२ वर्षात मराठी प्रेक्षकांसाठी भद्रकालीने जवळ ५८ वेगवेगळ्या नाट्यकृती सादर केल्या. या सर्व नाटकांचे महाराष्ट्र, भारत आणि भारताबाहेर मिळून जवळजवळ १७००० पेक्षा जास्त प्रयोग झाले आहेत आणि अजूनही सुरू आहेत. एखाद्या मराठी नाट्यसंस्थेने एवढी वर्ष सातत्याने व्यावसायिक नाटक निर्मिती यशस्वीपणे करत राहणं हे अत्यंत दुर्मिळ आहे.
मच्छिंद्र कांबळींच्या निधनानंतर प्रसाद कांबळी यांनी आपल्या वडिलांची परंपरा पुढे सुरू ठेवत, नवीन नाटकांची निर्मिती सुरू ठेवली. ज्यातून ‘देवबाभळी’ सारखी ‘न भूतो न भविष्यती’ अशी कलाकृती मराठी रंगभूमीवर सादर झाली. यंदाचं वर्ष हे भद्रकालीचा ४२ वा वर्धापन दिन असल्याने, खास प्रेक्षकांसाठी भद्रकाली त्यांची ५ निवडक नाटकांच्या प्रयोगाची खास मेजवानी प्रेक्षकांसाठी घेऊन येत आहे. यात पांडगो इलो रे बा इलो!, रातराणी, हलकं फुलकं, सुखांशी भांडतो आम्ही!, समुद्र या अफलातून नाटकांचा समावेश आहे.
पांडगो इलो रे बा इलो!
पांडगो इलो रे बा इलो! हे १९८७ साली भद्रकाली निर्मित नाटक होतं. हे नाटक प्र ल मायेकरांनी लिहिलेलं असून मंगेश कदम यांनी दिग्दर्शित केलेलं होतं. या नाटकाला प्रेक्षकांचा भन्नाट प्रतिसाद मिळाला होता.
रातराणी
रातराणी हे १९८८ साली आलेलं नाटक होतं असून हे सुद्धा हे नाटक प्र. ल. मायेकरांनी लिहिलं होतं. या नाटकाने तयार केलेला प्रेक्षकवर्ग आजही नाटकाची आतुरतेने वाट बघतो आहे. स्त्री-पुरुष संबंध पियानो-व्हायोलिनच्या नात्याच्या माध्यमातून प्रकट होताना दिसतात. रातराणी जशी उत्तररात्री फुलते तशीच पन्नाशी उलटलेल्या अॅना स्मिथची गोष्ट आहे ही. या नाटकात अॅनाची वेगवेगळी रूपे दिसतात. यात ती प्रियकराची प्रेयसी आहे, नवऱ्याची बायको आहे, मुलाची आई आहे, एका सज्जन माणसाची मैत्रीण आहे, तरुण मुलाची वयस्कर मैत्रीण आहे. ही भूमिका त्याकाळी भक्ती बर्वे-इनामदार यांनी गाजवली होती. त्यांना या भूमिकेसाठी त्या वर्षीची नाटय़दर्पण, नाटय़ परिषद, व्यावसायिक राज्य नाटय़ स्पर्धेत पारितोषिके मिळाली.
हलकं फुलकं
हलकं फुलकं हे १९८८ साली आलेलं भन्नाट विनोदी नाटक आहे. त्यावेळी या नाटकाने प्रेक्षकांच्या तयार केलेली जागा आजसुद्धा अबाधित आहे.
सुखांशी भांडतो आम्ही!
सुखांशी भांडतो आम्ही! हे २०११ साली लेखक नाटककार अभिराम भडकमकर यांनी हे नाटक लिहिले असून कुमार सोहोनी यांनी दिग्दर्शित केले होते. तत्कालीन पारंपरिक नाटकाच्या ओळीत न बसता मानवी मानबद्दल अतिशय खरं काहीतरी सांगण्याचा यशस्वी प्रयत्न या नाटकातून झाला आणि त्यामुळे हे नाटक मराठी रंभूमीवर अजरामर होऊन बसलं.
समुद्र
समुद्र हे २०१५ साली आलेलं नाटक आहे. या नाटकाचं लेखन आणि दिग्दर्शन चिन्मय मंडलेकर यांनी केलं असून हे नाटक मिलिंद बोकिल यांच्या ‘समुद्र’ कादंबरीवर आधारित आहे. सामान्य माणसाच्या नातेसंबंधांमध्ये समुद्रातल्या लाटांप्रमाणे येणारे उतार चढाव आणि त्यातून आयुष्यावर होणारा परिणाम यावर या नाटकात भाष्य केलं आहे. हे नाटक लोकांच्या मनातली व्यथा नकळत त्यांच्या समोर मांडत आलंय.
या पाच नाटकांचे प्रयोग म्हणजे प्रेक्षकांसाठी मेजवानीच! एक महत्वाची गोष्ट म्हणजे या नाटकांचे प्रत्येकी फक्त ५० प्रेयोग होणार आहेत. तेव्हा प्रेक्षकांनी लवकरात लवकर आपली तिकिटं बूक करा आणि हाती आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घ्या!