‘जागतिक रंगभूमी दिवस’ साजरा करायचं म्हटलं तर या दिवशी गुणी कलाकारांचा सत्कार करणे आणि कलावंतांना सादरीकरणासाठी व्यासपीठ मिळवून देणे यापेक्षा उत्तम ते काय? असा सोहळा म्हणजे थेट रंगभूमीलाच मानवंदना होय! या संकल्पनेस समर्पक असा एक सोहळा ‘अवतरण अकादमी’तर्फे गेली बरीच वर्षे साजरा करण्यात येत आहे.
जागतिक रंगभूमी दिवस
‘अवतरण अकादमी’ गेली तेवीस वर्षे सांस्कृतिक अभिरुचीच्या परिपोषासाठी आणि परितोषासाठी कलाविषयक विविध उपक्रम राज्यस्तरावर आयोजित करीत आहे. ‘इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटयूट’ (आयटीआय) ह्या १९४८ मध्ये युनेस्को व जागतिक कीर्तीच्या काही रंगकर्मींनी स्थापन केलेल्या, जगातील अत्यंत महत्वाच्या अशासकीय संस्थेने २७ मार्च, १९६२ पासून जागतिक रंगभूमी दिवस साजरा करण्याची सुरुवात केली. प्रयोगजीवी कलांबाबतचे ज्ञान व परंपरांची आंतरराष्ट्रीय देवाणघेवाण करणे, रंगभूमीच्या कलाकारांमधील परस्पर सहकार्य वाढीस लावून युनेस्कोच्या आदर्श व उद्दिष्टांप्रति बांधिलकी राखतानाच जगात सर्वत्र शांती व मैत्रीपूर्ण संबंध प्रस्थापित करणे, ही इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूटची उद्दिष्टे आहेत. ‘अवतरण अकादमी’ ह्या विचाराने प्रभावित आहे.
‘अवतरण अकादमी’ने १९९९ पासून ‘जागतिक रंगभूमी दिवस’ अशासकीय स्तरावर साजरा करण्याची सुरुवात महाराष्ट्रात केली. ‘इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटयूट’ ह्या प्रेरणेबरोबरच, ‘कलानंद देणेघेणे हा केवळ मनुष्यप्राण्याचा गुण असल्यामुळे कलोपासना हा माणसाचं माणूसपण दृढ राखणारा महत्वाचा आचार आहे’, ह्या दृढ विश्वासाने रंगभूमी कलाकारांबरोबरच अन्य कलांचा अभ्यासही ‘अवतरण अकादमी’ च्या मंचावर जाणीवपूर्वक सुरू आहे.
अवतरण अकादमीचा ‘जागतिक रंगभूमी दिवस’ सोहळा — रूपरेषा
ह्या वर्षी जागतिक रंगभूमी दिवसाच्या पूर्वसंध्येला २६ मार्च रोजी सायंकाळी ४:३० वाजता बोरिवली येथे प्रबोधनकार ठाकरे लघु नाट्यगृहात ‘अवतरण अकादमी’च्या ‘जागतिक रंगभूमी दिवस’ सोहळ्याची रूपरेषा पुढीलप्रमाणे असणार आहे:
- ‘इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिटयूट’ ने प्रसारित केलेल्या अमेरिकन ज्येष्ठ नाट्यकर्मी मा. पीटर सेलार्स ह्यांच्या, संभाजी सावंत अनुवादित संदेशाचे वाचन केले जाईल.
- प्रतिवर्षीप्रमाणे ‘अवतरण’ आयोजित राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धेचे पारितोषिक वितरण केले जाईल.
अवतरण अकादमी आयोजित राज्यस्तरीय एकांकिका लेखन स्पर्धा!
- प्रतिवर्षानुसार, नाट्यक्षेत्रातील व्यवसायाव्यतिरिक्त किशोर व युवावर्गास निरपेक्ष व व्रतस्तपणे नाट्यशिक्षण देऊन त्यांची नाट्यकलाभिरुची वाढीस लावण्यासाठी व त्यातून त्यांचा विकास घडविण्यासाठी सातत्याने कार्य करणाऱ्या नाट्यधर्मीला दिले जाणारे ‘अवतरण नाट्यव्रती सन्मान’ हे पारितोषिक ह्यावर्षी वर्धा येथील नाट्यधर्मी मा. हरीष इथापे ह्यांना प्रदान करून गौरविले जाणार आहे.
- विनोदी अभिनयाने रसिकाभिरुची समृद्ध करणाऱ्या एका रसिकमान्य अभिनेत्याला ह्या वर्षांपासून दिले जाणारे, ज्येष्ठ अभिनेता मा. अशोक कुळकर्णी पुरस्कृत कै. दादा कोंडके अवतरण पारितोषिक ज्येष्ठ अभिनेता मा. विजय कदम ह्यांना देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. अकरा हजार रु. व मानपत्र असे पारितोषिकांचे स्वरूप आहे.
- दुसऱ्या सत्रात ‘अवतरण अकादमी’च्या नाट्य-विद्यार्थ्यांची ‘मुक्ती’ ही एकांकिका सादर होईल.
या संपूर्ण सोहळ्याचे प्रवेशमूल्य निव्वळ १००/- रुपये आकारण्यात आले आहे. प्रेक्षक जास्तीत जास्त संख्येत या पूर्वसंध्येचा आस्वाद घेतील याबद्दल आम्हाला खात्री आहे.