एकांकिकाचं लेखन म्हणजे अगदी कौशल्याचं काम. आपल्या लिखाणातून आपले विचार मांडणे व त्याच बरोबर प्रेक्षकांना खिळवून ठेवणे हे वाटते तितके सोप्पे नसते. एकांकिका लिहिणाऱ्या हौशी लेखकांना प्रोत्साहन देण्यासाठी ‘अवतरण अकादमी’ घेऊन आली आहे ‘राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धा!’
‘कालानंद देणेघेणे हा केवळ मनुष्यप्राण्याचा गुण असल्यामुळे कलोपासना हा माणसाचे माणूसपण दृढ राखणारा एकमेव आचार आहे’, ह्या अभंग विश्वासाने व काही वेगळे करण्याच्या हेतूने, जागतिक रंगभूमी दिवशी, २७ मार्च १९९९ रोजी ‘अवतरण’ हा मंच कार्यरत झाला. रंगभूमीच्या कलाकारांमधील परस्पर सहकार्य वाढीस लावून कला निर्मितीस प्रोत्साहन मिळावे म्हणून नवोदित कलाकारांना रंगमंच उपलब्ध करून देऊन त्यांच्या कलागुणांची पारख होण्यासाठी, गेली २३ वर्षे ‘अवतरण अकादमी‘ अन्य उपक्रमांबरोबरच ‘जागतिक रंगभूमी दिवस सोहळा’ साजरा करीत आली आहे.
‘जागतिक रंगभूमी दिवस’ सोहळ्यानिमित्त ‘अवतरण अकादमी‘ अनेक स्पर्धा आयोजित करते, जसे की अभिनय स्पर्धा व द्विपात्री अभिनय स्पर्धा. त्याच बरोबर मराठी एकांकिका लेखन स्पर्धा सुद्धा आयोजित केली जाते व ह्या स्पर्धांमध्ये अनेक राज्यांमधून स्पर्धक भाग घेतात. एवढ्या मोठ्या प्रमाणावर व राज्यस्तरीय पातळीवर ही स्पर्धा घडत असल्याने स्पर्धेचे काही महत्वाचे नियम व अटी आहेत.
स्पर्धेचे प्रवेश शुल्क १५० रुपये असून ते अवतरण अकादमी च्या बँक खात्यात जमा करायचे आहेत. बँक खात्याच्या तपशीलासाठी ९८६९४५३७०० या क्रमांकावर संपर्क साधावा. जे ह्या स्पर्धेत भाग घेऊ इच्छितात, त्यांनी आपल्या स्वतंत्र एकांकिकेचे टंकलिखित पीडीएफ प्रत [email protected] या आयडीवर ईमेल करावी. सोबत ‘सदर एकांकिका हे आपले स्वतःचे नवीन लेखन असून स्पर्धेत दाखल होण्याच्या दिवसापर्यंत या एकांकिकेचा कुठेही प्रयोग झालेला नाही, अथवा सदर एकांकिका कुठेही छापील स्वरूपात प्रकाशित झालेली नाही’, असे हमीपत्र पाठवणे आवश्यक आहे. त्याच बरोबर आपले नाव, मोबाईल नंबर, पत्ता इत्यादि तपशीलासह ईमेल करणेदेखील आवश्यक आहे. एकांकिका पाठवण्याची अंतिम तारीख आहे ०५ मार्च २०२२.
२७ मार्च २०२२ रोजी मुंबई येथे अवतरण अकादमीचा ‘जागतिक रंगभूमी सोहळा’ पार पडेल. त्याच कार्यक्रमात स्पर्धेचा निकाल व पारितोषिक वितरणापूर्वी प्रमुख पाहुण्यांची मुलाखत घेतली जाईल. तीन विजेत्या व दोन उत्तेजनार्थ एकांकिकांना रोख पारितोषिके व प्रशस्तिपत्रे देण्यात येतील.
तेव्हा अवतरणच्या एकांकिका लेखन स्पर्धेत भाग घेण्याची संधी नक्की साधा!