मराठी माणूस जगाच्या पाठीवर कुठेही गेला तरी मराठी नाटकाची ओढ विसरत नाही. तिसरी घंटा ऐकताच सहजच त्याचे पाय नाट्यगृहाकडे वळतात. परदेशात राहणाऱ्या नाट्यदर्दींसाठी अनामिका, कान्हाज मॅजिक निर्मित व साईसाक्षी प्रकाशित ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाचा खास परदेश दौरा सुरु होत आहे. जेणेकरून परदेशात राहणाऱ्या रसिक प्रेक्षकांना परदेशातल्या नाट्यगृहांमध्ये हे नाटक पाहण्याची सुवर्ण संधी मिळणार आहे.
प्रा. वसंत शंकर कानेटकर लिखित ‘अश्रूंची झाली फुले’ हे अतिशय अजरामर नाटक आहे. ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या सिनेमाच्या भव्य यशानंतर तरुण पिढीमध्ये काशिनाथ घाणेकर यांनी साकारलेल्या भूमिकांबद्दल कुतूहल निर्माण झालं. तेव्हा ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाने २०१९ मध्ये रंगभूमीवर पुन्हा पदार्पण केलं. अभिनेते सुबोध भावे यांनीच त्या चित्रपटात काशिनाथ घाणेकर यांचे पात्र साकारले होते. तर या नाटकातलं काशिनाथ घाणेकरांनी साकारलेलं ‘लाल्या’ हे पात्र सुद्धा सुबोध भावे साकारतायेत.
प्रतिमा कुलकर्णी दिग्दर्शित ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाची निर्मिती दिनेश पेडणेकर, मंजिरी भावे, राहुल कर्णिक व अभिजीत देशपांडे यांनी केली आहे. नाटकाचे नेपथ्य व प्रकाशयोजनेची धुरा प्रदीप मुळ्ये यांनी सांभाळली आहे. नाटकाचे पार्श्वसंगीत मिलिंद जोशी यांनी केले असून, वेशभूषा गीता गोडबोले यांची आहे.
नाटकाच्या प्रमुख भूमिकेत सुबोध भावे, लाल्या हे पात्र साकारतायेत व शैलेश दातार प्रोफ. विद्यानंद हे पात्र साकारतायेत. त्याचबरोबर सीमा देशमुख डॉ. सुमित्रा हे पात्र साकारतायेत व उमेश जगताप शंभू महादेव हे पात्र साकारतायेत.
हे नाटक आहे माणसाच्या आयुष्यात घडणाऱ्या बदलावांबद्दल. प्रोफ. विद्यानंद हे एक अगदी तत्वनिष्ठ व्यक्तीमत्व. त्यांच्या विचारांनी आणि शिकवणीने त्यांनी अनेकांचे आयुष्य बदललेले असते. लाल्याही त्यांचाच विद्यार्थी. ध्येयहीन लाल्याला ते मार्ग दाखवतात, ध्येय ठरवून आयुष्याची वाटचाल करायला शिकवतात. लाल्या पोलिस ट्रेनिंगसाठी जातो आणि प्रोफ. विद्यानंदच्या कॉलेजवर एक नेता अधिराज्य गाजवू लागतो. कॉलेजचा वापर तो राजकारणासाठी करू लागतो. जेव्हा प्रोफेसर विद्यानंद त्यांना विरोध करतात व त्यांच्यासमोर झुकायला मानत नाहीत, तेव्हा त्यांचं आयुष्य पूर्णपणे बदलतं. त्यांच्यावर खोटे आरोप लावून त्यांना जेलमध्ये पाठवलं जातं. तेव्हाच लाल्या पोलीस ट्रेनिंग पूर्ण करून कामावर लागतो. पुढे घडणारी कथा आणि कथेने बदललेला रोख विचार करायला भाग पाडणारा आहे. आपण आयुष्यात कितीही तत्वनिष्ठ वागलो वा जगलो, तरी कधी कधी आपल्या तत्वांना मागे सोडून परिस्थिती समोर झुकून बदल पत्करावा लागतोच, या कटू सत्याभोवती हे नाटक प्रवास करतं. पण त्यानंतर आपण स्वतःला ओळखू शकतो का? आपण माणूस म्हणून पूर्णपणे बदलतो का? आणि आयुष्यभर जी शिकवण उराशी कवटाळून बसलो होतो, ती बरोबर होती का? असे सगळे प्रश्न पाडणारं व उत्तरं देणारं हे नाटक.
१ एप्रिल, २०२२, पासून ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाचा परदेश दौरा चालू होत आहे. १ मे २०२२ पर्यंत वॉशिंग्टन, अटलांटा, न्यू जर्सी, फिलाडेल्फिया, बोस्टन व इतर शहरात महिनाभर नाटकाचे प्रयोग पार पडणार आहेत. १ एप्रिल २०२२ रोजी डेट्रॉईट येथे ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाचा ग्रँड प्रीमियर पार पडणार आहे.
तिकिटांच्या, प्रयोगाच्या आणि तिकीट बुकिंग च्या अधिक माहितीसाठी तुम्ही https://theparashare.com/ या वेबसाईटला भेट देऊ शकता.
तेव्हा परदेशात राहणाऱ्या रसिक प्रेक्षकांनी या सुवर्ण संधीचा आवर्जून लाभ घ्यावा व प्रचंड प्रतिसादात ‘अश्रूंची झाली फुले’ या नाटकाला नाट्यगृहात भेट द्यावी.
प्रयोग व तारखा-
१ एप्रिल, २०२२ – डेट्रॉईट (ग्रँड प्रीमियर)
२ एप्रिल, २०२२ – न्यू जर्सी (New Jersey)
३ एप्रिल, २०२२ – वॉशिंग्टन डी. सी. ( Washington D.C.)
८ एप्रिल, २०२२ – अटलांटा (Atlanta)
९ एप्रिल, २०२२ – फिलाडेल्फिया (Philadelphia)
१० एप्रिल, २०२२ – बॉस्टन (Boston)
१६ एप्रिल, २०२२ – शिकागो (Chicago)
१७ एप्रिल, २०२२ – टॅम्पा (Tampa)
२२ एप्रिल, २०२२ – सियाटल (Seattle)
२३ एप्रिल, २०२२ – लॉस अँजेल्स (Los Angeles)
२४ एप्रिल, २०२२ – बे एरिया (Bay Area)
२९ एप्रिल, २०२२ – ह्युस्टन (Houston)
१ मे, २०२२ – शॅरलट (Charlotte)