“लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया, झळाळती कोटी ज्योती या हां हां हां…” या गाण्यातील या ओळीप्रमाणे महाराष्ट्रातील नाटय संस्कृती तेजोमय आहे. त्यातील अनेक कलाकार तारे ही नाटकाची दुनिया उजाळतात. प्रत्येक कलाकाराची नाटकाची आवड जपण्यासाठी अनेक संस्था पुढाकार घेत कलाकारांमध्ये ज्योत प्रज्वलित करून नाट्य संस्कृतीचा वारसा चालवतात. पण हा वारसा चालू राहण्यासाठी तो नवीन पिढ्यांमध्ये रुजवणे देखील महत्वाचे असते. यासाठी अनेक बाल-कलाकारांची कला क्षेत्रात जडणघडण होते. अशाच बाल कलाकारांसाठी सातत्याने उपक्रम राबविणारी नागपूरमधील बालरंगभूमी परिषद. दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी या परिषदेने स्वर्गीय पुरुषोत्तम दारव्हेकर स्मृती प्रित्यर्थ बालनाट्य लेखन स्पर्धा आयोजित केली आहे.
बालनाट्य लेखन स्पर्धा
बालरंगभूमी परिषद २०१८ पासून नाट्य लेखन स्पर्धेचे आयोजन करत असतात. नागपूरमधील पुरुषोत्तम दारव्हेकर हे सर्वप्रिय प्रसिद्ध लेखक होते तसेच त्यांनी अनेक बाल-नाट्यांचे लेखन दिग्दर्शन केले आहे. अशा सर्वोत्कृष्ट कलाकाराच्या स्मरणार्थ बालनाट्य स्पर्धा आयोजित केली जाते. बालनाट्य लेखनाचे प्रमाण वाढावे त्याचसह नवीन बालनाट्य संहितांचे लिखाण व्हावे या दृष्टीने विदर्भ साहित्य संघ व बालरंगभूमी परिषद ही स्पर्धा आयोजित करतात.
बालनाट्य लेखन स्पर्धा – नियम व अटी
- संहिता मराठी भाषेत व नवीन असावी. तिचे सादरीकरण कुठेही झालेले नसावे.
- संहितेच्या सादरीकरणाचा कालावधी 40 ते 60 मिनिटांपेक्षा जास्त असू नये (उदाहरणार्थ २० ते २५ पाने)
- सहभागी स्पर्धकांच्या संहितेच्या प्रकाशनाचे सर्वाधिकार बालरंगभूमी परिषद, नागपूर यांच्याकडे राखीव असतील. त्यासाठी सुरुवातीलाच लेखी सहमती लेखकाला द्यावी लागेल.
- संहितेचा विषय हा पूर्णपणे बालकांच्या भावविश्वाशी निगडित असावा.
- स्वतंत्र लेखनाचा विचार करण्यात येईल. थोडक्यात भाषांतरित आणि अनुवादित नाट्यसंहिता मान्य करण्यात येणार नाही. प्रकाशित एकांकिका देखील या स्पर्धेसाठी अपात्र आहेत.
- ज्या संहिताना स्पर्धेमध्ये लेखनाचे पुरस्कार मिळालेल्या संहिता स्वीकारल्या जाणार नाही.
बालनाट्य लेखन स्पर्धा – प्रवेश अर्ज
- संहिता पाठवण्याची अंतिम तारीख ३० ऑक्टोबर, २०२२ आहे.
- या स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क ₹१०० आहे.
- अर्ज आणि संहिता ईमेल किंवा पोस्टाने आपण बालरंगभूमी परिषद, नागपूर शाखेच्या पत्त्यावर पाठवू शकता.
- पत्ता: “रंगभूमी” 37, अयोध्या नगर, तिरुपती ज्वेलर्स जवळ, नागपूर
- ईमेल आयडी: [email protected]
बालनाट्य लेखन स्पर्धा – पारितोषिके
- प्रथम पारितोषिक – ₹७०००/- व प्रमाणपत्र
- द्वितीय पारितोषिक – ₹५००० /- व प्रमाणपत्र
- त्रितिय पारितोषिक – ₹३००० /- व प्रमाणपत्र
- सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकास सहभागाचे प्रमाणपत्र
अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क करा
- वैदेही चवरे सोईतकर :- ८०५५०५०७०९
- संजय रहाटे :- ९९६०७४४४८४
बालरंगभूमी परिषद, नागपूर शाखा
अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेची घटक संस्था असलेली बालरंगभूमी परिषदेची स्थापना २०१८ साली नागपूर येथे झाली. संजय राहाटे हे या संस्थेचे प्रमुख आहेत. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा त्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध व्हावे तसेच त्यांचा आत्मविश्वास वाढावा यासाठी सतत प्रयत्नशील असते. यासाठी अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या परिषदेने आयोजित केलेल्या संस्कृत बालनाट्य स्पर्धेला उत्तम प्रतिसाद मिळाला होता तसेच संस्कृत विद्यापीठ यांच्या माहितीनुसार ४० नटकांसह त्यांनी भारतात असा पहिल्यांदा उपक्रम राबवून रेकॉर्ड तयार केला होता. बाल कलाकारांतील कलागुणांना उत्तेजन व प्रोत्साहन देऊन भावी काळात त्यांच्यामधील उत्तमोत्तम कलाकार निर्माण व्हावेत या उद्देशाने ही परिषद दर रविवारी शिबिर आयोजित करते. या शिबिर मार्फत मुलांचे संवाद कौशल्य वाढवणे, आत्मविश्वासात वाढ करून प्रोत्साहन दिले जाते. यासह मूकबधिर शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात.
विदर्भ साहित्य संघ
जानेवारी १४, इ.स. १९२३ रोजी अमरावती येथे विदर्भ साहित्य संघाची स्थापना झाली. त्यानंतर ते नागपूर येथे हलवण्यात आले. सध्या विदर्भातील अनेक राज्यांमध्ये शाखा आहेत. मराठी भाषा, साहित्य व संस्कृतीचा सर्वांगीण विकास साधने हे या संस्थेच्या कार्याचे मुख्य स्वरूप असल्याने साहित्य संमेलनांचे आयोजन, नवीन लेखकांना प्रोत्साहन देणे, नवीन पुस्तके प्रकाशित करणे, विदर्भातील साहित्य जगताला जोडण्यासाठी नियतकालिक चालवणे आदी भरीव स्वरूपाची कामे विदर्भात करीत आहे त्याचसोबत हे संघ लहान मुलांना साहित्यिक ज्ञान आत्मसात करण्यात प्रोत्साहन देते.
“आम्ही शालेय विद्यार्थ्यासाठी सातत्याने सांस्कृतिक कार्यक्रम आणि उपक्रम आयोजित करतो. या उपक्रमा अंतर्गत मुलांचा वैयक्तिक विकास होण्यासाठी तसेच सांस्कृतिक कलांची आवड निर्माण करण्यासाठी प्रोत्साहन देतो. बालरंगभूमी परिषद कोणत्याही स्पर्धेत सहभागी होत नाही परंतु स्पर्धेत सहभागी होणाऱ्या स्पर्धक संघांना, शाळांना मार्गदर्शन करण्यात येते.”
— संजय रहाटे (शाखा प्रमुख)
बालरंगभूमी परिषद व विदर्भ साहित्य संघ आणि स्पर्धेत सहभागी होण्याऱ्या स्पर्धकांना रंगभूमी.com कडून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.