अस्तित्व आयोजित ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ या आपल्या सगळ्यांच्या लाडक्या स्पर्धेचे २०२१ हे ३५ वे वर्ष होते. पण त्याहून आनंदाची गोष्ट म्हणजे अस्तित्व या संस्थेलाही २७ डिसेंबर, २०२१ रोजी २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. नाट्यदर्पण संस्थेने सुरू केलेली ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ ही स्पर्धा अस्तित्व संस्थेने पुनर्जिवीत केली याबद्दल या संस्थेच्या सर्व सहकाऱ्यांचे मानावे तितके आभार कमीच आहेत.
१८ डिसेंबर, २०२१ रोजी पार पडलेल्या एकदिवसीय अंतिम फेरीचा आढावा घेणारा हा व्हिडिओ बघायला विसरु नका.
कल्पना एक आविष्कार अनेक २०२१ व्हिडिओ
आजच्या या २५ व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने अस्तित्व संस्थेतर्फे येणाऱ्या २०२२ वर्षातील स्पर्धेसाठी पुढील शब्दात स्पर्धकांना जास्तीत जास्त प्रमाणात स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
संस्था म्हटली की सभासद, कार्यकारी मंडळ आले, विश्वस्त आले, पण असे काही नसतानाही केवळ दरवर्षी वारीत सहभागी होणार्या प्रत्येक नव्या नाट्यउमेदीने जी संस्था वाढीस आली, जाणत्या नाट्यकर्मीच्या मार्गदर्शनाने बहरली आणि संस्थेच्या मांडवाखालून गेलेल्या प्रत्येकाच्या यशाने नावारूपाला आली. त्या ‘अस्तित्व’च्या अस्तित्वाला, आज २७ डिसेंबर २०२१ रोजी २५ वर्ष पूर्ण होऊन, त्याच उमेदीने, मार्गदर्शनाने संस्था नव्या पर्वात पदार्पण करते आहे, हे श्रेय संपूर्ण रंगभूमीचे!!! रंगदेवतेचरणी विनम्र अभिवादन!!!
अस्तित्वच्या २५ व्या वर्धापन दिनाचा औचित्यसाधून, ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ २०२२ या स्पर्धेच्या परंपरेप्रमाणे स्पर्धेचा विषय एक वर्ष आधी जाहीर करत आहोत. कल्पना एक आविष्कार अनेक २०२२ चे विषय सूचक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या “पद्मश्री”, सिंधुताई सपकाळ (माई) असून, त्यांनी “भूक” हा विषय दिला आहे…! ४०० पेक्षा अधिक दिवस आणि त्यात फक्त ४० मिनिटांची एक नविन संहिता सादर करण्याचे आवाहन. ‘कल्पना एक आविष्कार अनेक २०२२’ साठी लिहिते व्हा!
तसेच, यावेळच्या कल्पनासूचक पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांनी पुढील शब्दांत ‘भूक’ ही कल्पना सूचवण्यामागचे मनोगत व्यक्त केले आहे.
कल्पना एक आविष्कार अनेक २०२२ विषय
‘भूक’ या अतिशय संवेदनशील विषयावर आधारित एकांकिका बसवून जास्तीत जास्त स्पर्धक संस्था २०२२ सालीही स्पर्धेत भाग घेतील, याबद्दल शंकाच नाही. अस्तित्व या संस्थेचा प्रवास असाच अखंड सुरू राहो हीच नटराजाचरणी प्रार्थना!