‘Arogyam Dhanasampada Foundation’ या संस्थेतर्फे मालाडमध्ये एक प्रायोगिक रंगमंच उभारण्यात येणार आहे असे वृत्त काही दिवसांपूर्वी आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचविले होते. ही माहिती देणारा लेख तुम्ही अद्याप वाचला नसेल तर या लिंकवर क्लिक करुन नक्की वाचा.
‘आरोग्यम धनसंपदा प्रायोगिक कलामंच’ असे या प्रायोगिक रंगमंचाचे उद्घाटन प्रख्यात अभिनेते मकरंद देशपांडे यांच्या हस्ते १६ ऑक्टोबर, २०२२ रोजी करण्यात आले. ज्यांनी पुढाकार घेऊन हा कलामंच उभारणे शक्य केले त्या अनघा म्हात्रे आणि प्रकाश म्हात्रे यांचीही सोहळ्याला उपस्थिती होती. तसेच डॉ. अनिल बांदिवडेकर व संभाजी सावंतही व्यासपीठावर उपस्थित होते.
मालाडमध्ये प्रायोगिक कलामंच सुरू होणे ही सर्व रंगकर्मींसाठी आणि प्रेक्षकवर्गासाठी अत्यंत जमेची बाजू ठरणार आहे. हे जाणून आरोग्यम धनसंपदा संस्थेच्या अध्यक्षा अनघा म्हात्रे आणि उपस्थित आदरणीय रंगकर्मींनी अतिशय सुंदर शब्दांत रंगमंचावर येऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन कवी अरुण म्हात्रे यांनी केले.
कलामंचाच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त प्रायोगिक नाट्यमहोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे, हे आपण जाणून आहोतच. या नाट्यमहोत्सवात सादरीकरण करणाऱ्या कलाकारांचे आणि कलामंच उभा करण्यात ज्या लोकांची मदत झाली अशा सर्वांचे पुष्पगुच्छ आणि स्मृतिचिन्ह देउन आभार मानण्यात आले. त्यानंतर प्रमुख पाहुणे मकरंद देशपांडे यांनी मनोगत व्यक्त केले. हाडाचा रंगकर्मी म्हणजे काय याचा दृष्टांत या भाषणातून आला. पुढील व्हिडिओमध्ये तुम्ही हे ऐकू शकता.
Makarand Deshpande’s Full Speech from Arogyam Dhanasampada Prayogik Kalamanch
आज जिथे कलामंच आहे त्याच सभागृहात योगाचे क्लासेसही घेतले जातात. त्यामुळे येथे रंगमंच बांधण्यात आलेला नाही. परंतु, प्रेक्षकांना बसण्यासाठी ठराविक उंचीवर पायऱ्यांची रचना करुन त्यावर खुर्च्या मांडण्यात आल्या आहेत. त्यामुळे कलाकार जरी रंगमंचावर सादरीकरण करत नसले तरी प्रेक्षकांना कितीही लांबून अथवा जवळून कलाकृतीचा आस्वाद घेता येणार आहे.
या सभागृहाचे कलामंचामध्ये रुपांतरण करण्याचे संपूर्ण श्रेय नाट्यकर्मी उन्मेष वीरकर यांना जाते. प्रकाशयोजनाकार आणि नाट्यदिग्दर्शक उन्मेष वीरकर यांनी प्रकाश म्हात्रे यांच्या सहकार्याने हा कलामंच अपल्यासाठी उभारला आहे.
‘माझा प्रत्येक शब्द प्रकाश म्हात्रे यांनी उचलून धरला. मला सर्व प्रकारचे सहकार्य केले. ज्या गोष्टी मी कलामंच घडवण्यासाठी सुचविल्या त्या सर्व सूचनांचे योग्य पालन होत गेले आणि आज हा डोलारा उभा राहिला आहे, याचा मला अभिमान वाटतो’, असे मनोगत उन्मेष वीरकर यांनी व्यक्त केले आहे.
प्रायोगिक नाट्य महोत्सव २०२२
‘आरोग्यम धनसंपदा प्रायोगिक कलामंच’ च्या शुभारंभाप्रित्यर्थ प्रायोगिक नाट्यमहोत्सव आयोजिण्यामागे दोन महत्त्वाची कारणे आहेत. पहिलं म्हणजे रंगकर्मींना ‘आरोग्यम धनसंपदा प्रायोगिक कलामंच’ ही संकल्पना लक्षात यावी आणि दुसरं म्हणजे नाट्यरसिक प्रेक्षकांना या नव्या व्यासपीठाबद्दल माहिती मिळावी.
प्रायोगिक नाट्यमहोत्सवाची सुरुवात अक्षय शिंपी आणि नेहा कुलकर्णी अभिनीत ‘दास्तान-ए-रामजी’ या नाटकाने करण्यात आली. महोत्सवाच्या पहिल्याच दिवशी प्रेक्षकांची हजेरी वाखाणणयाजोगी होती.
दास्तान-ए-रामजी नाटकाबद्दल थोडंसं…
जन्म-मृत्यू या अटळ घटना. जे जन्म घेतं ते लयाला जाणार, हा सृष्टीनियम. या दोन टोकांत आयुष्याचा लंबक हलत रहातो.
जन्म हीच केवळ सुरूवात नसते. मृत्यूही नव्या सृजनाच्या शक्यता पैदा करतोच. जगणं मृत्यूमुळे प्रवाही रहातं. जाणारा जातोच पण सोबत आपल्यालाही थोडंथोडं घेऊन जातो. म्हणूनच मृत्यू कधीही एकटा नसतो.
रामजीचा झगडा हा केवळ सूड उगवण्यासाठी नाही. जन्म-मृत्यूच्या मूळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. देहापासून सुरू होऊन देहातीत होतानाचा हा प्रवास पंचेंद्रियांच्या, आध्यात्माच्या, द्वैत-अद्वैताच्या, मूलभूत भावनांच्या प्रदेशातून खळाळत पुढे जात रहातो. इथे जन्म-मृत्यूला रामजीचा शुभ्र गंध लाभला आहे.
TheShaktiEnsemble’s Akshay Shimpi & Neha Kulkarni
हा नाट्यमहोत्सव चुकवू नका. या कलामंचाला आणि नाट्यमहोत्सवाला अवश्य भेट द्या. नाट्यमहोत्सवाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे आहे. महोत्सवाच्या देणगी प्रवेशिका रंगभूमी.com वर उपलब्ध आहेत, आणि त्या घेण्यासाठी तुम्ही ९९९-२५६-२५६-१ या नंबरवर संपर्क करू शकता.
संतोष पाठारे यांचे मनोगत
येत्या काळात, ‘आरोग्यम धनसंपदा प्रायोगिक कलामंच’ प्रेक्षकांच्या भेटीस विविध नाट्यकलाकृती घेऊन येईल आणि प्रेक्षकही या नव्या रंगमंचाचे मनापासून स्वागत करतील याबद्दल आम्हाला खात्री आहे. रंगभूमी.com च्या संपूर्ण टीमकडून ‘आरोग्यम धनसंपदा प्रायोगिक कलामंच’ उभा करण्यात वाटा असलेल्या सर्व सहकाऱ्यांना शुभेच्छा!
देणगी प्रवेशिका येथे उपलब्ध आहेत →
अशाच नवनवीन बातम्यांसाठी रंगभूमी.com वर आजच Subscribe करा.