आजच्या पिढीला उत्तमोत्तम शिक्षण मिळावं यासाठी त्यांच्या पालकांची धडपड सुरू असते. मुलांना करिअरच्या संधीही तितक्याच ताकदीच्या उपलब्ध होऊ लागल्यामुळे तरुण पिढीही स्वच्छंद मनाने स्वतःचे मार्ग निवडून विश्वभर उडाण घेण्यासाठी सज्ज झालीय. इंटरनेटमुळे जग छोटं वाटू लागलंय. आंतरराष्ट्रीय पातळीवर सहजरीत्या विचारांची देवघेव होऊ लागलीय. अशा पिढीच्या मनात परदेशी विचारांचं बीज रुजणं स्वाभाविक आहे. अशा परिस्थितीत आपली मूळ संस्कृती विरळ होत जाण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि अशी पिढी मूळ संस्कृती, नातीगोती विसरून आत्मकेंद्री होण्याची शक्यता नाकारता येत नाही. परिणामी नात्यांचा ओलावा कमी होऊन पडणारा भावनांचा दुष्काळ हे आणि मेकॅनिकल जगणं हे ओघानं आलंच! त्यातूनच निर्माण झालेल्या एकलकोंडेपणाला कंटाळून आयुष्यात स्वतःला खुश ठेवण्यासाठी आनंदमयी मार्ग निवडणंही आलंच! असा कधी गोड कधी तिखट अनुभव देणारं नाटक म्हणजे अत्रेया नाशिक निर्मित, चैतन्य सरदेशपांडे लिखित आणि अनुप माने दिग्दर्शित नाटक ‘एक्सपायरी डेट’!
प्रॅक्टिकल आयुष्य जगणाऱ्या आजच्या पिढीमध्ये मुरू लागलेली आत्मकेंद्रित मानसिकता म्हणजे पाश्चात्य संस्कृतीची पाळेमुळे आहेत आणि असंच सुरू राहिलं तर आपल्या संस्कृतीचीही ‘Expiry Date‘ येऊन ठेपेल हा डोळ्यात अंजन घालणारा विचार मांडणारं हे नाटक प्रत्येक वयोगटातील प्रेक्षकांना आवडेल याबद्दल शंकाच नाही. त्यामुळे लवकरच तुमच्या नजीकच्या नाट्यगृहात या नाटकाचा नक्की आस्वाद घ्या!
‘एक्सपायरी डेट’ या नाटकाचा प्रयोग २५ मार्च रोजी ६:३० वाजता कालिदास कलामंदिर, नाशिक येथे सादर होणार आहे.
बुकिंगसाठी आनंद जाधव यांना ९४२२७७६३८४ या क्रमांकावर संपर्क करू शकता.