आरंभ प्रोडक्शन हाऊस निर्मित, दोन अंकी मराठी विनोदी नाटक लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. नाटकाचं नाव आहे ‘बापटला आठवलंय भारी!’ या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग मुंबई मराठी साहित्य संघ, चर्नी रोड येथे पार पडणार आहे. भ्रष्टाचार, महागाई सर्व काही डोळ्यासमोर होत असूनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या सामान्य माणसाला जागरूक करून गांभीर्याने विचार करायला लावणारं असं हे नाटक आहे.
बापट हा एक सच्चा पत्रकार, इमानदार, जागरूक आणि स्पष्टवक्ता सामान्य माणूस असतो. एका अपघातामुळे तब्बल १८ वर्ष तो कोमात असतो. आता २०२२ साली त्याला शुद्ध आली आहे. शुद्धीवर आल्यावर त्याला बऱ्याच गोष्टी बदलल्या आहेत हे जाणवलं, देश किती प्रगत झाला आहे, टेक्नॉलॉजि किती प्रगल्भ झाली आहे आणि अश्या बऱ्याच गोष्टी. परंतु देशातील भ्रष्टाचार, महागाई, गुन्हे इत्यादी हे मात्र काही कमी झाले नाहीत हे ही त्याला जाणवलं. शिवाय ह्या विरोधात कोणीही आवाज उचलत नाही हेदेखील जाणवलं.
हळूहळू त्याला सर्व काही आठवतंय पण त्याचा अपघात झाला होता की तो एक घातपात होता हे त्याला आठवेल का? जी गोष्ट १८ वर्षांपूर्वी त्याला करता आली नव्हती ती तो आता करू शकेल का? स्वतःसाठी आणि देशात चाललेल्या भ्रष्टाचाराविषयी तो लढा देऊ शकेल का? हे तर नाटक पाहिल्यावरच कळेल.
नाटकाचा आशय कितीही गंभीर वाटत असला तरी हे एक विनोदी नाटक असल्याचे सांगण्यात आले आहे. म्हणजेच विनोदाच्या अंगावर सद्य परिस्थितीवर सडेतोड भाष्य करणारं हे नाटक अतिशय मनोरंजक असेल असा अंदाज आपण बंधू शकतो.
तर मग येताय ना नाटक पहायला रविवार दिनांक २७ मार्च २०२२ रोजी सायंकाळी ४:३० वाजता, मराठी मुबंई साहित्य संघ, चर्नीरोड येथे बापट या आपल्या माणसाला भेटायला? तुम्हाला यावंच लागेल. कारण, बापट यांना तब्बल १८ वर्षांनी आठवणार आहे भारी!