एकांकिका स्पर्धेत मानाचे स्थान संपादित केलेल्या ‘अस्तित्व’ आयोजित ‘कल्पना एक आविष्कार अनेक २०२१’ स्पर्धेचा निकाल जाहीर झालेला आहे. या स्पर्धेची अंतिम फेरी आचार्य अत्रे नाट्यगृह, कल्याण येथे १८ डिसेंबर रोजी पार पडली. मान्यवरांकडून देण्यात आलेल्या एका कल्पनेवर आधारित एकांकिका लिहून ती सादर करावी असे या स्पर्धेचे सर्वसाधारण स्वरूप असते. नाट्यदर्पणने सुरू केलेली कल्पना एक आविष्कार अनेक ही स्पर्धा रवी मिश्रा यांनी पूर्ण ताकदीने ‘अस्तित्व’ तर्फे इतकी वर्षे सुरू ठेवली आहे याबद्दल त्यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे. तसेच, गेली चार वर्षे ‘चार मित्र, कल्याण’ या संस्थेकडूनही या स्पर्धेला मिळालेले सहकार्य मोलाचे आहे.
स्पर्धेचे यंदा ३५ वे वर्ष होते. अंतिम फेरीसाठी राजन ताम्हाणे आणि विद्याधर पाठारे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावर्षीसाठी ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी ‘यह वो मंजिल तो नही’ नावाची कल्पना स्पर्धकांना सुचवली होती. या कल्पनेवर आधारित पाच एकांकिका आज सादर झाल्या.
Kalpana Ek Avishkaar Anek 2021
कल्पना एक आविष्कार अनेक २०२२ स्पर्धेसाठी कल्पनासूचक आहेत पद्मश्री सिंधुताई सपकाळ म्हणजेच माई आणि त्यांनी सुचविलेली कल्पना आहे “भूक”!
‘मानलेली गर्लफ्रेंड’ ही एकांकिका प्रथम तर ‘सवाई’ ही एकांकिका द्वितीय क्रमांकाने विजयी ठरली. ‘विशेष परीक्षक सन्मान’ पारितोषिक ‘संपर्क क्रमांक‘ या एकांकिकेला देण्यात आले.
‘मानलेली गर्लफ्रेंड’ एकांकिकेसाठी सुनील हरिश्चंद्र सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक ठरला. भाग्यश्री अशोक पाणे यांना ‘सवाई’साठी तर संदेश जाधव यांना ‘संपर्क क्रमांक’ एकांकिकेसाठी सर्वोत्कृष्ट लेखनाचे पारितोषिक विभागून देण्यात आले. सर्वोत्कृष्ट नेपथ्याचे पारितोषिक संदेश बेंद्रे यांना ‘मानलेली गर्लफ्रेंड’ एकांकिकेसाठी मिळाले.
अभिनयाची सर्वोत्कृष्ट पाच पारितोषिके देण्यात आली. सर्वोकृष्ट अभिनयाचे प्रथम पारितोषिक प्रितेश मांजलकर यांना ‘संपर्क क्रमांक’ एकांकिकेसाठी देण्यात आले. द्वितीय पारितोषिक संदेश जाधव यांना ‘सवाई’ साठी देण्यात आले. तृतीय पारितोषिक निहारिका तांबे हिला ‘सवाई’साठी देण्यात आले. चौथे पारितोषिक प्रतीक्षा मिलिंद हिला ‘मानलेली गर्लफ्रेंड’ साठी देण्यात आले. पाचवे पारितोषिक सुनील हरिश्चंद्र याला ‘मानलेली गर्लफ्रेंड’ साठी देण्यात आले.
या संपूर्ण सोहळ्याचा रीतसर व्हिडिओ आम्ही येत्या काही दिवसात आमच्या YouTube चॅनेलवर अपलोड करू. विजेत्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि सर्व कलाकारांना पुढील वर्षीच्या ‘भूक’ या विषयासाठी खूप शुभेच्छा!