महाराष्ट्रात विद्यापीठातील युवा महोत्सवांना खूप महत्व दिले जाते. अशाच एका युवा महोत्सवात नाटक सुरू असताना ते बंद करण्यात आल्याचे दृश्य समोर आले आहे. औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात १६ ते १९ ऑक्टोबर दरम्यान युवक महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या युवक महोत्सवात १६०० हून अधिक विद्यार्थी सहभागी होते. पण या युवा महोत्सवातील एका नाटकाच्या सादरीकरणादरम्यान प्रेक्षकांच्या भावना दुखावल्या गेल्या आणि सुरू असणारे नाटक बंद करण्यात आले, असे एका व्हायरल व्हिडीओमध्ये दिसण्यात येते.
१७ ऑक्टोबर, २०२२ रोजी युवक महोत्सव कार्यक्रमादरम्यान विद्यापीठाच्या स्टेज क्रमांक ३ वर नाट्यरंग सुरु होते. राम, सीता आणि लक्ष्मण यांच्या भूमिकेत विद्यार्थ्यांचे सादरीकरण सुरू असताना त्यात रामाच्या शोधासाठी लक्ष्मण रेषा आखून निघून जातो. मग, सीतामातेच्या भूमिकेत असलेली तरुणी ‘झाल्या तिन्ही सांजा’ या लावणीवर नाचताना दिसते. हीच गोष्ट तेथील प्रेक्षकांना खटकली आणि त्यांनी नाटक बंद करून घोषणाबाजी सुरू केल्याचे सांगितले जाते. या घटनेमुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी आक्रमक झाले व हिंदू देवी देवतांची विटंबना केल्याचे आरोप करण्यात आले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या विद्यार्थ्यांनी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे योग्य कारवाईची मागणी केली. सध्या “हे नाटक कोणी लिहिले?” हा प्रश्न बऱ्याच लोकांच्या मनात उद्भवला आहे.
भाजपा आध्यात्मिक समन्वय आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आचार्य तुषार भोसले यांनी महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री माननीय श्री चंद्रकांतदादा पाटील यांना पत्र लिहीत कडक कारवाई करण्याची मागणी केली. या पत्रातील मजकूर पुढीलप्रमाणे आहे.
“काल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ येथे आयोजित नाट्यस्पर्धेतील एका नाटिकेत प्रभू श्रीराम, सीतामाता व श्रीलक्ष्मण यांच्यासंबंधी आक्षेपार्ह दृश्य/संवाद दाखविण्यात आला. हा सर्व प्रकार निंदनीय असून तेथे उपस्थित सर्व हिंदुत्ववादी प्रेक्षकांनी ही नाटिका तात्काळ बंद पाडली.”
“महोदय, आमची आपणांस विनंती आहे की, या प्रकरणाची तात्काळ चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई व्हावी. तसेच, राज्यातील सर्व विद्यापीठे आणि शैक्षणिक संस्थांना आपल्या स्तरावरुन आदेश निर्गमित व्हावेत की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि साधु-संतांच्या महाराष्ट्रात हिंदु समाजाच्या श्रद्धास्थानांचा तसेच आमच्या संस्कृती–परंपरांचा कोणत्याही प्रकारे अवमान सहन केला जाणार नाही व तसे केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल.”
— आचार्य तुषार भोसले
[Cover image via Vishalvn]